19 June, 2016

बब्या....

बब्याचं घर

परवा गावी गेलो तेव्हा बब्याचं घर बंद दिसलं. घराला टाळं होत. बाजूला चौकशी केली, तर कळलं बब्या आता फार घरी राहत नाही. इकडे तिकडे फिरतच असतो. बायकोशी भांडण आणि दारुच्या धंद्यातील चढउतार त्याला आता सहन न होण्याएवढे वाढलेत. तो अस्वस्थ असतो. निराश वगैरे. बब्याचा धंदा वाईटच. पण तरीही तो माणूस म्हणून भारी होता. मदतीला धावून येणारा.

बब्या... रखरखत्या उन्हाने काळाकुट्ट झालेला साडे सहा फुटी 45 वर्षांचं आडदांड शरीर, ढेरपोट्या बोंगा, मधोमध टक्कल आणि उरल्या डोक्यावर पांढरे पडत चाललेले बारीक केस, हाफ पँट घालून, शर्ट न घालता तो एका खांद्यावर टाकलेला आणि दुसऱ्या खांद्यावर 15-20 लिटरचा दारुचा ड्रम उचलून रस्त्याने नेपोलियन बोनापार्ट असल्यागत राजावाणी पावलं टाकत चालायचा..... बब्या म्हटल्यावर त्याचं हेच रुप माझ्या डोळ्यासमोर येतं.

पंचक्रोशीतील आदिवासी पाड्यांवर दारु पाडली जायची. आजही लपून-छपून पाडली जातेच. पण तेव्हा सर्रास उघडपणे धंदा सुरु होता. बब्या या पाड्यांवरुन दारु विकत आणून आपल्या घरी ठेवायचा आणि तिथून विक्री करायचा. पंचक्रोशीतील तमाम म्हातारे बब्याचा घर गाठल्याशिवाय घरी परतायचे नाहीत. बब्या उधारी ठेवायचा, त्यामुळे मजुरी न मिळालेलेही त्याच्या घरी रांगा लावायचे. एक पेग मारला की रातच्याला चांगली झोप येते, म्हणून बब्याच्या उंबरठ्याला पाया पडल्याशिवाय कुणीच पुढे सरकायचा नाही. बब्याचं घरही गावाच्या बाहेर, त्यामुळे तसा कुणी पाहिल, ही चिंताही नसायाची. कधीही तोंडातून चकार न काढणारे गावातील म्हातारे, बब्याच्या दारुमुळे फडाफडा बोलताना पाहिलेत.

शाळेतून घरी जाताना बब्या कायम रस्त्याला दिसायचा. बब्या आडदंड शरीर असणारा असला, तरी गाडीच्या आवाजाला प्रचंड घाबरायचा. गाडीचा आवाज आला की, त्याला वाटे पोलीसच आले. पोलीस आले की बब्याला ठाण्यात घेऊन जात. बब्या दारुचा धंदा करतो, हे पंचक्रोशीला माहित होतं, अगदी पोलिसांनाही. पण त्यांनी कधी त्याला बंदी आणली नाही. बंदी का आणली नाही, ते माहित नाही. पण पोलीस बहुधा पैसे घेऊन गप्प बसत असावेत.

तर बब्या आम्हाला शाळेच्या वाटेवर भेटायाचा. रस्ता जंगलातून जातो, त्यामुळे कोणतीही गाडी दूरवर असली, तरी आवाज यायचा. असा काही आवाज आला की, बब्या खांद्यावरील ड्रम बाजूच्या करवंदाच्या जाळीत ठेवायचा आणि त्यावर पाला-पाचोळा टाकून लपवायचा. मग खांद्यावर टाकलेला शर्ट अंगात घालून, अगदी शेठजीसारखा चालत सुटायचा. क्वचितच कधीतरी पोलिसांची गाडी असायची. येणारी गाडी पोलिसांची नाही, हे कळल्यावर बब्या करवंदीच्या जाळीतून दारुचा ड्रम काढून पुन्हा घराच्या दिशेने कूच करायचा. त्याची ही कसरत रोजचीच.

आपण करत असलेला धंदा बेकायदेशीर आहे, हे त्यालाही माहित होतं. पण लोक दारु पितात म्हणून मी विकतो. मी दारु विक्री बंद केली, तर दुसरा कुणीतरी चालू करेलच ना, असे म्हणत तो आपला धंदा सुरु ठेवयचा.

परवा गावी गेलो तेव्हा बब्याचं घरं बंद दिसलं. बब्या आता कुठे असतो, माहित नाही. पण याआधीही गेलो होतो, तेव्हाही तो मला कुठे दिसला नाही. अर्थात मी काही दारु पिण्यासाठी गेलो नव्हतो, पण जाता-जाता त्याला हाक मारण्याची सवय होती. आता गेलो की घराला टाळंच दिसतं, त्यामुळे तीन-चार वेळा जाऊनही बब्याला हाकही मारता आली नाही.

येणा-जाणाऱ्याला घराच्या वाऱ्हांड्यात बसण्यासाठी जागा आणि त्याच्यासमोर थंडगार पाण्याचा पेला तो कायम ठेवत असे. बब्या माणूस म्हणून कायम ग्रेट होता आणि आहे.

गावी गेलो तेव्हा, त्याच्या घराला लावलेलं टाळं आणि त्या टाळ्यावर चढलेली गंज पाहिल्यावर उगाच बब्याच्या आठवणी डोळ्यासमोरुन सरकू लागल्या.

आता पोलिसांनी दारुच्या धंद्यावर कठोर कारवाई सुरु केलीय. पहिल्यासारखं पोलिस चिरीमिरी घेऊन गप्प बसत नाहीत. बहुधा त्यामुळे बब्या आता दुसऱ्या व्यावसायाच्या मागे लागला असावा.

No comments:

Post a Comment

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...