28 April, 2016

मार्क्ससोबतच्या तीन भेटी!



मला मार्क्स तीन वेळा भेटला. तिसऱ्यांदा भेटला, तेव्हा त्याने माझ्या मेंदूवर सत्ता काबीज केली होती. तिसऱ्यांदा भेटण्याचं कारण पहिल्या दोन भेटीत आहे. या तीनही भेटी अतिशय योगायोगाने झाल्या.

मार्क्स पहिल्यांदा भेटला मुंबईतील गोरेगावच्या बिंबिसार नगरमधील निसर्ग सोसायटीत. तेव्हा कॉलेजला होतो. डॉ. कुंदा प्रमिळा निळकंठ या आम्हाला शिक्षिका होत्या. त्यांच्याकडे अनेक पुस्तकं होती. मुळात डॉ. कुंदांना सामाजिक चळवळींचा वारसा होता आणि त्याही तो वारसा त्या यशस्वीरित्या पुढे चालवत होत्या. तर अभ्यासादरम्यान आम्ही वर्गातील काही निवडक मुलं डॉ. कुंदा यांच्या घरी जायचो. बिंबिसार नगरमधील त्यांच्या घरी एक रुम खास पुस्तकासाठी होतं. पुस्तकांसाठी वेगळी रुम असते, हे पहिल्यांदा पाहिलं. तीन भिंती पुस्तकच पुस्तकं. तिथल्या पुस्तकांच्या रॅकमध्ये प्रत्येक खाण्यात मला मार्क्स दिसला. कधी 'बायजा'च्या अंकातून तर कधी 'मिळून साऱ्याजणी'च्या अंकातून... मग कधीतरी 'आंदोलन शाश्वत विकासासाठी' हाती लागायचं. अनेक डॉक्युमेंट्स, मार्क्सच्या विचारांची स्तुती करणारी पुस्तकं, तर कधी 'आंबेडकर-मार्क्स' तुलना करत मार्क्सला चुकीची पाडणारी पुस्तकं... ती वाचत गेलो आणि मला मार्क्स भेटत गेला. डॉ. कुंदांच्या लायब्ररीत कुठल्याशा एका अंकात प्रा. एजाज अहमद यांचा लेख वाचला आणि याच लेखातून मार्क्स पहिल्यांदा फेस-टू-फेस भेटला. मेंदूला भिडला. मार्क्स पहिल्यांदा भेटला, तेव्हा रिअॅक्शन अशी होती की, लय डेन्जर माणूस आहे बहुतेक हा.. याच्या वाटेस जाण्यात काय अर्थ नाही. खूप टेक्निकल आणि कॉम्प्लिकेटेड विचार आहेत. गरिबांसाठी बोलतो खरं, पण गरिबांना तरी कळेल का, याला काय म्हणायचंय ते? असा प्रश्न पडला. पण मार्क्सने मला सहजासहजी सोडलं नाही. तो माझ्या मानगुटीवर बसला. मग त्याच्याबद्दल आणखी माहिती घेण्याचा विचार केला. याच विचारातून मार्क्सची दुसरी भेट झाली.

मार्क्स दुसऱ्यांदा भेटला तो दादरच्या लेनीन ग्राड चौकातील भुपेश गुप्ता भवनात. ते नाही का रविंद्र नाट्य मंदिर... त्याच्याच बाजूला आहे भुपेश गुप्ता भवन. डाव्यांचं वैचारिक गड, असं या ठिकाणाला म्हटलं तरी वावगं ठारणार नाही. डॉ. कुंदांनी कुठलंसं पुस्तक सतिश काळसेकरांना द्यायला सांगितलं होतं. त्यानिमित्ताने पहिल्यांदा भूपेश गुप्ता भवनात गेलो होतो. काळसेकरांनी तेव्हा जयदेव डोळेंचं 'समाचार' हे पुस्तक भेट म्हणून दिलं होतं. थोड्याफार गप्पा झाल्यानंतर मग काळसेकर म्हणाले, 'ते पाहा, पुस्तकं प्रदर्शनाला लावली आहेत, कोणती आवडली तर बघा. चाळा आणि घेऊन जा.' पुस्तकं म्हटल्यावर काळसेकरांशी गप्पा थांबवून तिकडे वळलो. लोकवाङमय प्रकाशनाच्या पुस्तकांबद्दल प्रचंड ऐकलं होतं. पुस्तकं कसली त्या पुस्तिकाच होत्या. अशा पुस्तिका वाचायला आवडायच्या. कारण लवकर संपतात. फाफटपसारा नसतो. याआधी ज्ञानेश महारावांच्या अशाच काही पुस्तिका वाचल्या होत्या. थोडक्यात पण सखोल माहिती. यातून 'मार्क्सवाद म्हणजे काय?' 'परिवर्तनाच्या दिशा' आणि 'मार्क्सावादाचा जाहीरनामा' ही तीन पुस्तकं हाती लागली. घरी येऊन वाचून काढली. मार्क्सवाद आपलासा वाटू लागला. मार्क्स 'माणसाचा' विचार करतोय, असं वाटू लागलं. आणि इथेच तिसरी भेट ठरली.

मार्क्सशी तिसरी भेट साठ्ये काॅलेजच्या लायब्ररीत झाली. काळसेकरांकडून आणलेल्या तिन्ही पुस्तकातून मार्क्सवादाबद्दल ओढ वाढली होती. मग 'दास कॅपिटल' समजून घेण्याचं ठरवलं आणि तशी चौकशी केली. मग कळलं, 'दास कॅपिटल'चं मराठी रुपांतर आहे. कॉलेजच्या लायब्ररीत बसून ते वाचलं. हे पुस्तक काही एक दिवसात वाचून झालं नाही. चांगले आठ-दहा दिवस गेले. यादरम्यान अनेक शब्दांचे अर्थही कळायचे नाहीत, तर कधी काही वाक्यांचा अर्थच लागायचा नाही. मग साठ्येच्या सोशोलॉजीच्या हेड गिरीजा गुप्तेंना विचारायचो. गिरिजा गुप्ते म्हणजे दिवंगत कामगार नेते वसंत गुप्तेंची कन्या. गिरीजा मॅम नीट समजावून अडलेला शब्द-वाक्य सांगायच्या. एव्हाना मार्क्स बऱ्यापैकी कळला होता. डोक्यात घुसला होता. त्याने मेंदूवर सत्ता काबीज केली. मार्क्सला तटस्थ मनाने वाचलंत, तर तो तुम्हालाही आपला वाटेल, यात मला तीळमात्र शंका नाही. कारण मार्क्स संवेदनशील मनाला पछाडतोच.

दुर्दैवाने, मी खरा मार्क्सवादी कधीच होऊ शकलो नाही, हे मी नम्रपणे कबूल करतो. कारण ज्या भांडवलशाहीला मार्क्स विरोध करतो, त्याच भांडवलशाहीने तयार केलेल्या तमाम उपकरणांचा, सुविधांचा मी मनमुरादपणे उपभोग घेतोय. आणि वर त्याविरोधातच बोलण्याचा खोडसाळपणा मी करणार नाही. मात्र, मार्क्सच्या मूळ विचाराबद्दल, मार्क्स-एंगल्स यांच्या प्रामाणिक हेतूबद्दल आणि त्यांच्या मांडणीबद्दल मला नितांत आदर आहे आणि यापुढेही राहील.

मार्क्सवादावर टीका होते आणि होतच राहणार. पण मार्क्सवादाशिवाय जग कधीच नसेल, हेही खरंय. कारण भांडवलशाही कायम कामगारांची गळचेपीच करते आणि म्हणून जोपर्यंत जगात कामगार आहेत, तोपर्यंत कम्युनिझम जिवंत राहणारच. मग तुम्ही हे मान्य करा अथवा नका करु.



दस्तुरखुद्द कार्ल मार्क्सच्या हयातीतही त्याच्या विचारसरणीवर जोरदार टीका होत असे. तेव्हा एकदा गमतीने मार्क्स म्हणाला होता- 'Thank God! I am not Marxist.'

08 April, 2016

या संस्कृतीरक्षकांचं करायचं काय?



सकाळी वेलवेट कंडोमची बातमी केली. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी दिल्लीतील कुटुंब नियोजनाशी संबंधित एका कार्यक्रमात पूर्णत: देशी बनावटीचं महिलांसाठीचं वेलवेट कंडोम लाॅन्च केलं. बातमी पोस्ट करुन ट्विटर-फेसबुकवर शेअर केली आणि सात-आठ मिनिटांचा अवधी गेला असेल, तेवढ्यात शनी शिंगणापूर चौथऱ्याची बातमी आली. विश्वस्तांनी वाद टाळण्यासाठी शनी चौथऱ्यावर सरसकट सर्वांनाच प्रवेश देण्याची घोषणा केली. आता शनी चौथऱ्याची बातमी माझ्या सहकारी सरांनी केली आणि ती पोस्ट करुन शेअर केली.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कंडोम आणि शनी चौथरा प्रकरणाचा संबंध काय? तर संबंध आहे आणि तो संबंध कुजक्या विचारांच्या तमाम मेंदूचं विकृत प्रदर्शन घडवणारं आहे.

शनी चौथरा प्रवेशबंदी हटवल्याच्या घोषणेची बातमी पोस्ट केल्यानंतर तथाकथित संस्कृतीरक्षकांनी वेलवेट कंडोमच्या बातमीखाली आपली 'संस्कृती दाखवायला सुरुवात केली. शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळाल्यावर गड्यांचा पार्श्वभाग जळफटला असावा. वेलवेट कंडोमच्या बातमीखाली अतिशय घाणेरड्या, गलिच्छ शब्दात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंवर तथाकथित संस्कृती रक्षक कमेंट करु लागले.

'हे कंडोम त्या तृप्ती देसाईला द्या' अशा घाणेरड्या शब्दात कमेंट करत आपल्या कुजक्या मेंदूचं प्रदर्शन घडवत काही संस्कृती रक्षक शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश दिल्याचा निषेध करत होते आणि आहेत.
जिच्या उदरातून जन्म घेतला, त्या मायेला समानतेचा हक्क मिळाला तर एवढा हैदोस का? इतकाच राग आहे, तर भुसनळ्यांनो महिलेशी लग्न का करता? मायेच्या रुपाला शिव्या देताना आणि त्यातही ती माय विधायक काम करत असताना तिला गलिच्छ शिव्या देणं, हे तुमच्या चार हजार वर्षे जुन्या संस्कृतीत लिहिलंय काय?

मीही हिंदू आहे. मात्र, 'हिंदू संस्कृतीत हे नाही, ते नाही' असं जे काही तथाकथित बोगस संस्कृतीरक्षक म्हणतात, त्यांची 'ते आणि हे नाही' ही यादी नक्की कुठेय? त्या यादीत महिलांना शिव्या देणं आणि समानता नाकारणं असेल, तर हिंदू असल्याची लाज वाटते. आणि तसं नसेल, तर मायेला लिंगावरुन शिव्या देणाऱ्यांनो, तुम्हाला हिंदू असल्याची लाज वाटायला हवी.

राहता राहिला मुद्दा तृप्ती देसाईंचा. शनी चौथरा आणि तृप्ती देसाई प्रकरण सुरु झाल्यापासून तृप्ती देसाईंवर अश्लिल जोक्स आणि कमेंट सुरु आहेत. या बाईचा हा पब्लिसिटी स्टंट आहे, बोगस बाई आहे, दिखाऊपणा आहे किंवा आज वेलवेट कंडोमच्या बातम्यांखाली आलेल्या अत्यंत घाणेरड्या कमेंट, या साऱ्या आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या. एक महिला येते आणि ती ४०० वर्षांपासून जिथे असमानतेची वागणूक मिळतेय, त्याविरोधात आवाज उठवते आणि लढा यशस्वीही होतो, हे काही उचललं बोट, लावलं की-बोर्डला आणि केली कमेंट, यातलं काम नाही. तृप्ती देसाईंनी आपल्या आक्रमक स्टाईलमध्ये (मग तुम्ही त्याला 'पब्लिसिटी स्टंट'ही म्हणा) आंदोलन करुन हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चेस भाग पाडला. वैचारिक घुसळण घडवून आणली. आणि लढा यशस्वीही झाला. त्यामुळे तृप्ती देसाईंचा या यशस्वी लढ्यात नक्कीच छोटा का होईना वाटा आहेच.

यासोबतच आदरणीय विद्या बाळ यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीवर विकृत शब्दांचे शिंतोडे उडवायला हे संस्कृती रक्षक मागे पडले नाहीत. अरे तुमच्या मायेला हक्क मिळवण्यासाठी तुमचा जन्म झाला नव्हता, तेव्हापासून ही बाई लढतेय. त्यांच्याबद्दल तरी आदर बाळगा.

शेवटी एकच सांगणं, संस्कृतीच्या नावाखाली संस्कृतीचे धिंडवडे काढू नका. सामान्यांच्या मनात याच संस्कृतीचा राग वाढत गेला, तर संस्कृतीचं रक्षण करता करता स्वत:चं रक्षण करण्याची वेळ येईल.



02 April, 2016

उंबरठ्यावर शेतकरी मेला, तेव्हा कुठे होतात हरामखोरांनो?


  
तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जा, जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये जा किंवा अगदी रेल्वेच्या तिकीट काऊंटरवरचा अनुभव आठवा. सराकरी कर्मचारी असे वागतात की, जसे यांच्या बापाचं राज्य आहे. जनतेच्या करावर यांचे पगार होतात, पण त्याच जनतेला हाडतूड करतात. काम करुन देण्यासाठी दिवसेंदिवस वाट पाहायला लावतात. बरं ज्या दिवशी काम करायचं, त्या दिवशीही 'खिसा भरुन' घेतातच.

खेड्या-पाड्यात जा, कुठल्याही माणसाला विचारा, सरकारी कर्मचारी कसे वागतात? बघा चार शिव्या हासडूनच त्याचं 'गुणगौरव' करतील, असा वाईट अनुभव सामान्यांना आहे.

आता बच्चू कडूंशी संबंधित बोलतोय, तर मंत्रालयाचंच पाहा. कधी चर्चगेट स्टेशनहून १०० नंबर बस पकडून मंत्रालयाच्या समोर उतरा आणि दोन-तीन तास समोर सावलीत उभे राहा. तुम्हाला दिसतील, फाटक़्या चपलांनी, संतप्त सूर्याखाली रडवेल्या चेहऱ्याने तासंतास उभे असणारे शेतकरी. मंत्रालयाच्या समोर वायबी चव्हाण सेंटरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर नारळवाला आहे, तिथे सावली असते. तिथे बसून मंत्रालयाकडे आशेने पाहत बसलेले कित्येक शेतकरी स्वत:च्या डोळ्याने पाहिले आहेत. काही ना काही लहान-सहान कामासाठी आलेले असतात, पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे त्यांची कामं होत नाहीत.

आमदार बच्चू कडूंनी जनतेसाठी बाचाबाची केलीय, स्वत:च्या स्वार्थासाठी नाही. बरं त्यात त्या अधिकाऱ्याने थेट 'अॅट्रॉसिटी' दाखल करण्याची मागणी-वजा-धमकी दिली. अशा लोकांमुळे 'अॅट्रॉसिटी' बदनाम आहे. अपंग, गरीब जनतेसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा हा आमदार आहे. अरे लेकाच्यांनो, तुमचं भाग्य समजा की असे आमदार जनतेत आहेत. पण याच आमदारांची कदर केली जात नाही, म्हणून राज्य भिकेला लागण्याच्या स्थितीत आहे.

बरं या बाबूंच्या कामबंद आंदोलनावरुन एक समोर आलं, ते म्हणजे या लोकांना जनतेची घंटा काय पडली नाहीय. यांना केवळ स्वत:ची पडलीय.

मंत्रालयाच्या उंबरठ्यावर जेव्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, तेव्हा का नाही तुमचा स्वाभिमान जागा झाला? तेव्हा कुठं होतात हरामखोरांनो? तेव्हा सहा मजले नाही उतरलात ते? तेव्हा कुठं गेली होती संवेदनशीलता, जी बच्चू कडूंनी शेतकऱ्याच्या वतीने विचारलेल्या जाबाला उद्धट उत्तर देणाऱ्या उपसचिवाप्रती जागी झाली.

या मंत्रिमंडळाला एक वर्ष झालं, मात्र अजूनही प्रशासनावर नीट पकड नाही, असे वरिष्ठ पत्रकार मित्रांकडून कायम ऐकत आलो होतो. आज खात्री झाली. कारण एका उपसचिवाने जनतेच्या प्रश्नाला उत्तर न दिल्याचा जाब विचारला म्हणून त्याविरोधात राज्याचा गाडा हाकणाऱ्या इमारतीतील सहाच्या सहा मजले रिकामे झाले. मुख्यमंत्र्यांची प्रशासनावर पकड नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. बरं ही परिस्थिती केवळ मुंबईतील या 'सहा मजल्यां'वर नाही, हे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि काही ठिकाणी तर ग्रामपंचायतीतही हीच परिस्थिती आहे.

मुख्यमंत्री अॅक्टिव्ह आहेत. व्हिजनरी आहेत. जनतेसाठी लढणाऱ्या आमदाराच्या मागे ठामपणे उभं राहण्याची हिंमत दाखवून गावितसारख्या सरकारी कर्मचाऱ्यांना योग्य संदेश देण्याची गरज आहे.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...