21 May, 2015

नजीब जंग कोण आहेत?



दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग
दिल्लीचं राजकारण सध्या अरविंद केजरीवल आणि नजीब जंग यांच्यातील वादामुळे ढवळून निघालं आहे. या वादात दोन व्यक्ती महत्त्वाच्या आहेत- एक म्हणजे अरविंद केजरीवाल आणि दुसरी व्यक्ती म्हणजे नजीब जंग. केजरीवालांना लोक बऱ्यापैकी ओळखून आहेत. ओळखून म्हणजे त्यांची पुरेशी माहिती लोकांना आहे. परिवर्तन ते रॅमेन मॅगसेसे किंवा अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील सहकारी ते दिल्लीचे मुख्यमंत्री. मात्र नजीब जंग हे कोण आहेत, हे फारसं कुणाला माहित नाही. मग नक्की कोण आहेत हे नजीब जंग.. त्यांची पार्श्वभूमी काय इत्यादी प्रश्न लोकांना नक्कीच पडले असणार. त्यामुळेच विकिपिडिया आणि इंटरनेटवरील इतर संदर्भांच्या मदतीने हा लेखनप्रपंच.

नजीब जंग यांचा जन्म 18 जानेवारी 1951 रोजी एका मुस्लीम कुटुंबात झाला. ते सध्या राजधानी दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत.  खरंतर नजीब जंग हे प्रशासनातील अधिकारी. 1973 साली ते मध्यपप्रदेशातून भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाले. शिवाय त्यांची आणखी एक ओळख म्हणजे ते जामिया मिल्लिया इस्लामिया या सेंट्रल यूनिव्हर्सिटीत ते व्हॉईस-चान्सेलर म्हणूनही कार्यरत होते.

अभ्यासात अतिशय हुशार म्हणून नजीब जंग हे लहाणपणापासून ओळखले जात  होते. जंग यांचं लहाणपण, अगदी जन्मही दिल्लीतलाच. त्यामुळे ज्या दिल्लीत जन्म झाला, त्या दिल्लीचे ते आज नायब राज्यपाल आहेत. दिल्लीच्या सेंट कोलंबिया स्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिल्लीतीलच सेंट स्टीफन कॉलेजमधून बीए (ऑनर्स) ही पदवी मिळवली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. जगप्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून त्यांनी ‘Social Policy & Developing Countries’ या विषयात एमएससी केलं. शिवाय ‘Energy Economics’ या विषयात त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पीएचडी केलीय.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर नजीब जंग यांनी 1973 साली मध्यप्रदेश कॅडरमधून भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला. 194 ते 1999 या काळात त्यांनी केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयात सहसचिव म्हणून काम पाहिलं. 1999 साली त्यांनी भारतीय प्रशासन सेवेला राम राम ठोकला.
प्रशासन सेवेतून बाहेर पडल्यानंतर जंग एशियन डेव्हलपमेंट बँकेत वरिष्ठ ऊर्जा तज्ञ म्हणून काम करु लागले. नवी दिल्लीतील ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या संचालक मंडळावरही ते काही काळ होते.
ऊर्जा क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. ऊर्जा क्षेत्राशी संबंधित त्यांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण अहवाल तयार केले. त्यातले काही अहवाल देशातील अनेक वृत्तपत्रांमधून प्रसिद्धही झाले. सामाजिक विषयांवर ते नेहमीच अभ्यासपूर्ण लिखाण करत असतात. केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या समित्यांवर नजीब जंग यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे आणि आजही पार पाडत आहेत.

जुलै 2013 मध्ये नजीब जंग यांच्यावर दिल्लीच्या नायब राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याआधी दिल्लीच्या नायब राज्यपालपदी माजी सनदी अधिकारी तेजेंद्र खन्ना हे होते. दिल्लीच्या नायब राज्यपालपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ते कायम बातम्यांमधून प्रसिद्धीच्या झोतात राहिले, कारण त्यांचं आणि केजरीवाल यांच्यातील वाद. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं नजीब जंग यांच्याशी कधीच पटलं नाही.
नजीब जंग यांच्याबद्दल मराठीमध्ये माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे विकिपिडीयाच्या सहाय्याने हा छोटेखानी लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

-        नामदेव अंजना (प्रतिनिधी, एबीपी माझा)

No comments:

Post a Comment

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...