06 February, 2015

वाटेत भेटणारी माणसं

पूर्व प्रसिद्धी- दैनिक ऐक्य (सातारा)

आयुष्य जगत असताना कुणी एखादा असा वाटसरु येतो आणि तू असे कर, तसे कर सांगून जातो. मग आपणही त्यावर विश्वास ठेवून तसे करतो. कधी-कधी असे अचानक घेतलेले निर्णय आयुष्याला कलाटणी देणारे ठरतात. आयुष्यातले टर्निंग पॉईंट वगैरे.


खरंच आपण आपल्या जगण्यात किंवा अगदी आपल्य आयुष्यातील नित्य निर्णय प्रक्रियांमध्ये कित्येकांना सामावून घेत असतो ना? आई-वडिलांपासून ते अगदी मगाशीच एसटी स्टँडवर भेटलेल्या एखाद्या नवख्या व्यक्तीपर्यंत. खरं पाहता, जे लोक ओपन माईंडेड म्हणजे खुल्या दिलाची वैगरे असतात, त्यांच्या आयुष्यातील निर्णय प्रक्रियांमध्ये अनेकांचा सहभाग असतोच. हा सहभाग अनेकवेळा किंबहुना नेहमीच फायदेशीर ठरत असतो. याचं कारण म्हणजे अनेकांचे अनुभव त्यांच्या एखाद्या निर्णयामागे असतात. आपण आपलं आयुष्य कितीही निवांतपणे, एकांतपणे किंवा एकटेपणाने जगण्याचा प्रयत्न केला तरी कधीना कधी वाटेत भेटणारी माणसांची गरज भासतेच.


तीन-एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मुंबईत नुकताच स्थायिक व्हायला आलो होतो. हातात पडेल ते काम करण्याची तयारी होती. जसा पोटाचा खळगा भरण्यावण्याचा प्रश्न डोळ्यासमोर होता, तसाच घरची जबाबदारीही आणि अगदी इव्हरेस्ट शिखराइतके स्वप्नंही. अशा साऱ्या परिस्थितीत मुंबईत आलेलो मी. काय करावं अशा मनस्थितीत. शिक्षण गावी घेतलेले. त्यामुळे दहावी झालो असतानाही या मुंबईतला पाचवीतला मुलगाही माझ्यासमोर सरस ठरत होता. अशातच एक दिवस पेपरची लाईन टाकताना एक माणूस भेटला. मी तेव्हा सकाळी पेपरची लाईन टाकून कॉलेज करत होतो. हा माणूस रोज वॉकिंगला जात असे. एक दिवस मला अडवून म्हणाला, काय करतोस रे बाळा.. मग आपले नेहमीचे कथा-पुराण त्या व्यक्तीला सुनावले. काही दिवस गेले. मीही या व्यक्तीला विसरुन गेलो. तसा तो नेहमी दिसायचा. मात्र पुन्हा भेटावसं कधी वाटले नाही. एक दिवस अचानक मला त्या व्यक्तीन पुन्हा थांबवले. बाळा, तू मला भेट असे सांगून त्याने त्याचा पत्ता असलेला कागद हातावर टेकवला आणि निघून गेला. काम वगैरे असेल काही म्हणून घर शोधत शोधत त्या व्यक्तीच्या घरी पोहोचलो. त्या व्यक्तीने त्या दिवशी आयुष्य जगण्यापासून ते अगदी शिकताना कसं शिकशील, काय करशील वगैरे वगैरे खूप काही मार्गदर्शन केलं. आयुष्याला कलाटणी देणारा तो दिवस ठरला! काही दिवसांनंतर कळलं की मला भेटलेला तो व्यक्ती साधा-सुधा नव्हता, तर मराठी अभिनेते आणि मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंजीकर होते. सांगण्याचा हेतू हा की आपल्या आयुष्याच्या वाटेत असे अनेक माणसं आपल्याला भेटत असतात. ज्यांना ओळखून आपण आपल्या आयुष्यात स्थान द्यायचे असते.

अनेकदा तर आयुष्याचा जोडीदारच आपल्याला अशा वाटेत भेटणाऱ्या माणसांमधून गवसतो. मग हळूहळू ओळख होते. ओळखीचे रुपांतर नात्यांमध्ये होते आणि मग ते मित्रत्वाचे नाते अगदी आयुष्याचे नाते बनून जाते. किंबहुना अशीही अनेक लोक मला भेटलेत जी कुठे बाजारात भेटली किंवा कुठल्याशा प्रवासात एका सीटवर बसली होती, तेव्हा जी ओळख झाली ती अगदी कायमीचीच. म्हणजे एकमेकांच्या घरांमधील  सर्व सण-वारांसोबत लग्न सोहळा असो वा आणखीकाही, सर्वांनाच उपस्थित राहू लागतात. ओळख झालेली असते फक्त एखाद्या प्रवासात. मात्र त्यांचे नाते इतके घट्ट होते की ते त्यांची ओळख त्याच प्रवासातल्या वाटेत सोडून येत नाहीत, तर ते नाते जपतात.


जशी चांगली माणसं आपल्याला भेटतात, तशी वाईटही भेटतातच. किंबहुना आताच्या स्वार्थी आणि स्वकेंद्री जगण्यात वाईटांचा आणि स्वार्थी माणसांचाच सुळसुळाट मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अशा लोकांना ओळखून, त्यांना बाजूला ठेवून किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन आपली वाट चालायची असते.


माझ्याप्रमाणे तुमच्याही आयुष्याच्या वाटेत अशी अनेक माणसं भेटली असतील. जी तुमच्या आयुष्याचा भाग बनली असतील किंवा तुमच्या आयुष्यात असे काही तरी केले असणार ज्यामुळे त्यातून काहीतरी शिकला असाल. प्रत्येकाकडे अशा माणसांचा वेगवेगळा अनुभव असेल. कुणाला कुणी मदत केलेली असेल, तर कुणाला फसवलंही असेल. एखादा आपल्या आयुष्याचा भाग बनला असेल तर कुणी आला-काही बोलला आणि निघून गेला, असेही झाले असेल. मात्र अर्ध्या वाटेत सोडून गेलेल्यांचे चांगले वाईट अनुभव गाठीशी ठेवून आपल्या सोबत असणाऱ्यांशी योग्य ऋणानुबंध जपून आपण आपली वाट चालत राहायची असते, हा जगाचा नियमच आहे.



-  नामदेव अंजना काटकर  (प्रतिनिधी, एबीपी माझा)

02 February, 2015

उत्साही तरुणांचा देश

पूर्व प्रसिद्धी- दैनिक ऐक्य (सातारा)

मागील काही वर्षांपासून देशातील विविध मुद्द्यांवर तरुणाई सक्रियता दाखवू लागलेली आपल्याला दिसून येते. मीही याच तरुणाईचा एक सदस्य असल्याने तरुणांच्या भूमिकेबद्दल विवेचन करणं मला गरजेचं वाटतं. कारण देशातील विविध समस्यांविरोधात तरुणाईचा आवाज घुमणं गरजेचं असतं. तरुणाईचा आवाज परिणामकारक असतो...तरुणाईच्या आवाज क्रांतीचा हुंकार असतो...परिवर्तनाची लाट असते. मात्र, स्वातंत्र्यानंतरचं साठ-सत्तरचं दशक किंवा फार-फार तर ऐंशीपर्यंतची दशकं सोडली तर हा हुंकार फार काही दिसला नाही असे जाणकार सांगतात. मात्र आज विविध आंदोलनांमध्ये तरुणांची सक्रियता दिसते व ही सक्रियता खूप महत्त्वाची आहे, असेही समाजातील सजग नागरिकांचं मत आहे. असे म्हटलं जातं की, सज्जनांची निष्क्रियता ही दुर्जनांच्या सक्रियतेला कारणीभूत ठरत असते. त्यामुळे सज्जन तरुणांच्या सक्रियतेला पर्यायाने अधिक महत्त्व प्राप्त होतं. मात्र, गेल्या तीन-एक वर्षांपासून उत्साही तरुणांचा मोठा सहभाग विविध आंदोलनं, निषेध मोर्चांमधून दिसून येतो. आता तुम्ही म्हणाल उत्साही तरुण म्हणजे नक्की काय म्हणायचंय? तर एखदी घटना घडल्यावर त्वरित प्रतिक्रिया देणारे तरुण वाढताना दिसतायेत. तरुणांच्याच भाषेत सांगायचं तर इन्स्टंट रिएक्शन देणारे वाढतायेत. मग ते मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरणारे असो वा घटनास्थळी मूक मोर्चे नेणारे असो किंवा अगदी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कच्या माध्यमातून प्रतिक्रिया देणारे असोत. मात्र हे निषेध मोर्चे, आंदोलने किंवा आणखी काही, हे सारे तडीस घेऊन जाताना आजची तरुणाई दिसत नाही. काही गोष्टींसाठी अटोकाट प्रयत्न करण्याची आणि सातत्याने लढा देण्याची गरज असते व याचीच कमतरता आजच्या तरुणांमध्ये आढळून येते.

जेव्हा आपण देशातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत असतो त्यावेळी त्या संबंधित मुद्द्यावर तरुणांचं मत काय आहे किंवा तरुणांची भूमिका काय आहे हे कायम विचारातच घेणे गरजेचं असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे होताना दिसत नाही. आणि आज जेव्हा हीच तरुणाई रस्त्यावर उतरुन सक्रियपणे आंदोलनात उतरु लागली आहे तेव्हा मात्र तरुणांच्या सक्रियतेवर आपल्याकडचे तथाकथित विश्लेषक चर्चा करु पाहतात. सांगण्याचा मुद्दा हा की आगामी काळात देशात जी काही आंदोलनं करताना, विविध समस्यांवरील भूमिका मांडताना तरुणाईची भूमिका महत्त्वाची असेल.

अण्णा हजारेंचं देशातील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन जेव्हा सुरु झालं तेव्हा देशभरातून सर्वात जास्त पाठिंबा हा तरुण  वर्गाचा होता, हे आपण लक्षात घ्यायला हवं. किंबहुना, तरुणांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणातील सहभागामुळेच अण्णांचं आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आणि प्रभाव पाडू शकलं. काहींनी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून आंदोलनाला पाठिंबा दिला, तर काहींनी विविध राज्यातील त्या त्या ठिकाणच्या तरुणांनी आपापल्या परीने अण्णांच्या आंदोलनात सहभाग दर्शवला. मात्र, त्यानंतर राजकीय आश्वासनं, अण्णांच्या टीममधील फूट वगैरे अशा गोष्टींमुळे आंदोलनाची दिशा भरकटली. मला अण्णांचं आंदोलन तडीस का गेलं नाही, या गोष्टीत शिरायचं नाही. मात्र, या आंदोलनाच्या निमित्ताने देशातील तरुण ज्या संख्येने घराबाहेर पडला, राष्ट्रहितासाठी आवाज उठवला गेला याची विशेष नोंद घेण्याची गरज आहे. या आंदोलनाने एक सिद्ध केलं की तरुणांमध्ये राष्ट्रहिताची प्रचंड भावना आहे. मात्र या आंदोलनानंतर हेच तरुण गायबही झाले. मग या ठिकाणी आपल्याला या प्रश्नावर गांभिर्याने विचार करावा लागतो की आंदोलनात उतरलेली तरुणाई उत्साही तर नव्हती? तर या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने हो असेच मिळते. मनात खदखदत असलेली भ्रष्टाचाराविरोधातील चीड अण्णांच्या रुपाने मोठ्या व्यासपीठावरुन मांडली गेली. त्यामुळे कधीही रस्त्यावर उतरुन आंदोलन, मोर्चे न करणारे तरुणही रस्त्यावर उतरले. ही सारी मंडळी उत्साही होती म्हणून ते आंदोलन संपल्यानंतर कुठेही मोर्चे किंवा पुन्हा आंदोलने करताना दिसले नाहीत. थोड्या अधिक फरकाने असेच दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर होताना दिसलं. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर स्त्रियांच्या सुरक्षेसह एकंदरित सर्वच सुरक्षेचा प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारण्यासाठी तरुणाई पुन्हा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरली. देशातील विविध शहरांत स्त्रियांच्या सुरक्षेसाठी अवघ्या तरुणाईने आवाज उठवला. मात्र इथेही अण्णांच्या आंदोलनासारखंच झालं. अगदी त्याचप्रकारे निर्भया प्रकरणानंतर काही दिवसांनंतर तरुणाईचा हाच बुलंद आवाज शांत झाला.

जश्याप्रकारे उत्साहीपणे तरुणवर्ग आंदोलन किंवा राष्ट्रहिताच्या बाबींमध्ये सहभाग घेतो त्याचप्रकारे निमित्त असल्याशिवायही घेत नाही. तरुणांमधील निमित्तखोरपणा आणि आरंभशून्यता वाढत चाललीय. एखाद्या घटनेचं निमित्त असल्याशिवाय सक्रियता दिसत नाही. आणि जरी सक्रियता दिसली तरी तो संबंधित मुद्दा तडीस जात नाही, याचा अर्थ प्रचंड आरंभखोरपणा वाढतोय. सुरुवातील जो उत्साह असतो त्या उत्साहात सातत्य राहत नाही. मग या साऱ्यांवर मार्ग काय तर तरुणांचा आणि देशातील विविध मुद्द्यांवर लढणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्यांचा तुटत चाललेला संवाद कारणीभूत आहे असे मला वाटतं.

अण्णांचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन असो वा निर्भया बलात्कार प्रकरणानंतरचं स्त्रियांच्या सुरक्षेसाठी झालेलं आंदोलन असो या आंदोलनांनी देशात खूप परिणाम केला. राज्यकर्त्यांना तरुणांच्या आंदोलनांची व संख्येची दखल घ्यावी लागली. याचा अर्थ सरकार काही करत नाही असे नाही मात्र ज्या गोष्टी सरकारपर्यंत आणखी प्रभावीपणे पोहोचवण्याची गरज आहे किंवा त्या संबंधित मुद्द्यावर जलद निर्णयाची अपेक्षा आहे, अशा मुद्द्यांसाठी तरुणांनी आपल्यातला उत्साहीपणा सोडून दिला पाहिजे. आवाज उठवण्यासाठी निमित्ताच्या शोधात न राहता आणि आवाज उठवला गेला तर मुद्दा तडीस नेण्याचीही धमक दाखवण्याची गरज आहे. शेवटी तरुण हेच या देशाचे भवितव्य आहेत. व जगातील सर्वात तरुण देश म्हणून या देशाची ओळख आहे. ती ओळख नुसती तरुण या शब्दापुरती मर्यादित राहता कामा नये, तर ही तरुणांची ताकद देशाच्या हितासाठी उपयोगात आली पाहिजे. त्यासाठी तरुणांनी देशातल्या विविध मुद्द्यांवर सक्रियता दाखवण्याची गरज आहे.

- नामदेव अंजना काटकर  (प्रतिनिधी, एबीपी माझा)

01 February, 2015

हरवत चाललेलं गाव

पूर्व प्रसिद्धी- दैनिक ऐक्य (सातारा)

परवा गावी गेलो होतो. तालुक्याच्या ठिकाणाहून थेट गावात जाणारी गाडी पकडली. खूप दिवसांनी गावाकडे निघालो होतो. एसटीने गावाच्या दिशेला कूच केली. शासनाच्या ह्या लाल डब्याची सफर गेली सहा-सात वर्षे केली नव्हती. आज किती वर्षांना एसटीत बसलो होतो. गाव डोंगरात असल्याने तालुक्याच्या ठिकाणाहून गाडी चढणीला लागली. एसटीतून मागे एकदा टोकावून पाहिलं...तालुक्याचं ठिकाण खूपच ओबड-धोबड वाढलेलं पाहून थक्क झालो. चार-पाच वर्षात हे शहर इतकं पसरावं, याची कल्पना नव्हती. तालुक्याचं ठिकाण शहरीकरणाच्या कचाट्यात सापडलं होतं. पाच-सहाशे दुकानं आणि घरं असलेलं तालुक्याचं ठिकाण आता पाच-सहा हजारांच्या घरात गेलंय. हळूहळू एसटी डोंगराच्या आड गेली..तालुक्याचं ठिकाण दिसेनासं झालं. चार-पाच गावांनंतर माझं गाव. प्रत्येक गावात गाडी थांबत-थांबत चाललेली.. चार गावं गेल्यानंतर गाडी उतरंडीला लागली. लांबूनच नारळीची दोन झाडं स्वागत करताना दिसली. गावाच्या वेशीवर येऊन पोहोचलो.

बारशेतवाले कंडक्टर ओरडला. मी पटापट सामान सीटवर उतरवून घेतला आणि एसटीतून उतरलो. थोडा वेळ एसटी स्टँडवरच थांबलो. गाव खूप बदलल्याचं तिथेच जाणवलं.. एसटी स्टँडवर थांबल्या ठिकाणी मला आठवलं... पूर्वी गावात एसटी आली की, एसटीतनं मुंबईहून कोण आलंय हे पाहायला गावातली तमाम चिमुरडी धावत-पळत यायची. मुंबईहून आलेल्या माणसाचं खूप कौतुक असायचं. मुंबईहून आलाय म्हणजे एक वेगळाच मान गावात मिळायचा. हे सारं आठवत एसटी स्टँडवर उभा होतो. थोड्याट वेळात भानावर आलो. एसटीतून कोण आला हे पाहायला कुणीच आला नव्हता.. आता एसटीचंही विशेष आकर्षण राहिलं नाही.

पूर्वी गावात एसटी आली की गावातील लहान-सहान मुलं एसटी स्टँडच्या दिशेना धावत. एसटी आली...एसटी आली.. असे बोंबळतच आपल्या सवंगड्यांसह गावातील असेल-नसेल तेवढा ताफा एसटी स्टँडवर येई. कोण आलंय मुंबईहून? याची उत्सुकता आम्हा चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर असे. मुंबईहून गावातला कोणी का आलेला असेना, येणाऱ्याच्या घरातल्यांना जितका आनंद तितकाच आम्हा चिमुरड्यांना असे. एसटी थांबली पण नसायची तेव्हा एसटीत कोणी दिसतं का ते पाहणं सुरु असायचं. एसटीतून उतरल्या-उतरल्या त्याच्या हातातलं सामान घेण्यासाठी झुंबड उडत असे. तेव्हा गावात येणारं दुसरं वाहन नव्हतं. एसटी ही एकमेव वाहन होतं जे नेमाने गावात येई. अर्थात ती कधीच वेळेवर नसे मात्र गावतल्यांना दळणवळणाचं ते एकमेव साधन. गावातल्या आम्हा चिमुरड्यांना एसटीबद्दल वेगळं आकर्षण होतं. तालुक्याच्या ठिकाणाहून निघालेल्या एसटीसाठी आमचा गाव शेवटचा स्टॉप असल्याने ड्रायव्हर-कंडक्टर हात-पाय धुण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी एसटी थोडा वेळ थांबवून ठेवत. मग आम्ही मुलं एसटीत चढून धुमाकूळ घालत असायचो.

आज गावाच्या एसटी स्टँडवर उतरलो आणि साधं चिटपाखरुही स्वागताला नव्हतं. गावात आल्यावर एकप्रकारचा पोरकेपणा जाणवला. एसटीबद्दल ती उत्सुकता आता लहान-सहान पोराबाळांमध्ये राहिली नाही. अनेकांच्या घरापुढे दुचाकी लावलेली पाहिल्यावर एसटीवर न आलेल्या चिमुरड्यांच्या मागची कारण मी समजलो. एसटी ही आता फक्त अतिगरीब अशांसाठी राहिलीय की काय असे एका क्षणी मनात येऊन गेलं.

एसटीच्याही अधिक इतर चारचाकींचं गावातल्या आम्हा मुलांना कुतुहल असायचं. गावात चारचाकी आली की गावातली झाडून एकूण एक पोरं-बाळं त्या चारचाकीच्या गोल रिंगण घालून उभे राहायचे. गावात येणारा रस्ता डांबरी नसल्याने गाडी धुरळ्याने माखलेली असायची. माग चारचाकीवर धुरळा बसला की त्यावर आपलं नाव लिहिणं वगैरे चालू व्हायचं. हल्ली तसेही फार काही होत नाही. किंबहुना नाहीच.

गावातल्या चिमुरड्यांना आता चारचाकी, दुचाकीबद्दल फार कुतुहल-बितुहल राहिलं नाही. जग बदललं म्हणजे नक्की काय झालं...तर हे असे.

गवातली पोरंबाळां एसटी स्टँडवर झुंबड करत येतील अशा आशेनं उभा असलेला मी कुणीच न आल्याने सामान उचलला आणि गावात प्रवेश केला. गावाच्या वेशीतून आत गेल्यावर एकप्रकारची स्मशाण शांतता जाणवली. गावात कुणीच नाही की काय? असा भास व्हावा, इतकी शांतता गावात भासली. पूर्वी एसटी आल्यावर मुलं जशी एसटी स्टँडच्या दिशेना धावत, अगदी तसंच गावातली म्हातारी-कोतारी वऱ्हांड्यात येऊन उभी राहायची. कोण आलंय मुंबईतून हे पाहण्यासाठी. मात्र आज ना कुणी म्हातारी-कोतारी ना कुणी चिमुरडे. आपण आपल्याच गावात आलोय ना, हे पडताळून पाहावं की काय, अशी शांतता गावात पसरलेली.

गावातला घरपट माणूस मुंबईत. काहीजण तर गावाला सोडचिठ्ठी देऊन थेट मुंबईतच स्थायिक झालेत. मुलांचं शिक्षण, रोजगार अशी कारणं देत गावाला सोडून थेट मुंबई गाठली आणि तिथेलच झाले. त्यांचंही गावाला येणंजाणं होतं मात्र तेही पाहुण्यासारखं. गाव आता पोरका वाटू लागतो. ऐन संध्याकाळी गावात पोराबाळांता जो धुमधडाका असायचा तो आता होत नाही... गाई-गुरांना गोठ्याकडे ओरडत-ओरडत नेणारा गुराखी कुठे दिसत नाही. बावा, आलास काय मुंबईसून?’ असा डोळे मिचमिचवत, चेहऱ्याचा मुका घेणाऱ्या आजीचा सवाल कानावर पडला नाही. सारं काही वेगळं वाटत होतं. कुणा दुसऱ्याच्या येथे पाहुणा गेल्यावर जे वातावरण असतं, तेच आज गावात वाटत होतं. गेल्या सहा-सात वर्षात किती बदललं ना हे गाव ? मरायला टेकलेले आजी-आजोबा आणि हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच चाळीशी-पन्नाशीतले राहिलेत गावात...नाहीतर बहुतेकांनी थेट मुंबईच गाठली. मुंबईच्या महागड्या खोलीत माय-बापाला जागा नसल्याने त्यांना महिनाकाठी ठराविक रक्कम देऊन गावी ठेवलेले अनेक भेटले. गावगाडा म्हणून काही राहिलाच नाही. असेल तर तसा तो भासलाच नाही.

अखेर घरात शिरलो... घरामागून एक मोठासा गाईचा हंबरडा ऐकायला आला आणि मन तृप्त झालं. गावाकडे आल्याचा हा पहिला भास. जे माणसांनी नाही कळलं ते गाई-बैलांच्या हंबरड्यांनी कळलं. लेका, तू गावाकडे आलायेस रे बाबा असे सांगण्याचाच प्रयत्न त्या गोमातेने हंबरड्यातून केला असावा. इतका काळजात घुसला तो हंबरडा.

ही कथा माझ्याच गावाची नव्हे.. असे अनेक गावं आता ओसाड पडत चाललीत..ओसाड शेतासारखी! जितकं भावनिक व्हायला होतं हे सारं पाहिल्यावर त्याचवेळी चिंताग्रस्तही. गावाकडची मुंबईला जाणारी माणसं काही मौजमजेला जात नाहीत, हे वास्तवही मला आठवलं. गाव सोडून मुंबईसारख्या अफाट गर्दीच्या शहरात जाणारा पोटाची खळगी बुजवण्यासाठीच जातो.. तेव्हा लक्षात येतं गावं ओसाड पडण्याचं कारण. गारपीट, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी या साऱ्यांनी कंटाळलेला शेतकरी पोराबाळांना मुंबईसारख्या शहरात पाठवू लागला आहे. इकडं काही होऊ शकत नाही... ना दोन वेळेचं पोट भरु शकत, अशा मानसिकतेत गावाकडची माणसं दिसली. सहा-सात वर्षांपूर्वी जो गाव मी अनुभवला तसा गाव आता नव्हता.. याची ही दुसरी बाजू होती.

गाव आता पूर्वीसारखा राहिला नाही, गावात आल्यावर पूर्वसारखं वाटत नाही, अशी मी नावं ठेवत असताना मी मलाच एक प्रश्न केलामी तरी कुठे गावाचं गावपण सांभाळायला इथे राहिलो? मी सुद्धा मुंबईच गाठली ना?’
- नामदेव अंजना (प्रतिनिधी, एबीपी माझा)

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...