02 February, 2018

वाचणाऱ्याचे वर्ष



सरत्या वर्षात मी विशेष काय केलं असेन तर पुस्तक खरेदी आणि वाचनातील सातत्य. तुफान खरेदी केली आणि तुफान वाचलंय. 2017 या एका वर्षात शंभरहून अधिक पुस्तकं खरेदी करत, माझ्या किताबखान्यातील पुस्तकांचा पाचशेचा टप्पा पार केलाय.

मिलिंद बोकील, विलास सारंग, अरुण शेवते, जयंत पवार, अवधूत डोंगरे आणि आसाराम लोमटे या माझ्या सर्वाधिक आवडत्या लेखकांची सगळी पुस्तकं किताबखान्यात आणलीयेत. सारंगांची काही वगळली, तर बाकी सर्व वाचूनही झालीयेत.

'मुद्दा आहे जग बदलण्याचा', हे भारत पाटणकर लिखित पुस्तक किताबखान्यात आहे. या पुस्तकाची अनेकांना शोधाशोध असते. फार कुठे उपलब्ध नाही. त्यामुळे त्याचं महत्त्व अधिक आहे. डॉ. कुंदा मॅमनी ते भेट दिलंय. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे, प्रवीण बांदेकरांची 'चाळेगत' कादंबरी. तशी ही कादंबरी सगळ्यांकडेच असेल. मात्र माझ्याकडे असलेल्या या प्रतीची खास ओळख म्हणजे, ती स्वत: बांदेकर सरांनी त्यांच्या स्वाक्षरीनिशी माझ्यासाठी पाठवलीय. ही दोन पुस्तकं यंदा किताबखान्यात विशेष आहेत.

सोबत अनेक लेखक-लेखिकांची पुस्तकं यावर्षी किताबखान्यात आली. तरीही खूप सारी राहिलीयेत. पुस्तक विकत घेऊन वाचण्यात वेगळी मजा असते. आपल्या वेळेनुसार वाचता येतं. वाचण्याचेही काही रेकॉर्ड केले. कुलदीप नय्यर यांचं 'शहीद' हे भगतसिंह यांच्यावरील पुस्तक एका दिवसात वाचून काढलं. त्याचसोबत, 'दिवे गेलेले दिवस' ही रंगनाथ पठारेंची कादंबरीही झपाटल्यासारखी वाचलीय.

वाचतानाचे किस्सेही खूप आहेत. पुस्तकातून फक्त माहिती घ्यायची नसते, तर ते पुस्तक अनुभवयाचं असतं. ते या वर्षात अनुभवण्याचा प्रयत्न केला. पुस्तकाचे निरीक्षण हा एक अभ्यासाचा मुद्दा राहिला. पुस्तकांच्या समर्पण पानावर वेगळा लेख होऊ शकतो, इतकी छान निरीक्षणं आहेत. म्हणजे, पुलं वगैरे कसे कुठल्यातरी व्यक्तीला पुस्तक अर्पण करायचे. तसे सर्वच लेखक करत नाहीत. काही लेखक क्रिएटिव्हिटी दाखवतात. वेगळेपण दाखवतात.

म्हणजे एक उदाहरण सांगायचं तर, नागराज मंजुळेंनी 'उन्हाच्या कटाविरुद्ध'च्या समर्पण पानावर "या शुभ्र कागदासाठी" असे लिहिलंय फक्त. किंवा जयंत पवार लिखित 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' पुस्तकाच्या समर्पण पानावर लिहिलंय, "कधीही न पाहिलेल्या आईस... तू नसतीस तर जन्माची कथा इथवर आली नसती, तू असतीस तर आशयासाठी इतकी वणवण झाली नसती."

एकंदरीत पुस्तकं ही वाचण्यासोबत अनुभवण्याची गोष्ट आहे, असे म्हणतात ते खोटं नाही. ही अनुभवण्याची, निरीक्षणाची प्रोसेसही भारीय. वाचनातला आनंद अफाट आहे.

नव्या वर्षात आणखी पुस्तकं खरेदी करायची आहेत. आणखी वाचायचंय.

जीजी...



समाजवादी कसा दिसतो, हे चित्ररुपाने कुणाला सांगायचं झाल्यास, मी जीजींचा फोटो समोर करेन. पांढरीशुभ्र दाढी, खादीचा कुर्ता, पायजमा, चेहऱ्यावरील मनमिळाऊ भाव आणि बोलण्यातील कमालीची आपुलकी....

कालच म्हणजे 30 तारखेला जीजींनी वयाची 93 वर्षे पूर्ण केली. इतक्या खाच-खळग्यांचा, आड-वळणांचा प्रवास असताना, आजही जीजी 'वृद्ध' झाले नाहीत. ते वाढत्या वयानुसार आणखी नव्या उमेदीने विचार मांडतात, बोलतात. त्यांच्यातला उत्साह थक्क करणारा आहे.

1940 साली जीजी परीख मुंबईत आले. सेंट जॉर्ज कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत. तेव्हा ते अवघ्या 16 वर्षांचे होते. त्याच काळात देशात स्वातंत्र्याचा लढा यशाकडे मार्गस्थ झाला होता. 1942 च्या 7 आणि 8 ऑगस्टला मुंबईत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मिटिंग होती. गांधीजींनी 'छोडो भारत'ची घोषणा दिली. आणि गांधीजींच्या विचारांनी भारावलेले जीजी सक्रीयपणे लढ्यात उतरले.

स्वत:च्या कॉलेजमध्ये ब्रिटिशांविरोधात तीन दिवसीय बंद पुकारला. त्याची निदर्शनं म्हणून चर्चगेट स्टेशनला जाऊन रेल्वे रोखल्या. यात जीजींना पोलिसांनी पकडलं आणि त्यांना तुरुंगात डांबलं. 18-19 वर्षांच्या जीजींना पहिल्यांदा 10 महिन्यांचा तुरुंगवास झाला. पुढे लोकांच्या प्रश्नांसाठी तुरुंग वगैरे त्यांना नेहमीचे झाले.

1947 साली ते स्टुडंट काँग्रेसच्या मुंबई भागाचे अध्यक्ष होते. ते मूळचे समाजवादी विचारांचे होते. त्यामुळे ते राजकीय पक्षापासून फारकत घेत, पुढे आपल्या विचारांवर जगण्याचा निर्णय घेतला आणि पक्षीय राजकारणापासून दूर राहत लोकांसाठी ते कायम लढत राहिले.

सहकारी चळवळी असो वा कामगार संघटना, किंवा खादी चळवळ असो, जीजींचं योगदान बहुमोल आहे. अर्थात, त्यांनी या सर्व कार्याचा गवगवा कधीच केला नाही. सत्कार-समारंभ-गौरव वगैरे गोष्टींपासून ते कोसो दूर राहिले. आपल्या सत्ताकेंद्रांनाही जीजींची महती कळली नसावी. हे जीजींचं दुर्दैव नव्हे, तर आपले दुर्दैवं आहे.

आज खादीचा प्रचार-प्रसार आपणच सुरु केल्याचा आव आणत काहीजण चरख्यासोबत फोटो-बिटो काढतात. अशांना आठवण करुन द्यावी वाटते, जीजींनी खादी आणि खादीमागचा विचार स्वत:च्या आयुष्यात भिनवला. ते आजही खादीचे कपडे परिधान करतात. 1970 च्या दशकात तर त्यांनी 'Make Khadi a fashion' हा विचार मांडला होता.

30 डिसेंबर 1924 रोजी सौराष्ट्रमधील (गुजरात) सुरेंद्र नगरमध्ये जन्मलेल्या जीजींनी महाराष्ट्र आपली कर्मभूमी मानली. इथेच ते राहिले. त्यांचं अविरत सुरु असलेलं कार्य आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे युसुफ मेहर अली सेंटर. पनवेलजवळील तारामध्ये आहे. तिथे गेल्यावर आपल्याला कळून येतं की, ग्रामस्वराज्याची कल्पना कशी प्रत्यक्षात आणता येते.

याच युसुफ मेहेरअली सेंटरमध्ये जीजींना भेटण्याचा योग आला होता. गांधींजी आणि विनोबा भावेंसोबत काम केलेल्या या व्यक्तीसोबत बोलताना अवघडल्यासारखं झालं होतं, पण जीजींनी बोलण्यातून असे काही आपलसं केलं की, आमची जन्मोजन्मीची ओळख असावी. आपल्याकडे असलेली माहिती, अनुभव आणि विचार समोरच्यापर्यंत पोहोचवण्याची त्यांची उत्सुकता, आवड आणि तळमळ वाखणण्याजोगी आहे.

जीजींनी काल वयाची 93 वर्षे पूर्ण केली. जीजी, तुमच्या निरोगी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा !

अरविंद सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि काही नोंदी




'पत्रास कारण की...' या अरविंद जगताप सरांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम छान झाला. विशेष म्हणजे, अरविंद सर आणि सयाजी शिंदेंची प्रत्यक्ष भेट झाली. आपल्या आवडत्या माणसाच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहता आलं, याचा आनंद आहे. बाकी पुस्तकावर वाचल्यावर लिहिनच.


कालच्या काही महत्त्वाच्या नोंदी -
▪️ 'पत्रास कारण की..' हे पुस्तक कीर्तीच्या प्रांगणात विक्रीसाठी ग्रंथालीच्या वतीने एकजण फिरत होता. आणि त्याने पोस्टमनचे कपडे परिधान केले होते. एक वेगळी कल्पना होती. फारच आवडली.

▪️ अरविंद सरांच मनोगत अर्थातच आवडलं. शिवाय माधुरी शेवतेंचं मनोगतही छान झालं.
▪️ सयाजी शिंदेंना पुस्तक, वाचन या प्रांतावर बोलताना पहिल्यांदाच ऐकलं. त्यांनी अत्यंत उत्तम भाषण केलं. भगतसिंगचा फाशीआधीचा लेनिनचे पुस्तक वाचण्याचा प्रसंग सांगत बोलण्यास सुरुवात केली, मग अरविंद सरांचं लेखन, स्वत: वाचलेली पुस्तकं, विचारविश्व, भेटलेले-आवडलेले लेखक, शंकर पाटील, विद्रोही साहित्य इत्यादी अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. विशेष म्हणजे, भाषणातील पुढील मुद्दा जोडताना मधे एखादा किस्सा सांगण्याची त्यांची हातोटी प्रचंड आवडली.
▪️ रमेश भाटकर यांच्या भाषणाने निराशा केली. पुलं किंवा फास्टर फेणे, आणि फार फार तर विंदांच्या कविता, या पलिकडे ते सरकायलाच तयार नव्हते. शिवाय जग केवळ मस्त मस्त आहे, असेच लेखन त्यांनी वाचल्यासारखे त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरुन वाटले. असो. प्रत्येकाच्या आवडीचा एक प्रांत असतो.
▪️ काल कीर्तीच्या वडापावच्या दुकानाबाहेर मुकेश माचकर सर आणि राम जगताप सरांना वडापाव खाताना रंगेहाथ पकडलं. जगताप सरांना याआधीही भेटलेलो. पण माचकर सरांना पहिल्यांदाच भेटलो.
▪️ भेटू भेटू म्हणता म्हणता भेट होत नव्हती. पण नेमके पुस्तकांशी संबंधित कार्क्रमातच अचानक भेट झाली. ती म्हणजे कवी सुशीलकुमार शिंदेंची. सुशील यांचं 'शहर आत्महत्या करायचं म्हणतंय...'मधल्या कविता आरपार भिडल्या होत्या. त्यावर लिहिलंही होतं. सुशीलची भेट एक चांगली घटना काल घडली.
▪️ दत्ता बाळसराफ यांना पहिल्यांदाच भेटणं झालं. बोलायला वेळ कमी मिळाला, पण थोडं निवांत बोललो.दत्ता सरांना पुन्हा भेटायचंय.
▪️ नरेंद्र लांजेवार सरांची भेट सुखद धक्का देणारी होती. मी त्यांना प्रत्यक्षात कधी पाहिलं नव्हतं. आणि फेसबुकवरची मंडळी प्रत्यक्षात वेगळीच दिसतात, म्हणून ओळखलंही नाही. नंतर मग काही वेळ बोलता आलं. नरेंद्र सरांचे वाचन आणि ग्रंथालय यासंदर्भातील काम वाखणण्याजोगं आहे.
▪️ कीर्ती कॉलेजच्या गेटपासून ग्रंथालीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी जो मार्ग होता, त्याच्या दोन्ही बाजूस कवितांचे बॅनर लावण्यात आले होते. त्यातल्या कवितांची निवडही अत्यंत उत्कृष्ट अशी होती.

▪️ आणि सर्वात महत्त्वाचे काम केले, ते म्हणजे पुस्तक खरेदी. ग्रंथाली प्रकाशनाची पुस्तकं विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. नव्यानेच प्रकाशित झालेली पुस्तकं खरेदी केली - 'या फुलपाखराचं काय करायचं?' (लेखिका - राधिका कुंटे), 'श्रेय ज्याचे त्यास द्यावे' (लेखिका- माधुरी अरुण शेवते), 'भग्न आस्थेचे तुकडे' (गझलकार - चंद्रशेखर सानेकर आणि अर्थात 'पत्रास कारण की...' हे अरविंद सरांचं पुस्तक.

तहसील ऑफिसातला कवी



सातबाऱ्याशी संदर्भात माहितीसाठी आमच्या रोहा (रायगड) तहसील ऑफिसला गेलो होतो. तसे तिकडे जाणे फार होत नाही. पण हल्ली फेऱ्या वाढल्यात. काम झाल्यावर निघालो. तळमजल्यावर बाहेर जाणाऱ्या गेटजवळ एका व्यक्तीने थांबवले आणि विचारले, "तुम्ही नामदेव अंजना ना?"

मी आचंबित होत होकारार्थी मान डोलावली. थोडा गोंधळलो. कारण या व्यक्तीला मी तर कधी भेटलो नव्हतो. मी काही विचारायच्या आधीच त्या व्यक्तीने आपली ओळख सांगितली. ते होते रोहा तहसील ऑफिसमधले अधिकारी. कूळवहिवाट विभागाचं काम ते पाहतात.

"माझी ओळख कशी?", असे विचारण्याआधीच त्यांनी सांगितलं, "तुमचं लेखन वाचतो, छान लिहिता." खरंतर लेखनामुळे जोडली गेलेली माणसे कमी नाहीत. पण हे व्यक्तिमत्व काहीसे वेगळे होते.

तहसील ऑफिसच्या गेटपाशी उभ्या-उभ्या झालेली ती १०-१५ मिनिटांची भेट. पुढे खूप दिवस भेट झाली नाही. पण माझ्या नीट लक्षात होतं. आता काही दिवसांपूर्वी म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गावी गेलो, तेव्हा खास वेळ काढून तहसील ऑफिसला जाऊन, दुसऱ्या मजल्यावर डोकावलो.

खरंतर कार्यालय जरी चकचकीत असले, तरी आजूबाजूला लालफितीने बांधलेल्या जुनाट फाईली, सारख्या फेऱ्या घालाव्या लागतात म्हणून त्रासलेल्या लोकांच्या रांगा, गप्पा मारत काम करणारे कर्मचारी आणि तहसीलदार असल्याच्या आवेशात फिरणारे ऑफिस बॉय किंवा शिपाई वैगरे. या साऱ्या महौलात कुणाला कविता वैगरे सुचेल याची सुतराम शक्यता वाटणार नाही. पण इथल्या एका व्यक्तीने या साऱ्या शक्यता चूक ठरवत, कवितांची आवड जोपासली आहे, नुसती जोपासली नाही तर कवितासंग्रह सुद्धा प्रकाशित केला आहे. रोहा तहसील ऑफिसमधील या कवीचे नाव आहे संजय माने.

संजय माने सर हे सध्या रोहा तहसील ऑफिसमध्ये कार्यरत आहेत. अत्यंत सहृदयी आणि विनम्र व्यक्तिमत्व. साहित्याची प्रचंड आवड आणि नवनवीन काही करण्याची ओढ. त्यामुळे अशा व्यक्तीची भेट होऊन ते माझ्या मित्रसंग्रहात येणार नाहीत, असे कसे होईल?

यावेळच्या भेटीत तर आम्ही तहसील ऑफिसमध्येच मैफल भरवली. चाय पे कविता वैगरे टाईप. लालफितीच्या गराड्यात काव्याची मैफल बहुधा पहिल्यांदाच भरली असावी. त्यात संजय माने यांच्या भावणाऱ्या आणि भिडणाऱ्या अर्थपूर्ण कविता. वाह...!

'अनुराधा' हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. प्रेमाचा चेहरा आणि प्रेमाचाच आत्मा असलेल्या या कविता मनात घर करतात. ओळीगणिक दाद द्यावी वाटते. प्रेम, निसर्ग, नाती, भावना इत्यादी गोष्टी संजय माने यांच्या कवितांच्या केंद्रस्थानी असतात.

प्रेम शब्दाचा अर्थ मांडताना त्यांनी लिहिलेल्या एका कवितेतील या ओळी किती नेमक्या आहेत पाहा :
"विश्वासाच्या चिरेबंदी पायावर
आपुलकीच्या मजबूत भिंती
त्यावर एकमेकांच्या काळजीचं
चांदणं पांघरणारं छप्पर"

सकारात्मक ऊर्जा देणारे शब्द आपल्या झोळीत घेऊन फिरणाऱ्या आणि भेटलेल्या प्रत्येक वाटाड्याला सकारात्मक करणाऱ्या या माणसाला भेटून प्रचंड आनंद झाला. वयाचे प्रचंड अंतर असले तरी मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधणारे संजय माने नामक सृजनशील व्यक्तिमत्व नक्कीच माझ्या मित्रसंग्रहातील हिरे आहेत.

इतिहासाचं क्लिनिक



आपल्या आयुष्याच्या अकाऊंटमध्ये अशी काही माणसं असतात, ज्यांच्याकडे जगणं समृद्ध करणाऱ्या गोष्टींचा खजिना असतो. आणि या माणसांना आपण जेव्हा कधी भेटतो, तेव्हा तेव्हा ते आपल्याला समृद्ध करत असतात. अशा माणसांप्रती कधी अभिमान वाटतो, कधी कमालीचं अप्रूप वाटतं, कधी प्रचंड कौतुक वाटतं, कधी पराकोटीचा आदर वाटतो, तर कधी हे सारं एकत्रित वाटतं. आमच्या रोह्यात (रायगड) डॉ. श्रीनिवास वेदक नामक असेच एक 'विद्यापीठ' आहे.

पेशाने डॉक्टर असलेली संशोधक वृत्तीची ही व्यक्ती म्हणजे माणुसकीचा झरा. वेदक सरांचा एकंदरीत जीवनपट उलगडला की अचंबित व्हायला होतं. खऱ्या अर्थाने अष्टपैलू म्हणावं असे व्यक्तिमत्व.

आमच्या रोह्यातल्या मोरे आळीत डॉ. श्रीनिवास वेदक क्लिनिक आहे. इथे केवळ वैद्यकीय भोवताल नसतं, तर इंजेक्शन आणि गोळ्यांच्या पॅकेट्सच्या आजूबाजूला इतिहासाची असंख्य पुस्तकेही दिसतात. किंबहुना या पुस्तकांमागून औषधं डोकावत असतात, असे म्हटले तरी अतिरंजित ठरणार नाही. वेदक डॉक्टरांच्या कलीनिकमध्ये गेल्यावर वाटतं हे 'हिस्टरी रिसर्च रुम-कम-डॉक्टर्स क्लिनिक' असावं!

वाचक, लेखक आणि कुणाही संशोधी वृत्तीच्या माणसाला मोहात पडेल, असे आहे डॉ. वेदक क्लिनिक. डॉक्टर म्हणून ओळख नंतर आधी इतिहास अभ्यासक म्हणून ते स्वतःची ओळख करून देतात.

१९४५ चा जन्म आणि १९६९ साली डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करुन आधी तळा शहरात आणि नंतर गेली ३४-३५ वर्षे रोहा शहराला आपली कर्मभूमी समजून इथे प्रॅक्टिस करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रासह इतिहासात अफाट रस असणाऱ्या, नुसता रस नव्हे तर या दोन्ही क्षेत्रात भरीव कामगिरी करून बहुमोल योगदान देणाऱ्या वेदक सरांची काम करण्याची ऊर्जा पाहून माझ्यासारख्या तरुणाला प्रचंड अप्रूप वाटतं.

सध्या वय वर्षे फक्त ७२ आहे. यातला 'फक्त' शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्याशी बोलताना यामागचा अर्थ कळून येतो. वय हे फक्त सांगण्यासाठी असते, हे त्यांनी सिद्ध केलंय. कारण वयाच्या ७२ व्या वर्षीही ते एखाद्या तरुणाला लाजवेल या नव्या दमाने, ऊर्जेने काम करतात.

परवा गावी गेलो, त्यावेळी न विसरतो वेदक सरांच्या कलीनिकमध्ये डोकावलो. पुस्तकांशी संबंध असलेल्या माणसाला ते ५-१० मिनिटात सोडत नाहीत. मग तो पेशंट का असेना! मी तर खूप दिवसांनी भेटायला गेलेलो, त्यामुळे चांगल्या अर्धा-पाऊण तास गप्पा मारल्या.

आमच्या मूळचे रोह्याचे असलेल्या सी. डी. देशमुखांवर वेदक सरांनी 'महाराष्ट्राचा कंठमणी : सी. डी.देशमुख' हे पुस्तक लिहिलंय. ते आऊट ऑफ प्रिंट असल्याने, त्यांच्याकडे एखादी कॉपी आहे का विचारायचं होतं.. पण मग गप्पा मारता मारता इतिहासात पोहोचलो. रायगडचा ५०० वर्षांपूर्वीचा इतिहास तोंडपाठ. संदर्भ वैगरे सर्व. अफाट ज्ञानी माणूस !

या माणसाशी बोलताना, हे गेली ४४ वर्षे डॉक्टर आहेत हे आपण विसरून जातो आणि जन्मापासून इतिहास संशोधक आहेत, असेच वाटू लागते. रोहा आणि बाजूच्या तळा तालुक्याची डिक्शनरी म्हणजे डॉ. वेदक. केवळ रस्ते आणि पायवाटा नव्हे तर या तालुक्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमीही तोंडपाठ.

असे म्हणतात ना, आर के लक्ष्मण यांची एखादी रेघसुद्धा कुठलेतरी चित्र असायचे, गुलजारांचे प्रत्येक वाक्य म्हणजे एखाद्या शयारीची ओळ असते, तसेच डॉ. वेदक सरांचे बोलणे म्हणजे ज्ञानाची गंगा... प्रत्येक वाक्यात माहिती, तीही नवीन, कुतुहलजनक, उत्सुकता वाढवणारी, प्रगल्भ अन् समृद्ध करणारी!

वेदक सरांचे कार्य प्रचंड आहे. आमच्या डोंगरकुशीतल्या गावांवर त्यांचे प्रचंड उपकार आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे इथल्या अनेक तरुण तरुणींना उच्च शिक्षणाचे धडे गिरवता आले. तळा तालुक्यातील द. ग. तटकरे महाविद्यालयाचे ते अध्यक्ष आहेत. शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी सुद्धा त्यांनी प्रचंड काम केले आहे, आणि अजूनही करता आहेत.

अजून खूप लिहिता येईल. डॉ. वेदक हे शब्दात न मावणारे व्यक्तिमत्व. अशा अभ्यासू आणि सेवाभावी व्यक्तींचा वारसा माझ्या मातीला असल्याचे सांगताना अभिमानाने ऊर भरुन येतो.

समतेचं वारं प्यायलेली पाखरं



सत्तेला एका मर्यादेच्या पलिकडे टीका सहन होत नसते. टीकेमुळे आधीच स्थायी स्वभावाने असुरक्षित असणारी सत्ता अस्थिर होऊ लागते. त्यामुळे टीका करणाऱ्यांची आपसूकच गळचेपी सुरु होते. आणि लोकशाही व्यवस्था अपरिहार्यपणे कमकुवत होण्यास सुरुवात होते.

लोकशाही ही अथांग आभाळासारखी आहे. तिथे ताकदवान अन् अजस्त्र गिधडाचेच राज्य असून चालत नाही, एखाद्या नाजूक मखमली फुलपाखरालाही तितक्याच मुक्तपणे आणि निर्धास्तपणे विहारता आले पाहिजे.

अर्थात, गळचेपी याच सत्तेच्या काळात सुरु झालीय, असे मानण्याचे काही कारण नाही. याधीही होत होती. अगदी अनादी काळापासून.

स्वातंत्र्योत्तर भारतात ज्या काही सत्ता या देशात आल्या, मग काँग्रेस असो व अन्य, त्यातल्या सर्वांनीच गळचेपी केलीय. अर्थात त्यांचे संदर्भ त्या त्या वेळी वेगळे होते आणि त्या त्या सत्तेशी संबंधित होते.

तुम्हा आम्हाला माहीत असलेल्या गोष्टीच्या अंगाने बोलू. खैरलांजी घटनेसंदर्भात उर्मिला पवार आणि इतर कार्यकर्त्या ज्यावेळी मंत्रालयात आंदोलन करायला गेल्या होत्या, त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यात डांबून, त्यांना नक्षलवादी घोषित करण्याचे पराक्रम झाले होते. सत्ता होती आघाडी सरकारची आणि दिवंगत आर आर पाटील तत्कालीन गृहमंत्री होते. आता फक्त नक्षलवादी ऐवजी देशद्रोही ठरवले जात आहे. फरक टर्ममधील आहे. सत्तेची प्रवृत्ती सारखीच आहे.

मग आताच इतकी आरडा-ओरड का? तर त्याचेही उत्तर स्पष्ट आहे. आता ही गळचेपी करण्याची डेअरिंग आणि इंटेंसिटी तीव्र झालीय. त्यामुळे सारा माहौल चिंताग्रस्त आहे.

अशावेळी, 'बुडत्याला काठीचा आधार' ही म्हण म्हणजे या वर्तमानाचं यथायोग्य चित्रण ठरेल. लोकशाही नामक जहाज गटांगळ्या खात असताना, या जहाजावर बक्कळ पैसा कमवून पुन्हा अभिव्यक्ती आणि जनहिताच्या बाता मरणाऱ्यांची गर्दी असताना, कुठेतरी आधाराची काठी बनत आशेचा किरण डोकावतो. मग कान्हैयाचा रुपाने असेल, किंवा हार्दिक, अल्पेश वा जिग्नेश.

आपापल्या समाजाचे नेते असले, तरी त्यापलिकडेही ते बोलताना दिसतात. अनिर्बंध सत्तेचे वाटेकरी असलेल्या घातकी तोफांसमोर निधड्या छातीने बिनधास्त उभे राहतात. वर्तमानात हेही नसे थोडके.

एकेकाळी सत्तेला आपल्या इशाऱ्यावर नाचवणारे सुद्धा या सत्तेपुढे मान खाली घालून उभे असताना, ताठ मानेने चॅलेंज देणारे हे चेहरे नक्कीच दखलपात्र ठरतात. वैचारिक बैठक काही जन्मजात नसते, अनुभवातून अन् कालौघात ती बैठकही तयार होते. मात्र नेत्तृत्व अपरिपक्व आहे म्हणत ते नाकारु नका.

नव्या दमाच्या या नेत्यांना अधिक परिपक्व होण्यास वेळ देत, जेव्हा कधी आवाज दाबला जाईल तेव्हा आपण आवाज उठवला पाहिजे.

आणि निरंकुश सत्तेच्या हव्यासापोटी या नव्या किरणांना रोखू पाहणाऱ्यांना उद्देशून ज. वि. पवार यांच्या चार ओळी नमूद कराव्या वाटतात :

समतेचं वारं प्यायलेली पाखरं
त्यांना असं डांबू नका..
तुरुंगासह उडून जाणारच नाहीत
अशा भ्रमात राहू नका..

जिग्नेश, संसदीय राजकरणातल्या संघर्षासाठी शुभेच्छा !

वुई विल फाईट विथ लव्ह !



सद्यस्थिती पाहता प्रेमाने वैगरे राजकारण केले जाऊ शकते, यावर तिळमात्र विश्वास बसत नाही. केरळपासून जम्मूपर्यंत आणि महाराष्ट्रापासून ईशान्य भारतापर्यंत देशाला उभं- आडवं हिंसेने ग्रासलं आहे.

सत्तेतले हिंसेला प्रोत्साहन देत आहेत अन् विरोधातले हिंसेसाठी चिथावत आहेत. हिंसेच्या या भयंकर गर्तेत लोकशाही नामक आदर्शवादी गोष्ट पार घुसमटून गेलीय. हतबल झालीय.

एकंदरीत भोवताल काहीसा निराशाजनक आणि चिंतातूर असताना, देशातील वन ऑफ द लार्जेस्ट आणि वन ऑफ द ओल्डेस्ट पक्षाचा नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणतो - "I am inviting youngsters to come & join us, We will fight with love."

बरं तो इथेच थांबत नाही. विरोधी पक्षाला देशातूनच हद्दपार करण्याची भाषा वापरणाऱ्यांना उद्देशून हा माणूस म्हणतो - "We consider the BJP as our brothers and sisters, even though we do not agree with them"

विरोधी मताचा आदर करत आपल्या राजकीय जीवनातलं महत्त्वाचं पाऊल टाकणाऱ्या राहुल गांधींकडून आशा नक्कीच द्विगुणित झाल्या आहेत.

राहुल गांधींना राजकीय संघर्ष म्हणवा तितका करावा लागला नसला, तरी राजकारणामुळे त्यांना नकळत करावा लागलेला मानसिक संघर्ष नक्कीच मोठा होता. आणि तो संघर्ष या देशाच्या गोष्टींशी संबंधित होता. त्यामुळे या माणसाचे नव्या जबाबदारीवर स्वागत करताना काही न पटणाऱ्या गोष्टीही अलगद गळून पडतात.

बाप आणि आजीची हत्या, ओळख लपवून घालवलेलं सारं बालपण अन् पंचविशी-तिशीतला ऐन उमेदीचा काळ, सतत भीतीच्या सावलीतला भोवताल... असलं जिणं जगलेल्या माणसाला कुठल्या मानसिक संघर्षातून जावं लागलं असेल, याची कल्पना केलेलीच बरी. किंवा कल्पना तरी करु शकू की नाही, हीसुद्धा शंका आहेच.

असल्या मेंटली स्ट्रगल असणाऱ्या जगण्यातून आलेल्या आपल्या लेकाला जेव्हा माय म्हणते - "बचपन में राहुल ने अपार दुख झेला है. मुझे उसकी सहनशीलता और दृढ़ता पर गर्व है.".. तेव्हा सोनिया गांधी आपल्या मुलाचं किती नेमक्या शब्दात वर्णन करतात अन् भावना मांडतात, हे कळून चुकतं.

अर्थात, आगामी संकटं भावनेच्या पलिकडची आहेत. रिव्हॉल्युशनरी चेंजेस काँग्रेसमध्ये आणावे लागणार आहेत. विरोधातली तीन-साडेतीन वर्षे लोटल्यानंतरही पक्षांतर्गत असणारी मरगळ अन् सुस्तपणा झटकून टाकावा लागणार आहे, सोनिया गांधींच्या हाताबाहेर जात काळ्या पैशाच्या आहारी गेलेल्या अनेक नेत्यांना पुन्हा वठणीवर आणावं लागणार आहे, अतिउत्साही तरुण पिढीला नव्या आशांसह ठोस कार्यक्रम दाखवावा लागणार आहे, केवळ भाषणातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून शांत-संयमी वर्तन दिसणं गरजेचं आहे... एक ना अनेक आव्हानांनी राहुल गांधींचं भविष्य भरगच्च भरलंय.

आव्हानं पेलण्यासाठी प्रशांत किशोर टाईप आर्टिफिशियल इमेज बनवणारी माणसं कामाची नसतात, त्यासाठी सच्ची माणसं असावी लागतात. ती सुदैवाने मनमोहन सिंह असोत वा प्रणव मुखर्जी असोत, यांच्या सारख्यांच्या रुपाने राहुल गांधींच्या आजूबाजूला आहेतच. त्यामुळे नक्कीच त्यांचा फायदा राहुलना होणार आहे, यात शंका नाही.

सरतेशेवटी एकच... राहुलजी, सत्य आणि अहिंसेची कास सोडू नका. कदाचित त्यामुळे भविष्यातील निवडणुकीच्या तराजूत झुकतं माप मिळणार नाही, पण भविष्यात लिहिल्या जाणाऱ्या इतिहासात झुकतं माप मिळेल, एवढं नक्की.
नव्या जबाबदारीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा !

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...