10 August, 2017

ही भविष्याची नांदी आहे!


जवळपास १९० ते १९५ गावांना फटका बसेल, जर सरदार सरोवराची उंची वाढवली गेली तर. म्हणजे सुमारे ४५ हजार कुटुंब विस्थापित होतील. घराला वितभर भेग पडली, तर हतबल व्हायला होतं. इथे तर ४५ हजार कुटुंबांच्या डोक्यावरचं छप्परच जाणाराय... काय हतबलता असेल त्यांची! 

याच लोकांसाठी मेधा पाटकर गेली १२ दिवस आंदोलन करतायेत. तेही उपोषण करुन. म्हणजेच अहिंसेच्या मार्गाने. बारा दिवसांपासून इतक्या मोठ्या संख्येतील लोकांचा आवाज बनलेल्या मेधा पाटकरांची किमान विचारपूस करावी किंवा चर्चेसाठी तरी पुढे यावं, इतकंही मध्य प्रदेश सरकारला वाटू नये?

'आम्हाला फरक पडत नाही', या भयंकर मानसिकतेत आणि अहंकरात शिवराज सि़हांसोबत सगळेच सत्ताधीश बुडत चाललेत. हे तुमच्या-आमच्या आणि अखंड देशाच्या दृष्टीने घातक घटनांची चाहूल आहे.

लोकांच्या प्रश्नावर मेधाताई लढतायेत. आणि मेधाताईंवर विश्वास ठेवून स्थानिकांनी न भुतो न भविष्यति पाठिंबा दिलाय. अर्थात, मेधा पाटकर सेटलमेंटवाल्या आहेत, असं वाटणारेही आहेत आजूबाजूला. पण त्यांना सिरियस घेण्यात अर्थ नसतो. कारण सार्वजनिक जीवनात झोकून देणं कधीच न जमलेलेच मेधाताईंवर बिनबुडाचे आरोप करत फिरतच असतात. असो. आणि तसंही, एका रात्री जेवायला मिळालं नाही की रात्रभर या कुशीवरुन त्या कुशीवर होणारे १२ दिवसांच्या उपोषणावरही टीका करतात, हेही विशेषय.

तर बारा दिवस उपोषण सुरु असतं. मेधा ताईंची तब्येत खालवते. ही बातमी वार्‍यासारखी पसरते. सोशल मीडियासह सगळीकडेच पडसाद उमटू लागतात. आणि मग अचानक पोलिस उपोषणस्थळी दाखल होतात. दांडक्यांना टोकदार खिळे लावून. पोलिसांची अरेरावी सुरु होते. अर्थात अरेरावीमागचा मास्टरमाईंड कोण असेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज होतो. तसं लाठीचार्ज हा काही मास्टरमाईंडला मोठी गोष्ट नाहीय. व्यापममध्ये एकामागोमाग एक असे दसपटीत माणसं गूढरित्या मारली जातात, तिथे खिळे टोचून केलेल्या लाठीचार्जचं काय घेऊन बसलात!

मेधाताईंना प्रचंड पाठिंबा मिळतोय. लोक आपल्याला अडवू शकतात. म्हणून अटकेसाठी शेकडो पोलिसांचा सशस्त्र फौजफाटा आणला जातो आणि पोलिस व्हॅनऐवजी त्यांना अॅम्ब्युलन्समधून नेलं जातं. सोबत आणखी ११-१२ कार्यकर्ते पकडले जातात.

काय सुरुय हे?
काय समजायचं याला?

प्रश्न साधे आहेत :

- विस्थापितांची सोय करुनच प्रकल्प पुढे न्या, या मागणीत चूक काय?
- लोकांचा आवाज अहिंसेच्या मार्गाने बुलंद करणं, चूक आहे का?
- उपोषण हे कम्पलिटली अहिंसात्मक आंदोलन असतानाही सरकार लाठीचार्जचे आदेश कसं देतं?
- मेधा पाटकरांसारखी कार्यकर्ती उपोषणाला बसलेली असतानाही साधी चर्चा करु वाटू नये? हा सरकारचा निगरगट्टपणा म्हणायचा की सत्तेच्या नशेचा माज?

दोस्तहो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपली शोधायचीयेत आणि किमान पाठिंब्याची भूमिका तरी ठरवायचीय.

आणि हो... अहिंसेची गळचेपी करणाऱ्या या घटना तुम्हा-आम्हाला दिसतात तितक्या प्रासंगिक नाहीत. या घटनांचे पडसाद भविष्यातही उमटतील. त्यामुळे याकडे त्याच भविष्याची नांदी म्हणूनच बघायला हवं. 


02 August, 2017

‘मिस्टर. वॉट्सन... कम हेअर.. आय वॉन्ट टू सी यू”

ग्राहम बेल आणि माबेल

आईला कानाचा त्रास. दोन भावांचा फुफ्फुसाच्या आजाराने मृत्यू. पत्नीही कर्णबधीर. चार मुलं. त्यात दोन मुली आणि दोन मुलं. दोन्ही मुलांचा अकाली मृत्यू.... इतकं सारं भयानक जगणं. मानसिकरित्या खचवणारं. मात्र आपल्या अफाट ज्ञानाच्या, सृजन कल्पकतेच्या आणि अखंड सचोटीच्या जोरावर त्या अवलियाने जगाचे दोन कोपरे आवाजाने जोडण्याच्या यंत्राचा शोध लावला. त्यांच नाव अलेक्झांडर ग्राहम बेल!

ग्राहम बेलबद्दल अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. सर्वच सांगता येत नाहीयेत. पण जितक्या मला माहितीयेत. जितक्या माझ्या वाचनात आल्या आहेत, त्या सांगतो. मुळात ग्राहम बेल ज्याला आपण म्हणतो, त्याचं मूळ नाव अलेक्झांडर. वयाच्या दहाव्या वर्षी आपल्या इतर भावांप्रमाणे नाव आणि आडनावाच्या मधे नाव लावण्याचं वडिलांना सूचवलं, वडिलांनी परवानगी दिली आणि तेव्हापासून अलेक्झांडरचा अलेक्झांडर ग्राहम बेल झाला. पुढे ग्राहम बेल म्हणूनच परिचित झाले.

अलेक्झांडरचं वैयक्तिक आयुष्य प्रचंड खडतर राहिलं. मेंटल लेव्हलला. घरी तशी फार खाच-खळग्यांची स्थिती नव्हती. पण समस्यांचीही कमी नव्हती. टेन्शन्स काही कमी नव्हते. आई कर्णबधीर होती. दोन भाऊ होते.  मेल्विले जेम्स बेल आणि एडवर्ड चार्ल्स बेल. मेल्विले मोठा. त्याचा जन्म 1845 चा आणि एडवर्डचा 1867 चा. तर ग्राहमचा जन्म 1847. दोन्ही भावांचा अकाली निधन झाला. दोघांनाही फुफ्फुसाचा आजार झाला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. मेल्विले वयाच्या 23 व्या वर्षी, तर एडवर्ड वयाच्या 19 व्या मृत्यू पावला. आता अलेक्झांडर मेल्विल्ले बेल आणि एलिजा ग्रेस या दाम्पत्याचं एकच मुल जिवंत होतं, ते म्हणजे अलेक्झांडर ग्राहम बेल.

अलेक्झांडरचं कुटुब स्कॉटलँडमधलं. एडिनबर्ग हे त्याचं जन्मगाव. 16 साऊथ शेर्लोट स्ट्रिटवर त्याचं घर होतं. आता हा परिसर अलेक्झांडर ग्राहम बेलचं जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे. ग्राहम बेलला टोपणनाव अॅलेक होतं. ते फार कुणाला माहित नव्हतं. अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळीच टोपणनावाने हाक मारत. बाकी सगळे अलेक्झांडरच. पुढे टेलिफोनचा शोध लावल्यानंतर अलेक्झांडरवरुन ग्राहम बेल म्हणूनच नाव प्रसिद्ध झालं.

ही सारी ग्राहम बेलची बेसिक माहिती. मला त्याच्या पुढच्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट होता. त्यासाठी अनेक लेख वाचले. संदर्भ शोधले. खूप मस्त, कुतुहलजनक माहिती मिळाली. ते कुठे साठवून न ठेवल्याने, जितकं आठवतंय, तेवढ्या माहितीवर सांगतो.
लहानपणापासून कर्णबधीरांबद्दल वेगळी आपुलकी होती. सहानुभूती होती. कदाचित स्वत:ची आईच त्या त्रासातून जात असावी म्हणून असेल. पुढे थोडा मोठा झाल्यावर तो कर्णबधीरांना शिकवू लागला. बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्र या विषयावर तो लेक्चर घेत असे. तिथेच त्याला स्वरयंत्र तयार करण्याचं वेड लागलं. तो रोज स्वरयंत्र बनवण्याचे प्रयत्न करत असे.

तिथेच एक माबेल ह्युबार्ड नावाची विद्यार्थिनी होती. ग्राहम बेल यांना ती आवडू लागली. बेल यांच्या शोधाविषयी तिला कळल्यावर तिनेच ओठांच्या हालचालीतून वाचता येणं, हाच कर्णबधीरांसाठी उत्तम पर्याय असल्याचे सांगितले आणि बेल यांचा शोध त्या दिशेने गेला. टेलिफोनच्या शोधाच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल होतं. संवादाच्या जगात क्रांती घडवणारा तो क्षण होता.

आणि हो, माबेल हुशार होती, सुंदर-देखणी होती. ग्राहम बेल तिच्या प्रेमात पडले. माबेल श्रीमंत घरातली होती. त्यामुळे सुरुवातीला बेल यांची डेअरिंग झाली नाही. अर्थात प्रेमाबाबत ते सर्वसामान्यांसारखेच होते. त्यामुळे टेलिफोनच्या शोधानंतर जेव्हा ते रातोरात स्टार झाले, तेव्हाच त्यांनी तिच्या घरी मागणी घातली.

माबेल ही गिल्बर्ट होवे ग्रोस्व्हेनर यांची मुलगी. गिल्बर्ट हे कुणी साधेसुधे नव्हते. फोटोर्जनालिझमचे जनक त्यांना म्हटलं जातं. अगदी तुम्हा-आम्हाला कळेल, अशी ओळख सांगायची तर ते नॅशनल जिओग्राफिकचे पहिले पूर्ण वेळ संपादक होते. पुढे ते नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचे अध्यक्षही झाले.

तर माबेल 5 वर्षांची असताना तिला स्कार्लेट फिव्हर झाला होता. म्हणजे 1862 साली. त्यात तिला कानाचा त्रास सुरु झाला आणि तिने ऐकणंच गमावलं. ती कर्णबधीर झाली. मात्र, तिच्यातील डिसिजनी तिच्यावर मोठा इफेक्ट झाला. रात्रीचं चालणं तिला मुश्किल व्हावं, असा त्रास सुरु झाला. म्हणजे बॅलन्स डिसऑर्डर. चालायला लागली की तोल जायचा. असं म्हणतात की, माबेल हीच ग्राहम बेलच्या टेलिफोन बनवण्यातल्या गतीमागची प्रेरणा होती. स्वरयंत्रापासून टेलिफोन बनवताना शोधाची दिशा बदलून टेलिफोनच्या दिशेने जाणं, तेही माबेलमुळे... हेही या प्रेरणेला दुजोरा देतं.

असो. काहीही असो. कुणीही प्रेरणा देवो. पण ज्या प्रेरणेतून, कल्पकतेतून ग्राहम बेलने टेलिफोनचा शोध लावला, तेही अफाट आहे. त्या शोधाबाबतही काही रंजक असे किस्से आहेत.

मुळात टेलिफोनच्या शोधाचा दिवसही अफलातून होता. खरंतर टेलिफोनचा शोध अमूक-तमूक दिवशी, अगदी तारखेसह आपण सांगत असलो, तरी त्यामागे अनेक दिवसांची मेहनत होती. तीही अविरत.

10 मार्च 1876 चा दिवस. ग्राहम बेल एका खोलीत आणि दुसऱ्या खोलीत त्यांचे मित्र वॉट्सन होते. दोघेही आपापल्या संशोधनात गुंतले होते. दोघेही यंत्रांची जोडणी वगैरे करत होते. त्यावेळी पहिलं यश मिळालं. त्याचेही वेगळे किस्से सांगितले जातात. त्यात किती तथ्य हे माहित नाही. मात्र, दुसऱ्या खोलीत बसलेल्या वॉट्सनशी पहिलं वाक्य बोलले, ते होतं – “Mr. Watson--come here--I want to see you.”

... हे वाक्य जगाच्या इतिहासातलं पहिलं वाक्य, जे टेलिफोनवर बोललं गेलं.

बस्स... जगातल्या संवादक्रांतीचं हे पहिलं पाऊल. टेलिफोनचा जन्म आणि त्यावरील संभाषण हे असं होतं. पुढे 1915 मध्ये जेव्हा अमेरिकेच्या पूर्व आणि पश्मिम समुद्रकिनाऱ्यांना जोडणाऱ्या टेलिफोन लाईनच्या उद्घाटनासाठी ग्राहम बेल गेले होते. कार्यक्रम न्यूयॉर्कमध्ये होता. त्यावेळी त्यांना टेलिफोनवर बोलूनच उद्घाटन करण्यास सांगितले गेले. त्यावेळीही त्यांनी वॉट्सन या आपल्या सहकारी मित्रालाच फोन केला आणि म्हणाले, “Mr. Watson, come here, I want you.”. तेव्हा समोरुन वॉट्सन हे हसले. वॉट्सन त्यावेळी सॅन फ्रान्सिस्कोला होते. अडीच ते तीन हजार किलोमीटर अंतरावर. अफाट दूर असलेले दोन ठिकाणं आवाजानं जोडण्याचं काम ग्राहम बेल यांनी केलं.

अरे हो.. याताल वॉट्सन म्हणजे नक्की कोण, असाही तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? तर तेही सांगतो. तोही काही ऐरागैरा नव्हता. त्याचाही इतिहास मोठा आणि प्रसिद्ध असाच आहे.

वॉट्सनचं पूर्ण नाव थॉमस जॉन वॉट्सन सिनियर. 1874 सालचा जन्म आणि 1956 चा मृत्यू. अमेरिकन उद्योगपती. तुम्हा-आम्हाला ती IBM कंपनी माहितीय ना? तीच ओ.. इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स. येस.. त्या कंपनीचा 1914 ते 1956 या काळात वॉट्सन हे चेअरमन आणि सीईओ होते. वॉट्सन यांचाही आणखी वेगळा आणि रंजक इतिहास आहे. हा माणूसही मोठा होता. असो.

तर पुढे टेलिफोनचा शोध लागल्यानंतर ग्राहम बेल यांनी गिल्बर्ट यांना म्हणजे माबेलच्या वडिलांकेड माबेलसाठी मागणी घातली. त्यावेळी ग्राहम बेल प्रसिद्धीच्या शिखरावर होते. जगभर त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे गिल्बर्ट यांनी नकार देणं अशक्यप्रायच गोष्ट होती. पुढे लग्न झालं. लग्नावेळी माबेल ही ग्राहम बेल यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होती. माबेल आणि ग्राहम बेल यांना एकूण चार मुलं झाली. त्यात दोन मुलं आणि दोन मुली. मात्र, दोन मुलं जन्मानंतर मृत्यू पावली.

तर वैयक्तिक आयुष्यातले खाच-खळगे पेलत त्यांनी पुढेही संशोधन सुरु ठेवलं. आपण त्यांना फक्त टेलिफोनचा शोधकर्ता म्हणून ओळखतो. मात्र, ग्राहम बेल यांनी आणखीही अत्यंत महत्त्वाचे शोध लावले. त्यामध्ये, मेटल डिटेक्टर, फोटोफोन वगैरेही संशोधन त्यांचंच. अंगभूत अफाट संशोधनवृत्ती असलेला हा माणूस होता.

एकंदरीतच ग्राहम बेल यांचं आयुष्य प्रचंड चढ-उताराचं, तितकंच प्रेरणेचं, तितकंच दु:खाचं, तितकंच आनंदाचं असं खूप काही होतं. सर्वच एका लेखात मांडणं शक्य नाही. जितकं जमेल तितका प्रयत्न केलाय.

आणि काळाचा तो दिवस आलाच. 2 ऑगस्ट 1922. रात्रीचे 2 वाजले होते. आजाराने त्रस्त झालेले ग्राहम बेल झोपले होते. थकवा, श्वास घेण्यास त्रास अशा नाना त्रासांसह ते विव्हळत होते. बाजूला माबेल बसली होती. एका क्षणी माबेल म्हणाली, "Don't leave me".. दुसऱ्या क्षणाला ग्राहम बेलने नकारार्थी मान डुलवली आणि तिसऱ्या क्षणाला त्याने प्राण सोडला. जग एका महान शोधकर्त्याला मुकला. जगाला अंतराचं बंधन झुगारुन बोलायला शिकवणारा ग्राहम बेलला कायमचा अबोल झाला होता.

ग्राहम बेलला श्रद्धांजली म्हणून अवघ्या अमेरिकेने तेव्हा एक मिनिट टेलिफोन बंद ठेवले होते. बेलला यापेक्षा मोठी श्रद्धांजली काय असू शकत होती?

टेलिफोनचा शोध लावणाऱ्या अलेक्झांडर ग्रॅहम बेलच्या एका इन्स्पिरेशन वाक्याने समारोप करायला आवडेल. तो म्हणतो, “Concentrate all your thoughts upon the work at hand. The sun's rays do not burn until brought to a focus.”... हे वाक्य कुणा मजेत कसं जगावं, हसत कसं राहावं, अशी पुस्तकं लिहिणाऱ्याने सांगितलेलं नाही. तर ते सांगितलंय, जगाच्या दोन कोपऱ्यांना जोडण्याचा अखंड ध्यास घेऊन टेलिफोन नावाच्या यंत्राचा शोध लावून माईलस्टोन व्यक्तीमत्त्वाचं... अर्थात ग्रॅहम बेलचं.

विनम्र अभिवादन बेल!

संदर्भ

31 July, 2017

नियोगींच्या शोधात!



चार पाच वर्षांपूर्वी. म्हणजे कॉलेजला असताना वगैरे. गिरिजा गुप्ते मॅडमनी शंकर गुहा नियोगींवर वाचन करायला सांगितलं होतं. गिरिजा गुप्ते म्हणजे साठ्ये कॉलेजच्या सोशोलाॅजीच्या हेड. आणखी मोठी ओळख सांगायची तरत्या कामगार नेते कॉ. वसंत गुप्तेंच्या कन्या. तर त्यांनी नियोगींवर वाचायला सांगितले. त्यांनी जाणीवपूर्वक संदर्भपुस्तकांची नावं वगैरे काहीच दिली नाहीत. म्हणाल्यातुझं तू शोध आणि वाच. त्या शोधण्याच्या प्रोसेसमध्येही खूप काही गवसेल. आयते संदर्भ दिले तर शोधण्याच्या प्रोसेसमधील ज्ञान गमावशील. 

झालं.. म्हटलं आता हे नियोगी कुठे भेटतीलमग गूगलबाबाकडे गेलो. वीकिपिडियावर माहिती मिळाली. पण तीही त्रोटक. मग डोकं आणखी भणभणायला लागलं. म्हटलं काय फाल्तूगिरीय रावगिरीजा मॅडमने नाव सांगावं एखद्या व्यक्तीचं आणि त्याच्याबद्दल इंटरेनेटलाही माहिती नसावी! 

त्या काळात दादरच्या मुंबई मराठी संदर्भ ग्रंथसंग्रहालयात आठवड्याला दोन-तीनदा येणं जाणं होत असे. कॉलेज सुटल्यावर कामावर दांडी मारुन दादर गाठलं. तिथे ते दाढीवाले काका असायचे. अजूनही असतात बहुधा. ते दाढीवाले काका कधी हसतच नसत. कायम धीरगंभीर चेहरा. पुस्तकांची खडान् खडा माहिती. तिथले कम्प्युटर आता आलेपण या काकांना कुठल्या रकान्यात कुठलं पुस्तक आहेते करेक्ट माहिती असे. अजूनही असेलच अर्थात. 

तेव्हा सात रुपये दिवसाचे द्यावे लागत. आता दहा रुपये झालेत. कदाचित आणखी वाढलंही असेल. वर्षभरात गेलोही नाही. असो. तर रिसिट घेतल्यावर म्हटलंशंकर गुहा नियोगींवर काहीही हवंय. 

नियोगींवर फार काही मिळेल वाटत नाही. त्यांना म्हटलंजे आहे ते द्या. कारण नियोगी कोण प्राणी आहेइथपासूनच माझ्या अज्ञानाची सुरुवात होती. त्यांनी सुरुवातीला कुठलंसं मॅगझिन आणलं. १९९३ चा अंक. कव्हरची दोन्ही पानं गळून पडली होती. कुठलंसं साप्ताहिक होतं. त्यात एक लेख नियोगींवर होता. हर्डीकरांनी लिहिलेला. रिपोर्ताज टाईप. 

संदर्भ ग्रंथसंग्रहालयाच्या वर पंखा असलेल्या जागी खिडकीपाशी एकदम हवेशीर बसलो. लेख वाचायला सुरुवात केली. अंगातली धडधड वाढली. वाचनाच्या उत्सुकतेचा वेग वाढत गेलातस तसा वाचनाचाही वेग वाढला. हुश्श....  लेख संपला.

शंकर गुहा नियोगी आता डोक्यात-ह्रदयात-मनात शरला. फिट बसला. आता हा नियोगी बाहेर निघत नाही. झापटलंय नियोगीने. 
घरी आलो. दुसर्‍या दिवशी कॉलेजला गेलो. तेव्हा गिरिज मॅडमना नियोगींबद्दल काय माहिती मिळालीयाचा इतिवृत्तांत दिला. त्यांना हलकासा आनंद झाला. मग त्यांनी पहिला संदर्भ दिला. म्हणाल्यारंगनाथ पठारेंनी शंकर गुहा नियोगींवर रिसर्च करुन पुस्तक प्रकाशित केलंय. 

शोधमोहीम रंगनाथ पठारेंच्या साहित्याकडे वळली. कुठून कळलं माहित नाहीगोरेगावच्या केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने पठारेंचा दस्ताऐवज प्रकाशित करण्यात आल्याचं कळलं. केशव गोरे स्मारकात येणे-जाणे नित्याचे असते. स्नेहल पंगेरकर नावाची मैत्रीण होती. ती आणि मी इथल्या लायब्ररीत तासन् तास वाचत बसायचो. त्यामुळे तिथले काका ओळखीचे होते. 

दुसर्‍या दिवशी केशव गोरे गाठलं. रिसर्च डाॅक्युमेंटेशन मिळवलं. आणि तिथल्या तिथे वाचायला सुरुवात केली. अफाट.. अद्भुत.. अचंबित करणारा संघर्ष! 

शंकर गुहा नियोगी... गांधींपेक्षाही अस्सल गांधीवादी. जुलमी-अत्याचारी भांडवलदारीला आव्हान देत खाण कामगारांसाठी लढा उभारत असतानाही डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर घेऊन आंदोलनं. इतका अहिंसावादी भारताच्या संघर्षशाली इतिहासात क्वचितच कुणी झाला असावा. रंगनाथ पठारेंनी नियोगींचं सारं आयुष्यसंघर्ष कट टू कट चितारलंय. 

त्या काळात देशात दोन कामागार नेत्यांची प्रचंड चर्चा होती. त्यात एक होते गिरणी कामगारांचा संप घडवणारे डॉ. दत्ता सामंत आणि दुसरे होते खाण कामगारांसाठी लढणारे शंकर गुहा नियोगी. दत्ता सामंतांनी केलेला संप आशियातील सर्वात मोठा संप ठरला. मात्र, नियोगी याहून वेगळे होते. या दोघांमध्ये बेसिक फरक असा होता की, नियोगींना वैचारिक बैठक होती. वाचन, सामाजिक जाण, निरीक्षण असे विविध गुण त्यांच्या अंगात होते. मला तर ते गांधींपेक्षाही गांधीवादी वाटतात. 

छत्तीसगडमधील दल्ली राजहरा हे मुळातच खाणींचा परिसर म्हणून ओळखला जातो. इथले बहुतेक सगळेच लोक खाणीत काम करणारे. मात्र, खाण मालकांनी कधीच या लोकांच्या जगण्याप्रति संवदेनशीलता दाखवली नाही. कधीच त्यांच्या दुखण्या-खुपण्याकडे गांभिर्याने पाहिलं नाही. खाण मालकाइतकेच शासन-प्रशासनाने ‘जाणीवपूर्वक’ दुर्लक्ष केलं. त्यामुळे लहान मुलांसह गर्भवती महिलांना प्रचंड आजारांना, त्रासाला सामोरं जावं लागे. मुळातच खाणींमुळे नाना समस्यांना तोंड द्यावं लागे.

एकदा खाणीतच काम करणाऱ्या कुसुमबाई नावाच्या महिलेवर नीट उपचार झाले नाहीत आणि तिचा मृत्यू झाला. त्यावेळी कुठलाही उतावीळपणा न करता त्यांनी अत्यंत अहिंसेचा मार्ग शोधला आणि इथल्या 109 कामगारांच्या मदतीने एका गॅरेजमध्ये हॉस्पिटल सुरु केलं. आजही 5 ते 50 रुपयांत उपचार येथे होतात. संघटनांच्या बळावर आणि समाजसेवी वृत्तीच्या माणसांवर तीन मजली हॉस्पिटल कामगारांच्या भल्यासाठी सरुच आहे. अहिंसेच्या मार्गाने खाण मालकांना दिलेलं हे एक उत्तर होतं.

पुढे अहिंसेच्याच मार्गावर चालत नियोगींनी अनेक आंदोलनं केली. खाण कामगारांच्या आरोग्याचे, त्यांच्या मुला-बाळांच्या शिक्षणाचे, हक्क-अधिकारांचे मुद्दे घेत मोर्चे काढले. आवाज उठवला. मात्र, कुठेही कसली कुणाला दुखापतही केली नाही. 70 च्या दशकात खाण कामगारांच्या बोनससोबत इतर मागण्यांसाठी जवळपास 10 हजारांहून अधिक कामगारांना घेऊन ते रस्त्यावर उतरले. आपल्या मागण्यांच्या घोषणा दिल्या. मात्र शासन-प्रशासनाने झोपेचं सोंग घेतलं होतं. अशा वेळी कुणाचीही तळपायाची आग मस्तकात जाईल, मात्र नियोगींनी इतका मोठा लोकसमूह शांतपणे सांभाळला. त्यांच्या इतका कुशल संघटक, विचारी नेता पुढेही कुणी झाला नाही, होणार नाही.

कमाने वाला खाएगा’ असे म्हणत अहिंसेच्या मार्गाने खाण कामगारांसाठी आवाज उठवणाऱ्या शंकर गुहा नियोगींची 28 सप्टेंबर 1991 च्या रात्री काळोखात गोळी मारुन हत्या करण्यात आली. ती कुणी केली, हे स्पष्ट होतं. खाण कामगारांना गुलामांची वागणूक देणाऱ्या खाण मालकांना अहिंसेच्या मार्गाने जेरीस आणणाऱ्या निशस्त्र नियोगींना शस्त्राने संपवलं गेलं. नियोगी हे जुलमी भांडवलदाऱ्यांचे स्वतंत्र भारतातील पहिले बळी ठरले.

नियोगींच्या अंत्ययात्रेत अलोट गर्दी होती. तळागाळातील माणसं होती. असं म्हणतात, छत्तीसगडच्या इतिहासात कुणाच्याच अंत्ययात्रेत इतकी माणसं नव्हती, तितकी नियोगींच्या अंत्ययात्रेत होती. ती सारी नियोगींनी कमावलेली माणसं होती. जोडलेली माणसं होती. ज्यांच्यासाठी लढला, ते सारे तेव्हा एकवटले होते. ‘लाल हरा झंडा जिंदाबादनियोगी भैया जिंदाबाद’, या घोषणेने छत्तीसगड हळवं झालं होतं. तळागाळातल्या माणसांच्या दु:खाला आपलं दु:ख समजून त्याला फुंकर घालणारा असा कामगार नेता होता.

खरंतर नियोगींबद्दल खूप लिहिता येईल. नियोगी हा नुसता शब्द एका लेखात डोळ्यांसमोर आला आणि नियोगींबद्दल वाचनासाठी केलेले प्रयत्न आणि नियोगींचं आयुष्य डोळ्यांसमोर तरळू लागलं. खरंतर हे त्रोटकच सांगितलं. यापेक्षा अधिक संघर्षमय असं जगणं नियोगींचं होतं. एकदा नक्की जाणून घ्या. नियोगी खरा ‘माणूस’ होता.

नामदेव अंजना | www.namdevanjana.com

30 July, 2017

आय लव्ह यू सनी लिओनी!



जगाची पर्वा करु नये वगैरे बाता मारुन मारुन अनेकजण थकतात. इनक्लुडिंग मी. पण प्रत्यक्षात प्रसंग येतो त्यावेळी लोक काय विचार करतील, याचाच विचार करत बसतो. मग ते लोग क्या कहेंगे, ये भी हम सोचेंगे, तो लोग क्या सोचेंगे?’ असले कधीकाळी उर बडवून हाणलेले डायलॉग विसरुन जातो आणि लोकांचाच विचार करुन पाय पुढे-मागे सरकवत बसतो. अशा प्रसंगांवेळी मला सनी लिओनी खूप उजवी वाटते.

पॉर्न स्टार म्हणून प्रसिद्धीस आलेली सनी लिओनी पुढे भारतात येऊन बॉलिवूडमध्ये नशीब अजमावते आहे. मात्र, इथेही तिला अनेकदा भेदांना सामोरं जावं लागलं. तिने तशी जाहीर खंतही व्यक्त केली होती. मात्र कुठेही न खचता, तिने आपलं करिअर सुरुच ठेवलं. एकामागोमाग एक सिनेमे येत राहिले आणि देशाच्या कानाकोपऱ्यात ती पोहोचली. आता कुठे अवॉर्ड शोमध्ये वगैरे तिला प्रस्थापित बॉलिवूडकर एखाद्या कोपर्‍यात जागा देऊ लागले आहेत. हेही काही बॉलिवूडचे उपकार नाहीत. तर सनी लिओनीने स्वतःला सिद्ध केल्यानंतरचे पडसाद म्हणता येईल.

भारतात सनीला पॉर्न स्टारच्याच अँगलने पाहिले गेले. अजूनही तिचा उल्लेख पॉर्न स्टार ते बॉलिवूड स्टारअसाच होतो. ही किचकट कट्टर भारतीय मानसिकता आहे. एखाद्या व्यक्तीला लेबल लावले की पुढच्या प्रतिक्रिया देणं त्यांना सोपं जातं. पण सनी लिओनीने याची कधीच पर्वा केली नाही.

“Only GOD will judge! Life is short, Lets make the most of it.”,
हे सनी लिओनीचं ट्विटरवरील स्टेटस तिच्या एकंदरीत भूमिकेकडे अधिक प्रखरतेने लक्ष केंद्रित करणारं आहे. सर्वशक्तीमान असलेला ईश्वर ठरवेल, मी चूक आहे की बरोबर. आणि फक्त तोच ठरवेल. असं तिला म्हणायचंय. याचाच दुसरा अर्थ असाय की, तुम्ही ठरवायचं नाही. मला हे खूप क्रांतिकारी वाटतं. एकीकडे पाय घसरुन पडल्यावर आपल्याला कुठं लागल़य का हे पाहण्याआधी, आपल्याला पडताना कुणी पाहिलं तर नाही ना, हे पाहणरे आपणतर दुसरीकडे आपल्या तत्त्वांवर जगणारी सनी लिओनी. आपण जे करतो, ते आपल्यादृष्टीने योग्य आहे ना, हे ती पडताळून पाहते. जग काय विचार करतं, हे तितकं महत्त्वाचं नसतं. सनी लिऑनने हे सूत्र तिच्या आयुष्यापुरतं चांगलं अंगिकारलं आहे.

पॉर्न स्टार असणं चांगलं की वाईट किंवा ते नैतिक की अनैतिक वगैरे भानगडीत पडत नाही. ते ठरवायला आपण आहोत. विशेषत: भारतीय तर आहेतच. नैतिक-अनैतिक ठरवण्यात आपला हात धरणारा दुसरा तरबेज कुणी नसावा. असो.

भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारे कृत्य वगैरे बोलून आपण तिला देशद्रोही लेबल लावून पाकिस्तानचा रस्ता दाखवला नाही, ही खूपच मोठी गोष्टय. नाहीतर हल्ली छोट्या छोट्या गोष्टींवरुन हकालपट्टीच्या गोष्टी होतात. घरावर दगडफेक वगैरे होते. तसं अजून सनीबाबत झालं नाही, हेही बरंच आहे म्हणायला हवं.

भारतीय सिनेसृष्टीत एन्ट्री केल्यानंतर सनी लिओनीने अनेक सिनेमे इंटिमेट सीन असणारे केले. ते चाललेही. जे विकतं ते तेच तिने केले. पण याचा साईड-इफेक्ट असा झला की, आधीच पॉर्न स्टार ही ओळख, त्यात बॉलिवूडमध्ये आल्यानंतरही ओन्ली अॅडल्टफिल्म्स करणंयामुळे तिची इमेज पॉर्न स्टारपासून वेगळी होऊ शकली नाही. उलट ती इमेज आणखी गडद झाली. त्यात सिनेमांच्या पलिकडे जाऊन सनी लिओनी काय सामाजिक कामं करते किंवा काय तिची भवतालावर काय मतं आहेत, हे आपण कधीच पाहिले नाही. किंवा तशी आपल्याला गरज भासली नसावी. कारण सनी लिओनी म्हणजे ओन्ली अॅडल्ट’. इथवरच आपण मर्यादित राहिलो. ती काय चांगलं करेल, याची अपेक्षाच मनात नसावी. पण सनी लिओनीच्या गेल्या काही वर्षातील भूमिका पाहिल्या की, तिच्यातील संवेदनशीलतेचं आणि माणुसकीचं दर्शन होतं.

गेल्या कित्येक वर्षांपासून सनी लिओनी पेटाया प्राण्यांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या संस्थेसोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या जोडली गेली आहे. देशात जिथे जिथे प्राणमात्रांवर अत्याचार होतात, त्यांना मदत हवी असते, त्यासाठी पेटामार्फत मदत करणं किंवा त्यासंदर्भातील धोरणांसाठी सोशल मीडियातून आवाज उठवणं असेलसनी लिओनी कायम पुढाकार घेते. हे तुम्हा-आम्हाला जमण्यासारखं नाहीय. कारण त्यासाठी अस्सल माणसाचं काळीज लागतं. तरच त्यात प्रत्येक सजीवाप्रती संवेदनशीलता येते. सनीमध्ये ती आहे. फक्त आपल्या कुजकट मानसिकतेने तिला पॉर्नच्या पुढे पाहिलंच नाही. तिच्या याच संवेदनशील अंगाला आणखी दुजोरा देणारी घटना गेल्या आठवड्याभरातलीच. ती म्हणजे मुलगी दत्तक घेणं होय.

जवळपास दोन वर्षांपूर्वी सनी लिओनी आणि तिचा पतीन डॅनियल वेबरने एका अनाथ आश्रमला भेट दिली होती. त्यावेळीच त्यांनी मुलगी दत्तक घेण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर महिना-दीड महिन्यापूर्वी सनी लिओनी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लातुरात येऊन गेली. तेव्हा तिच्या संवेदनशील नजरेने एका चिमुकल्या परीला हेरुन ठेवलं होतं. ती कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा तिच्या बिझी शेड्युलमध्ये गुंतली. त्यानंतर पुन्हा लातुरात गेली आणि त्या चिमुकल्या परीला थेट दत्तकच घेतलं.

शाहरुख, करण जोहर, तुषार कपूर वगैरे मंडळी मुलगा किंवा मुलीसाठी सरोगसी किंवा टेस्ट ट्युब बेबीचा आधार घेत असताना, जिला पॉर्न स्टार म्हणून मेन-स्ट्रीमपासून झिडकारत राहिलो, त्या सनी लिओनीने आपलं पहिलं मुल दत्तक घेतलं. तीही मुलगी. आणि त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे लातूरमधील उदगीरसारख्या ग्रामीण भागातील. हेही नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. आता इथेही खुल्या दिलाने तिचं किती स्वागत होईल, हा मुद्दा आहेच. पण तिला त्या कौतुकाची वगैरे गरज नाही. ती कौतुक आणि टीकेच्या पलिकडे जाऊन विचार करणारी आहे. जगणारी आहे, हेच तिने यातून दाखवलं आहे.

आपलं अपत्य गुटगुटीत, सोज्वल, गोरापान वगैरे असला पाहिजे, ही व्यक्त न होणारी सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असतेच. पण या तथाकथित सुप्त इच्छेलाही सनी लिओनीने फाटा देत, वर्णभेदाच्या पेकाडात लाथ हाणत मुलीची निवड केली. मुळात इथेही मुलीची निवड तिने केली असंही म्हणता येणार नाही. कारण तिनेच म्हटलंय की, मुलीची निवड आम्ही केली नाही, तर मुलीनेच आमची निवड केलीय. निशा असं गोड नावही ठेवलंय.

सनी, इतकं मोठं मन घेऊन आलीस भारतात. पण तुला इथल्या कोत्या मनाने कायमच तथाकथित संस्कृतीच्या फूटपट्टीवर मोजू पाहिली. ते किती निर्बुद्ध आहेत, हे तू तुझ्या कृतीतून दाखवून दिलंस.

आणि हो, सनी, जग काय म्हणेल, या गोष्टीला तू कायमच फाट्यावर मारुन जगतेस. विशेष म्हणजे जग सारं तुला तुझ्या भूतकाळानेच ओळखू पाहत असलं, तरी तुझ्या भविष्याची वाटचाल ठळकपण दाखवून दिलीयेस, हे कुणी आता पाहत नसलं.. तरी ते नक्कीच महत्त्वाचं आहे. आज ना उद्या याचे सकारात्मक पडसाद तुझ्या प्रवासावर नक्की उमटतील.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनाथ चिमुकली दत्तक घेऊन तू जे पाऊल उचललं आहेस, ते नक्कीच कौतुकास्पद आहे. तुझ्यातल्या आईला सलाम!

अनेक नायिका नटापटा करुन मिरवत असतात. त्यातल्या अनेक केवळ सुंदर दिसणार्‍या आण चकमकीत लाईट्समध्ये झगामगा करणाऱ्या असतात. त्यांच्यापेक्षा तू किती वेगळी आहेस, या झगमगाटी दुनियेच्या पलिकडे तुझ्यातली संवेदनशीलता किती जपलीयेस, हेच तू चिमुकल्या निशाला दत्तक घेऊन दाखवलंयेसया क्षणी अगदी मनापासून म्हणावं वाटतंय, आय लव्ह यू सनी लिओनी!


सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...