19 September, 2015

महिपत बाबाने निरमा साबण खाल्ला तो दिवस!

एकुलत्या एका लेकाला मोठं करावं, त्याला हवं-नको ते सर्व द्यावं, हर एक लाड पुरवावं आणि लेकाने मोठा झाल्यावर बायका-पोरांचा बि-हाड घेऊन मुंबई गाठावी. अल्का कुबलच्या एखाद्या शोकात्म सिनोमात शोभावी अशी महिपतबाबाची ही वेदनादायक कहाणी.

ज्या काळात लेकाने घरी बसून पोसायला हवं, त्या काळात पायाने नीट चालताही येत नाही तरीही महिपतबाबा पहाटे सहाच्या ठोक्याला शेताच्या बांधावर पोहोचत असे. आयुष्यभर मेहनत करुन अंगाचा काडा झालेला. त्याला मेहनतीचा कंटाळा नव्हता. शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट करण्याची तयारी होती. 'शेताच्या बांधावरच जीव घे रे बाबा' असं आकाशाकडे पाहत बोलताना महिपतबाबाला मी स्वत: कित्येकदा पाहिलं होतं. महिपतबाबाला दु:ख याचं होतं की, ज्या लेकाला तळहातावरच्या फोडीप्रमाणे जपलं त्या लेकाने असा धोका द्यावा? हाडाचा काडा करुन दिनरात मेहनत करुन शिकवलेल्या पोराने पटदिशी आपल्याला लाथ मारुन मुंबईला निघून जावं? काय कमी केलं त्याच्यासाठी? अशा नाना प्रश्नांनी महिपतबाबा गहिवरुन येत असे. पण या प्रश्नांची उत्तरं द्यायला त्याचा मुलगा त्याच्याजवळ नव्हता.

पाण्याची एक कळसही उचलणं शक्य नाही, एवढी म्हातारी झालेली बायको आणि पाय लटपटण्याच्या काळात शेतात राबणारा महिपतबाबा मरेपर्यंत राबत राहिला. अगदी आठवडाभर पलंगावर पडला असेल आणि तिथेच त्याने जीव सोडला.

माझ्या घरासमोरच घर असल्याने महिपतबाबा कायम डोळ्यादेखत असायचा. न कळण्याचं ते वय होत माझं. पण काही गोष्टी पाहिल्या, ज्या मनावर मोठा आघात करुन गेल्या. आठवणींच्या गाठोड्यात त्या घटना बांधून ठेवल्या आहेत.

मी नववीला होतो. २००७ चं वर्ष असेल. शाळेत जाण्याची तयारी सुरु होती. घरासमोर ओरड सुरु झाल्याचा आवाज आला. घराच्या पडवीत गेलो तव्हा कळलं महिपतबाबाच्या पडवीत चार पाच बायका गोंधळ घालतायेत. अशा गोंधळाच्या ठिकाणी कायम प्रत्यक्षदर्शी म्हणून उपस्थित राहण्याची हौस असलेला मी धावत पळत महिपतबाबाच्या पडवीत पोहोचला. खूप गर्दी जमली होती. महिपतबाबाला मधोमध ठेवून सर्वजण टाहो फोडत होते. गर्दीतून आत जायाला जागा नव्हती. थोड्या वेळात डॉक्टर आले. त्यांना गर्दीने जागा करुन दिली. मी डॉक्टरांच्या मागून मागून महिपतबाबापर्यंत पोहोचलो. तेव्हा जे पाहिलं ते अंगावर काटा आणणारं होतं. थरकाप उडवणारं होतं.
महिपतबाबा जमिनीवर कोसळला होता. बहुधा तो पलंगावरुन खाली पडला असावा. तो निपचित पडला होता. चेहरा शांत, डोळे बंद, शरीराचीही काहीही हालचाल नव्हती. मागून कुणीतरी बोललं, "सुटला वाटतं?". हे वाक्य डॉक्टरांच्या कानावर पडलं आणि ते म्हणाले, "आहेत जिवंत. आता वारा येऊद्या. सर्वांनी बाजूला व्हा." डॉक्टरांनी उपचार सुरु केले.

निपचित पडलेल्या तो देह पाण्याने भिजला होता. तोंडात निळसर चिकट पदार्थ होता. कुणीतरी डाॅक्टरांना त्याबाबत विचारलं, डॉक्टर म्हणाले, "साबण खाल्लंंय त्यांनी" माझी वाचाच बसली. काळजाला चटका बसावा तसं झालं. बाजूला निरमा साबणाचा कागद पडला होता.

महिपतबाबाची बायको मोठमोठ्याने टाहो फोडत होती. गरिबीला कंटाळून, लेकाचं असं निर्दयी वागणं हे सारं महिपतबाबाला सहन झालं नसावं, असा मी अंदाज बांधला. तो खराही ठरला. जगण्याची आस सोडून दिली होती त्याने. गावातच दिलेल्या पोरीने खूप सेवा केली त्याची. पण पोराने दिलेलं दु:ख त्याला मरेपर्यंत खुपत राहिलं.
ज्या बापाने खांद्यावर बसवून दीड-दोन किलोमीटर चालून शाळेत नेलं, जीवाचं रान करुन शिकवलं. ज्या काळात महिपतबाबाला पोराची गरज होती, आधार हवा होता त्या काळात पोराने वा-यावर सोडून दिल्यावर महिपतबाबाने काय करावं? विष घेण्यासही पैसे नव्हते, म्हणून साबण खाल्ला, असं दोन दिवसांनी महिपतबाबा जो कुणी तब्येतीची चौकशी करायला येई त्याला सांगत असे. अशा भयाण परिस्थितीत आजही गावा-गावात अनेक महिपतबाबा आहेत.


गोपीबयचा मृत्यू

गोपीबय गेली. तशी ती कुणीच नव्हती माझी. गावातील एक. शेजारीही नाही. घरापासून चार-पाच घरं सोडून तिचं घर. गेली जवळपास १० वर्षे ती अंथरुणाला खिळलेलीच. म्हणजे स्वत:चं सर्व तिला करता येत व्हतं. पण तेवढंच. सुनेनं सर्व सांभाळ केला. वृद्धापकाळानेच तिचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी साधारणत: ८०-९० वर्षांची असेल.
परवा गावी गेलो. तेव्हा मनात कायम सळत राहील अशी गोष्ट कळाली. तसं मी गावी गेलो की गोपीबयला पाहिल्याशिवाय परत मुंबईला येत नाही. नात्यातील नव्हती. पण गावात जो कुणी माझ्यावर जीवापाड प्रेम करतो, त्यातील ती एक होती.
"तू अनंताचा ना रे?" अशी ती मला ओळख द्यायची. कमी दिसत असल्याने आवाजावरुन ओळखायची. तिच्या मृत्यूआधी गावी गेलो तेव्हा घाई-गडबडीत होतो. गोपीबयला हाक मारायला जायला जमलं नाही. म्हटलं पुन्हा येईन तेव्हा जाईन. मुंबईत आलो आणि तिस-याच दिवशी गोपीबयच्या निधनाची वार्ता कळली. मन सुन्न झालं. गार पडलो. डोळ्यासमोरुन गोपीबयच्या आठवणी सरु लागल्या आणि एका क्षण डोळ्यासमोर किंचितसा अंधार आला.
अपराधी असल्यागत वाटू लाग़लं. आता गेलेलो तेव्हा गोपीबयला बघायला जायला हवं होतो, असं सारखं मनात येत राहिलं. यात आणखी भरीस भर म्हणजे तिच्या निधनाच्या आदल्या दिवशी तिने माझ्या आईशी माझ्याबद्दल चर्चा केली होती. हे ऐकल्यावर तर आणखीच अपराधी भावना दाटून आली.
आईची माया देणारी गोपीबय गेली. हा चटका न सोसावणाराच होता आणि आहे. वयोमानानुसार नैसर्गिक मृ्त्यू आल्याने फार काही वाटलं नाही. मात्र, जवळची व्यक्ती गेल्याचं दु:ख आहेच.
काही दिवसांपूर्वी गोपीबय मला म्हणाली होती-
"बावा टीव्हीत काम करतोयस सांगत व्हती संतीबाया. मेली माझं डोलं कुसले, त्यांना काय दिसत न्हाय. नायतं तुला पायलं असतं. बापाचं नाव काढ पोरा. म्हातारा हो."
गोपीबयने दिलेला हा आशीर्वाद आयुष्यभर पुरणारा आहे. रक्ताचं नातं नसूनही जगणं शिकवून गेलीस तू. कायम लक्षात राहशील.


17 August, 2015

श्रावण महिन्याच्या गावाकडील काही आठवणी:

१) श्रावण पाळणारे केस कापत नसत. त्याचा परिणाम आम्हा बिगर-श्रावण्यांवर होत असे. न्हावी गावात यायचा नाही, त्यामुळे आमचे केसही कानावर येईपर्यंत वाढायचे.

२) शाळेला श्रावणानिमित्त दर सोमवारी 'श्रावण सोमवार' या नावाखाली हाफ डे सुट्टी मिळत असे. म्हणजे दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर घरी जायला मिळायचं. म्हणून श्रावण वर्षभर असावा, असं वाटायचं.

३) बाकी श्रावणाचं महत्त्व घंटा काही माहित नव्हतं. गावतली मंडळी शेताच्या कामात गुंतलेली असतात. कुणी गाई-बैलांना चारा-पाण्यासाठी शिवारात घेऊन गेलेला असायचा, तर कुणी शेताच्या बांधावरचं गवत काढायला. बेनणी करायला. हे या महिन्याची कामं असायची आणि आजही आहेत.

४) बाजूच्या गावातून एक ज्येष्ठ वारकरी आपली जुनीपुराणी चोपडी घेऊन यायचा. बळीराम असं त्याचं नाव. गावकीच्या घरात हा बळीराम लोकांना रामायण-महाभारात-श्रावण बाळ इत्यादींच्या कथा ऐकवत असे. हे सारं दहिहंडीपर्यंत चालत असे. आम्हीही तिथे जायचो. चहा पिण्यासाठी.

५) आणखी एक श्रावणाचा उल्लेख म्हणजे दहावीपर्यंत कधीतरी बालकवींची श्रावणमासी.. वगैरे कविता परीक्षेपुरती वाचली होती. तीही परीक्षेनंतर विसरलो.


बस्स. एवढ्या आठवणी आहेत श्रावणाच्या. बाकी विशेष काही नाही.

भूमिका घ्यायची की नाही?

भालचंद्र नेमाडेंनी बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध केला. अनेकांनी अतिशय खालच्या स्तराला जाऊन नेमाडेंवर टीका केली. तशीच टीका पुरंदरेंवरही केली. खूप वाद झाला आहे आणि होतो आहे. मला त्यात पडायचं नाही.

नेमाडे ज्ञानपीठ घेण्याच्या लायकीचे नाहीत, इथवर टीकेची पातळी घसरलीय. नेमाडेंनी साहित्यिक या नात्याने एक भूमिका घेतली, ती बरोबर की चूक हे ज्याने त्याने ठरवावे. पण नेमाडेंना नावं ठेवणाऱ्यांनी आधी त्या साहित्यिकांना जाब विचारावा, जे केवळ साहित्य संमेलनं, कार्यक्रम आणि सरकारी महामंडळांच्या खुर्च्या गरम करत असतात. त्यांना प्रश्न विचारा, जे सत्तेच्या दिशेला तोंड फिरवत राहातात. त्यांना प्रश्न विचारा, जे पुरस्कारासाठी सत्तेपुढे नाक घासतात आणि त्यांना प्रश्न विचारा, जे पुस्तकं खपण्यासाठी विचारधारेला बासणात गुंडाळून तत्वांची पायमल्ली करुन विरोधी विचारांच्या व्यासपीठावर बड्या बड्या गोष्टी करतात.

नेमाडेंनी किमान एक साहित्यिक म्हणून भूमिका तरी मांडली. ती भूमिका योग्य-अयोग्य हा नंतरचा भाग. ते ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या विचारधारेनुसार आणि मतानुसार ठरवावं. पण नेमाडेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करु नये, असे मला वाटतं. भूमिका घेणारा साहित्यिक एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच राहिलेत, त्यात नेमाडे आहेत. त्यांचा किमान आदर करा.

नुसती पुस्तकं लिहून... पांढऱ्यावर काळं करुन साहित्यिक झालेले खूप आहेत. (लहान तोंडी मोठा खास असला तरी मला असंच वाटतं) पण ज्यांनी पुस्तकातून, लेखातून, लेखनातून आपली भूमिका धीटपणे मांडलीय, ते माझ्या दृष्टीने साहित्यिक.

भूमिका घ्या असे एकीकडे बोंबळायचं...आणि त्याचवेळी, जे भूमिका घेतात त्यांना लाथडायचं. त्यांचे मु़डदे पाडायचे. जे भूमिका घेतात, त्यांना घेऊ दिलं पाहिजे. त्यांच्या भूमिकेला विरोध असेल तर सभ्य भाषेत, योग्य स्थळी, अहिंसेने विरोध करावा.

12 August, 2015

सारं समोर घडत असतानाही...

निपचित पडलेत...
हात-पैर
डोक्यातला मेंदू
आणि मन.

की,
असंवेदनशील झालेत ?
हात-पैर
डोक्यातला मेंदू
आणि मन.

सहनशिलतेच्या पलिकडले सारे...

तरीही निष्क्रिय का?
हात-पैर
डोक्यातला मेंदू
आणि मन.

माझी प्रतिक्रिया का उमटत नाही?

की मृतावस्थेत आहेत?
हात-पैर
डोक्यातला मेंदू
आणि मन.

माझी माणुसकी नामक नस तपासा कुणीतरी...
आणि बघा जरा, मी जिवंत आहे की मेलोय ते...


लोक हो...

विरोधी मत मांडायचं नाही
आपल्याच मतावर आडायचं नाही

तुमच्या धगधगत्या विचारांवर पाणी शिंपडा...
दोन-चार दिवस धुमसतील विचारांचे निखारे..
बंदीविरोधात देतील इशारे..
पण काळांतराने जुळवून घेतील परिस्थितीशी...

घटनेतली 19 वी ओळ ते टाकणार आहेत पुसून...
तेव्हाही त्यांचं स्वागत करा..खोटं का होय ना पण जरा हसून...

त्यांच्या चाली-रितींना,
हजारो-लाखो वर्षे पुराण्या संस्कृतीला,
त्यांच्या कायदे-कानूनांना,
आव्हानं द्यायची नाहीत...
नाहीतर तुम्हालाही ओंकारेश्वर पुलावर मारल्या गेलेल्या त्या इसमासारखं मारलं जाईल...

तुम्हाला जगायचं असल्यास..
त्यांचे थोर राष्ट्रवादी विचार लगेच शिकून टाका...
तुमची सदसदविवेकबुद्धी वगैरे आताच चांगल्या भावात विकून टाका...

त्यांच्या विचारातील चुका त्यांना सांगू नका,
त्यांच्या चाली-रितीतील दोष त्यांना सांगू नका...

तुम्ही विचारविरहित असाल तर तुम्हाला जगण्याची संधी आहे...
कारण इथे विरोधी विचारांवर बंदी आहे...


कविता 'ती'च्यासाठी...

एक:
ये बये,
चूल-मूल
फार फार तर वऱ्हांड्यात ये...
पण ध्यानात ठेव निळ्या छताला तुझं डोकं दाखवू नको...

दोन:
ये बये,
शेत-माळ
फार फार तर वऱ्हांड्यात ये...
पण गार गार हवा देणाऱ्या पात्यांना कधी डोकं दाखवू नको...

ये बये,
तुला कोंडतोय कुणी उंबरठ्याच्या बाहेर,
तर कुणी उंबरठ्याच्या आत...
कुणी हिंसेच्या शस्त्रात,
तर कुणी दराऱ्याच्या शब्दात....
तरीही तू सहन करतेस.. त्याने नसतं हे सहन केलं..

म्हणून...

तुझी पहिली गरज तुझं स्वातंत्र्य आहे..
जे तुलाच मिळवायचं आहे..
चार-दोन जण राहतील उभे मागे तुझ्या..
पण खूप जणी असतील सोबत तुझ्या.....

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...