02 April, 2016

उंबरठ्यावर शेतकरी मेला, तेव्हा कुठे होतात हरामखोरांनो?


  
तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जा, जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये जा किंवा अगदी रेल्वेच्या तिकीट काऊंटरवरचा अनुभव आठवा. सराकरी कर्मचारी असे वागतात की, जसे यांच्या बापाचं राज्य आहे. जनतेच्या करावर यांचे पगार होतात, पण त्याच जनतेला हाडतूड करतात. काम करुन देण्यासाठी दिवसेंदिवस वाट पाहायला लावतात. बरं ज्या दिवशी काम करायचं, त्या दिवशीही 'खिसा भरुन' घेतातच.

खेड्या-पाड्यात जा, कुठल्याही माणसाला विचारा, सरकारी कर्मचारी कसे वागतात? बघा चार शिव्या हासडूनच त्याचं 'गुणगौरव' करतील, असा वाईट अनुभव सामान्यांना आहे.

आता बच्चू कडूंशी संबंधित बोलतोय, तर मंत्रालयाचंच पाहा. कधी चर्चगेट स्टेशनहून १०० नंबर बस पकडून मंत्रालयाच्या समोर उतरा आणि दोन-तीन तास समोर सावलीत उभे राहा. तुम्हाला दिसतील, फाटक़्या चपलांनी, संतप्त सूर्याखाली रडवेल्या चेहऱ्याने तासंतास उभे असणारे शेतकरी. मंत्रालयाच्या समोर वायबी चव्हाण सेंटरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर नारळवाला आहे, तिथे सावली असते. तिथे बसून मंत्रालयाकडे आशेने पाहत बसलेले कित्येक शेतकरी स्वत:च्या डोळ्याने पाहिले आहेत. काही ना काही लहान-सहान कामासाठी आलेले असतात, पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे त्यांची कामं होत नाहीत.

आमदार बच्चू कडूंनी जनतेसाठी बाचाबाची केलीय, स्वत:च्या स्वार्थासाठी नाही. बरं त्यात त्या अधिकाऱ्याने थेट 'अॅट्रॉसिटी' दाखल करण्याची मागणी-वजा-धमकी दिली. अशा लोकांमुळे 'अॅट्रॉसिटी' बदनाम आहे. अपंग, गरीब जनतेसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा हा आमदार आहे. अरे लेकाच्यांनो, तुमचं भाग्य समजा की असे आमदार जनतेत आहेत. पण याच आमदारांची कदर केली जात नाही, म्हणून राज्य भिकेला लागण्याच्या स्थितीत आहे.

बरं या बाबूंच्या कामबंद आंदोलनावरुन एक समोर आलं, ते म्हणजे या लोकांना जनतेची घंटा काय पडली नाहीय. यांना केवळ स्वत:ची पडलीय.

मंत्रालयाच्या उंबरठ्यावर जेव्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, तेव्हा का नाही तुमचा स्वाभिमान जागा झाला? तेव्हा कुठं होतात हरामखोरांनो? तेव्हा सहा मजले नाही उतरलात ते? तेव्हा कुठं गेली होती संवेदनशीलता, जी बच्चू कडूंनी शेतकऱ्याच्या वतीने विचारलेल्या जाबाला उद्धट उत्तर देणाऱ्या उपसचिवाप्रती जागी झाली.

या मंत्रिमंडळाला एक वर्ष झालं, मात्र अजूनही प्रशासनावर नीट पकड नाही, असे वरिष्ठ पत्रकार मित्रांकडून कायम ऐकत आलो होतो. आज खात्री झाली. कारण एका उपसचिवाने जनतेच्या प्रश्नाला उत्तर न दिल्याचा जाब विचारला म्हणून त्याविरोधात राज्याचा गाडा हाकणाऱ्या इमारतीतील सहाच्या सहा मजले रिकामे झाले. मुख्यमंत्र्यांची प्रशासनावर पकड नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. बरं ही परिस्थिती केवळ मुंबईतील या 'सहा मजल्यां'वर नाही, हे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि काही ठिकाणी तर ग्रामपंचायतीतही हीच परिस्थिती आहे.

मुख्यमंत्री अॅक्टिव्ह आहेत. व्हिजनरी आहेत. जनतेसाठी लढणाऱ्या आमदाराच्या मागे ठामपणे उभं राहण्याची हिंमत दाखवून गावितसारख्या सरकारी कर्मचाऱ्यांना योग्य संदेश देण्याची गरज आहे.

15 March, 2016

तांबव्याचा विष्णूबाळा!



काही दिवसांपूर्वी 'बाबांची शाळा' पिक्चरच्या प्रमोशनसाठी अभिनेते सयाजी शिंदे ऑफिसमध्ये (एबीपी माझाचं ऑफिस) आले होत. तेव्हा त्यांना मी पहिल्यांदा प्रत्यक्षात पाहिलं. आता सयाजी शिंदेंना पाहण्यात काय मोठं आलंय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. त्यात गैर नाही. मात्र सयाजी शिंदेंना प्रत्यक्षात पाहणं, माझ्यासाठी काही खास होतं.

आमच्या गावात कधी सयाजी शिंदेंना घेऊन गेलो, तर त्यांचे पाय धुवून पाणी पितील, अशी परिस्थिती आहे. गावाकडं सयाजी शिंदेंचं इतकं वेड असण्याचं कारण 'तांबव्याचा विष्णूबाळा'.

या पिक्चरनं अक्षरश: वेड लावलेलं गावात. 'तांबव्याचा विष्णूबाळा' पाहिला नाही असा डोचका शोधून सापडायचा नाही.

काय होतं त्या पिक्चरमधी एवढं की, घरपट बघावं? तर त्यात होतं अन्यायाविरोधातील आवाज, भाऊबंदकीतील वाद, गावपातळीवर सरपंचाचं राजकारण, निर्दोषाची फसवणूक... आता या साऱ्यांशी गावाकडची माणसं जोडली जाणार नाहीत, हे कसं शक्यय? लोकांशी थेट कनेक्ट होणारा हा विषय. त्यात सयाजी शिंदेंच्या अभिनयाची जोड. आणखी काय हवंय?

बरं हा पिक्चर काही रंगीत टीव्हीवर वगैरे पाहिला नाही. गावात फक्त दोन जणांकडे टीव्ही होता. टीव्ही पाहण्यासाठी लोक घरातील कामं पटापट उरकून घेत असत. तर गावात दोन टीव्ही होत्या, एक नागेश पवार नावाच्या मित्राकडं आणि दुसरा एका दुकानवाल्याकडे. त्यामुळे टीव्ही पाहण्यासाठी फार आॅप्शन्स नव्हते. ज्याच्याकडे टीव्ही होता, त्यांच्या मर्जीनुसार चॅनेल बदललं जाई. त्यामुळे त्यांना जे पाहावं वाटे, तेही आपण पाहायचं. नो ऑप्शन. त्यात सह्याद्री, स्टार उत्सव (ज्याच्यावर स्टार प्लसवरील सिरियलचे झालेले भाग दाखवत.) आणि स्मायली हे चॅनेल दिसत. आता या तिनही चॅनेलवर शनिवार-रविवार सोडला तर चांगला पिक्चर नसे. त्यामुळं मग रोह्याहून भाड्याने सीडी आणून पिक्चर पाहण्याचं वेड आम्हा तरुणांना होतं. याच दरम्यान हा 'तांबव्याचा विष्णूबाळा' भेटला.

'तांबव्याचा विष्णूबाळा' पिक्चरमधी 'पाखरु लय लाजतया... बघा बघा कसं हसतया' या डायलाॅगपलिकडं फार काही रोमँटिक वगैरे नव्हतं. सांगण्याचा मुद्दा असा की, मोठ्यांसोबत पाहू नये, असं त्यात काहीच नव्हतं. त्यामुळं थेट आजीच्या पुढ्यात बसूनही हा पिक्चर बघता येई.

गावातल्या म्हाताऱ्या-कोताऱ्यानेही पिक्चर बघितला होता. अगदी दोन-दोन-तीन-तीन वेळा. मी स्वत: कित्येकवेळा पाहिला असेन. चॅनेल गेले की, घराच्या वर जाऊन अँटिना हलवण्यापेक्षा 'मरु दे चॅनेल, तू विष्णूबाळा लाव. आपण तो बघू' असं म्हणत कित्येकवेळा 'तांबव्याचा विष्णूबाळा' पाहिलाय.

रांगड्या भूमिकेतील सयाजी शिंदे आमच्या गवातील हर एकाचा हिरो. कसला तो आवाज, कसलं ते चालणं, ती डायलॉगफेक... वाह! अफलातूनच!!

त्यात भरीस भर ऐश्वर्या नारकरसारखी सौंदर्यवती. आणि पिक्चर पाहताना व त्यानंतरही कित्येक वेळा शिव्या खाणारे व्हिलन राहुल सोलापूरकर आणि सदाशिव अमरापूरकर. आणि भांडणं लावून देण्याच्या भूमिकेतील कुलदिप पवार. अगदी तगडी स्टारकास्ट!

पिक्चरच्या वेळी विष्णूबाळा म्हणजे आपला आमदार वगैरे असल्यासारखा गजर होत असे. विष्णूबाळाने व्हिलनला मारायला सुरुवात केली, की एखादी आजी ओठांवरुन नथ सरकवत तावातावाने म्हणत असे, "मार.. मार त्या मेल्याला. बाईस्नी हात लावतो काय. मुस्का फोडून टाक मेल्याचा. आय-माय हाय की नाय घरी त्याच्या?" बरं या साऱ्या आजीबाईंना वाटे, आपण बोलतो म्हणूनच विष्णूबाळा मारतोय. मग काय आणखी जोरात चिअरअप!

गावात कुणाच्या घरी पूजा किंवा शुभकार्य असेल, तर पडद्यावर पिक्चर असायचे. त्यातही माहेरची साडी, चिमणी पाखरं किंवा तांबव्याचा विष्णूबाळा, यातील एकाचा समावेश असेच.

अशा एकंदरीत सयाजी शिंदेच्या आठवणी आमच्या गावकडं आहेत. आठवण काढल्यास उचक्या लागतात, हे जर खरं असेल तर त्या काळात


कधी सयाजी शिंदेशी बोलण्याची योग आला, तर नक्की त्यांच्याशी या आठवणी शेअर करेन.

11 March, 2016

खिडकीतला चंद्र




वय: वादळविजांचंहे प्रवीण दवणेंचं पुस्तक वाचलं तो महिना होता मार्च. मी मुंबईतील साठ्ये महाविद्यालयात बीएमएमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो. अतिशय महत्त्वाची परीक्षा होती. त्यात पार्ट टाईम जॉब करत होतो. मालाडच्या लिबर्टी गार्डनजवळ जयप्रकाश तिवारी नावाचे सीए आहेत, त्यांच्याकडे काम करत असे. एप्रिलमध्ये परीक्षा होत्या. त्यामुळे परीक्षा तोंडावर आणि त्यात सीएच्या येथे कामाला म्हणजे डिट, रिटर्न फाईल वगैरे हजार कामं. कामा खूप होतं. त्यामुळे तिवारी सर सुट्टी द्यायला तयार नव्हते. परीक्षेच्याआधी दोन दिवसांपासून सुट्टी देण्याची मात्र त्यांची तयारी होती. आता दोन दिवसांत पूर्ण अभ्यास कसा करता येईल, याची चिंता. प्रचंड कन्फ्युज्ड होतो. जॉब सोडायचा, तर नवा जॉब मिळत नसे. प्लेसमेंटवाल्यांन १५०-२५० तर कधी कधी ५०० रुपये द्यावे लागत. अंधेरीच्या जम्बो दर्शनमधील गजानन प्लेसमेंटम, दादरच्या सुविधाच्या बाजूला असलेलं प्लेसमेंट ऑफिस, अंधेरीतील टाईम्स प्लेसमेंट या साऱ्यांना पैसे देऊन आणि नोकरी आलीय का, हे विचारण्यासाठी फेऱ्या घालून आधीच थकलो होतो. त्यामुळे नोकरी सोडायची नाही, हे निश्चित होतं. त्यात हा जॉब ओळखीने लागलेला. आता जॉब सोडायचा नव्हता आणि अभ्यासही बाकी होता, त्यात असाईनमेंट्स राहिलेल्या, आता करायचं काय, याची चिंता वाढली होती.

त्यात प्रॉब्लेम असा व्हायचा की, कुणाशी हा प्राब्लेम शेअर करता येत नसे. लेक्चर संपल्यावर पटापट पार्ल्याहून मलाडला जावं लागत असे. दुपारी 12 वाजता ऑफिसला पोहोचावं लागत असे किंवा ऑफिसमधूनच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वरळी, वागळे इस्टेट किंवा माझगाव या ठिकाणच्या सेल्स टॅक्स ऑफिसला काही-ना-काही कामानिमित्त जावं लागत असे. त्यामुळे मित्रांशीही फार काही बोलता येत नसे. परीक्षा जवळ येत होती... धाकधूक वाढत होती.

याचदरम्यान, प्रवीण दवणेंचं हे पुस्तक हाती लागलं. हा मस्त योगायोगच होता. अगदी प्रवीण दवणेंच्या शब्दात सांगायचं तर, पहिल्या पावसाच्या सुगंधात मोगऱ्याचा दरवळ जसा मिसळावा, तसं हे पुस्तक माझ्या आयुष्यात आलं. परफेक्ट टायमिंग घेऊनच!

मोजून १०१ पानी पुस्तक. पण या १०१ पानात आयुष्य जगण्याला उमेद देणारे एक-से-एक शब्द आहेत. क्षण : जगण्याचे अन् भरण्याचे या सुरुवातीच्याच लेखात प्रवीण दवणेंनी जगण्याची व्याख्या सांगितलीय. दवणे लिहितात, अनुकूलतेने श्वासांच्या पताका फडफडवीत तर अनेक जिवंत राहतात, पण प्रतिकूलतेचेही पंख करुन अस्मान शोधतात, ते खरं जगतात कसलं वाक्य आहे यार... दवणे प्रतिकूलतेचेही पंख करायाल सांगतात. बरं या एकाच वाक्याने मी भारावून गेलो वगैरे आणि निकालाची पर्वा न करता अभ्यास करायला लागलो, अशातला भाग नाही. मात्र, या पुस्तकात आधी म्हटल्याप्रमाणे एक-से-एक प्रेरणादायी वाक्य सापडतात.

पुस्तकातील पहिला आणि दुसरा लेख वाचल्यावर पुस्तक बाजूला ठेवून परीक्षेच्या अभ्यासाला लागलो. पत्रकारितेची परीक्षा असली, तरी मला त्यात आणि इतर परीक्षांपेक्षा काहीही फरक जाणवला नाही. नुसती घोकंपट्टी करुन पास होणं, हेच उद्दिष्ट आहे की काय, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती. पण या लेखांनी आधाराचे शब्द दिले. आपण असं निराश होऊन चालणार नाही. वाचूया...अभ्यास करुया... जो हो जाएगा, देखा जाएगा, असं ठरवलं. परीक्षेचं टेन्शन आलेल्या या काळात या पुस्तकाने हे सकारात्मक बदल घडवला. म्हणून हे पुस्तक महत्त्वाचं.

बरं परीक्षेच्या काळापुरतंच हे पुस्तक उपयुक्त आहे, असेही नाही. आपण पाहतो की, परीक्षेतील निकालाने अनेकजण निराश होतात. स्वत:ला कमी समजू लागतात. मग एकप्रकारचा निगेटिव्हनेस तयार होतो आणि अनेकदा तर टोकाचं पाऊलही उचलतात. तर यश: परीक्षेतलं आणि जगण्यातलं या लेखात प्रवीण दवणे सांगतात, अपेक्षित निकाल लागला नाही, तर निराश होऊ नका. हेच तर जगण्याचं वय आहे. तारुण्य उपभोगा. मात्र, हे सांगताना दवणेंचं एक वाक्य मी इथे मुद्दामहून नमूद करतो. अतिशय मोजक्या शब्दांत दवणेंनी परीक्षेच्या निकालासह तारुण्याची व्याख्या केलीय. ते लिहितात- क्षणभराचा हादरा पचवून पुढे जाण्याची जिद्द म्हणजेच तारुण्य! वास्तव स्वीकारायला शिकण्याची ही कुठे सुरुवात आहे. दवणेंच्या म्हणण्याप्रमाणे खरंच वास्तव स्वीकारुन जगायला हवं, तरच परीक्षेतीलच काय आयुष्यातील अनेक हादरे आपण पचवू शकतो.

तारुण्याच्या विविध अंगांना स्पर्श करणारं असं हे पुस्तक आहे. स्पर्धात्मक जीवन, परीक्षा, शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा, पास-नापासांचा खेळ, त्यातून येणारी निराशा इथपासून ते तारुण्यातील फिरणं-बागडणं, कॉलेजचे स्वप्नवत वाटावे असे दिवस, ते अगदी प्रेम आणि प्रेमाच्या कविता, अशा तारुण्याशी संबंधित बहुतांश विषयांना प्रवीण दवणेंनी हात घातला आहे. तरुणांना सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला आहे.

यातील प्रेम-कविता या विषयावरुन आठवलं... प्रेम कवितांवर कवितेचं वय हा एक मस्त लेख दवणेंनी लिहिलाय. ऐन तारुण्यात कुणी कितीही गंभीर, कठोर मनाचा वगैरे असला, तरी प्रेम कविता करणारच. साला हे वयच असं असतं. या वयात कठोर मनातही प्रेमाचा एक राखीव कोपरा असतो. कविता आणि तरुण यांचा संबंध जोडताना दवणे लिहितात, प्रत्येकानं आयुष्यात किमान एक तरी कविता केली असावीच... कुणाला तरी उद्देशून कविता लिहाविशी वाटली, की समजायचं आपण बहुधा तरुण झालो!” याच लेखात दवणेंनी प्रेमाचं जे वर्णन केलंय, ते अप्रतिमच. अतिशय सहजतेनं आणि सुरेख पद्धतीनं दवणेंनी प्रेम मांडलं आहे.

पावसाळ्यातील रिमझिम, तर कधी टपटप पडणाऱ्या पाऊसधारांमधून... काळ्याकुट्ट अंधारात उघड्या आकाशातील चंद्र-ताऱ्यांमधून... तर कवीच्या शब्दांतून व्यक्त होणारं प्रेम, अशा प्रेमाच्या व्यक्त-अव्यक्त माध्यमांना दवणेंनी आपल्या खास शैलीतल्या शब्दांमध्ये बंदिस्त केलंय. बरं यावेळ ते मराठी मनावर आपल्या काव्यपंक्तींतून अधिराज्य गाजवणाऱ्या बा. भ. बोरकरांच्या कवितांचा आधार घेतात. त्यामुळे प्रेमावरील हा लेख मनातील राखीव कोपऱ्यात अलगद जाऊन बसतं. वाचकाला भिडतं.
                                                                                        
फुलों के शहर में घर हो अपनाअसे शब्द गुणगुण्याचं वय असणाऱ्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आपल्या लेखनीतला शब्द-नी-शब्द प्रवीण दवणे खर्ची घालतात. ते शब्दांना बजावतात, हे पाहा शब्दांनो.. माझ्या तमाम तरुणांना मला आशावादी करायचंय.

पुस्तकातील बहुतेक सर्व लेखांमध्ये प्रवीण दवणे तरुणांच्या बाजूने राहून, मित्र बनून त्यांना जगण्याची व्याख्या समजावत राहतात. ती व्याख्या वाचकांपर्यंत पोहोचतेही. जशी माझ्या चौदावीच्या परीक्षेच्या काळात दवणेंची प्रेमाची हाक पोहोचली. प्रेरणा मिळाली. मात्र, यातील एक लेखात दवणे तरुणांच्या मित्राच्या भूमिकेतून बाहेर पडून थोरल्या भावाच्या भूमिकेत जातात आणि जबाबदारीचीही जाणीव करुन देतात. आपल्याला मनमुराद जगण्याचं स्वातंत्र्य असलं, तरी हुरळून जाऊ नका. कारण तुमच्या यशामागे अनेक वाती जळत असतात, अनेक पाय झिजत असता, त्या जळणाऱ्या वातींची आणि झिजणाऱ्या पायांची जाणीव मनामध्ये असू द्या, हे प्रवीण दवणे अत्यंत तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करतात. यावेळी दवणे त्यांच्याच कवितेचा आधार घेतात. ते लिहिलात-

जुनीच पत्र पुन्हा पुन्हा... वाचत असतं कुणीतरी
दिवे सगळे विझल्यावर... जळत असतं कुणीतरी
अशाच खिडकीत चंद्र होऊन... टपटपण्यात मजा आहे
कुणीतरी ऐकत असतं दिठीतून... म्हणून तर गाण्यात मजा आहे

म्हणजेच आपल्यासाठी कुणीतरी मेहनत करत असतो, आपल्याकडे आशेनं पाहत असतो, याची जाणीव ठेवा, असे दवणे आपल्या काव्यपंक्तीतून सांगण्याचा प्रयत्न करतात.

खोलीतल्या काळ्याकुट्ट अंधारात खिडकीतून दिसणारा चंद्रही आधाराचा वाटतो, अगदी तसंच हे पुस्तक मला परीक्षेच्या काळात आधाराचं आणि नित्याच्या जगण्यात सकारात्मक ऊर्जा देणारं वाटतं. म्हणूनच या पुस्तकाला खिडकीतला चंद्र म्हणावसं वाटतं.


01 March, 2016

मानवाच्या भविष्याची चिंता करणारा ‘लिओनार्डो’



काही निवडक उद्योजकांना त्यांच्या आर्थिक हव्यासापोटी संपूर्ण मानवजातीचं भविष्य निश्चित करण्याचे अधिकार आपण का देतो आहोत? – लिओनार्डो

लिओनार्डोला स्करमिळाला. खूप आनंद झाला. कारण अभिनयासह हा एक सजग माणूस आहे. त्याच्या अभिनयाबद्दल फार बोलणार नाही. कारण 'टायटॅनिक' सोडला तर त्याचा कोणताच सिनेमा मी पाहिलेला नाही. पण तरीही त्याचा मोठा फॅन आहे ते त्याच्या सिनेमाव्यतिरिक्त इतर कामामुळं.

लिओनार्डो पर्यायवरणाबाबत प्रचंड जागरुक आहे. तो पर्यावरणवादी चळवळीत अॅक्टिव्हली काम करतो. यूनोने कुठल्यातरी समितीवरही त्याची नेमणूक केलीय आणि पर्यावरण क्षेत्रातील कुठलातरी महत्त्वाचा पुरस्कारही त्याच्या नावे आहे. मला आता नाव आठवत नाही. क्रिस्टल की बिस्टल असं काहीतरी नाव आहे पुरस्काराचं. असो. तर एकंदरीतच भारी माणूस आहे हा.

स्वीत्झर्लंडमध्ये जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पार पडलं ना, त्यात लिओनार्डोचं एक भाषण झालं होतं. मीही या भाषणाच्या बातम्या वाचल्यात. कुठे व्हिडीओ-ऑडिओ क्लिप मिळाली नाही. पण त्याच्या या भाषणाची जगभरातील प्रमुख प्रसारमाध्यमांमध्ये प्रचंड चर्चा झाली होती.

या फोरममधील भाषणातील लिओनार्डोचा एक प्रश्न मला प्रचंड प्रभावी वाटला. विशेष म्हणजे जगातील अनेक देशांच्या महत्त्वाच्या नेत्यांसमोर तो म्हणाला- "काही निवडक उद्योजकांना त्यांच्या आर्थिक हव्यासापोटी संपूर्ण मानवजातीचं भविष्य निश्चित करण्याचे अधिकार आपण का देतो आहोत?"


लिओनार्डोचा हा सवाल खरंतर आपण नेहमीच विचारत असतो. पण उद्योगाला चालना देण्यासाठी जमलेल्या फोरममध्ये केलेल्या भाषणात असा सवाल करुन पर्यावरणाचं रक्षण करण्याचं आवाहन करणं, हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं.

23 February, 2016

कथा : आभ्या आणि त्याची तडफडणारी आय!





तो आभ्यासारखा वाटला म्हणून मी वळून पाहिलं. खात्री झाली नाही म्हणून पुढे चालू लागलो. पुन्हा मनात आलं, हा आभ्याच असावा. म्हणून पुन्हा वळून पाहिलं...दोन पावलं चाललो. परत पाहिलं. अखेर मागे फिरलोच.

त्या इसमाच्या जवळ गेलो. आणि म्हणालो, “मी तुम्हाला कुठेतरी भेटलोय.
तो इसम चक्क नाहीम्हणाला.
ओळखीचा नसला तरी थोड्या वेगळ्या प्रतिक्रियेची अपेक्षा होती. म्हणजे, ‘कुठे भेटलोय आपण?” किंवा
री, मी ओळखलं नाही तुम्हालाअशी जनरली येणारी प्रतिक्रिया येईल, असं वाटलं होतं... पण तो चक्क नाहीम्हणाला.

मग मीच म्हटलं, “मी ज्ञानेश्वर फणसाळकर
त्याचा चेहराच बदलला. मी ओळखीचा आहे, अशा एक्स्प्रेशन्सनी तो माझ्याकडे पाहू लागला. तो काही बोलणार एवढ्यात मी पुढे म्हटलं' “तू आभ्या ना?”
तो- काय ज्ञान्या आहेस कुठे?
मी- च्याआयला हा प्रश्न मी तुला विचारायला हवा होता. साला तुच मला विचारतो आहेस.
तो- अरे कुठे नाय.. असतोय इकडचे.

त्याला म्हटलं चल त्या टपरीवर चहा पिता पिता बोलू. खरंतर तो घाईत होता. पण तो माझ्यासमोर काही बोलला नाही. चेहऱ्यावर लवकर निघायचंय अशा एक्स्प्रेशन्स होत्या. मात्र, मी मुद्दाम त्याला थांबवलं. रस्ता ओलांडून वडाच्या झाडाखालच्या टपरीपाशी गेलो. दोन गरमागरम कटिंगसोबत आमच्या पुन्हा गप्पा सुरु झाल्या.

-1-

आभ्या आज लय दिवसांनी भेटला होता. शाळा संपून आता जवळपास 6 वर्षे झाली. सर्वजण मुंबईतल्या गर्दीत आपापलं अस्तित्व शोधण्यात मग्न होतो... एवढे की, कधी कुणाला भेटलोच नाही. कधी एखादा वर्गमित्र भेटतो..पण तेही घाईघाईत. परवा रावल्या भेटला होता दादर स्टेशनला... दोन मिनिटं होत नाही तर म्हणे, “विरार फास्ट आहे. निघतो. नंतर मरणाची गर्दी होते.

...तर आभ्या गेल्या ५-६ वर्षात कधीच भेटला नव्हता. कधी भेटला तर त्याला धारेवरच धरणार होतो. तसं ठरवलंच होतो. आभ्याबद्दल गावी जे काही ऐकलंय, त्यावर विश्वासच बसेना. आभ्या असे करेल, असं वाटलं नव्हतं. त्याच्या आईने जे काही त्याच्याबद्दल सांगितलं, त्याने त्यावेळी अक्षरश: थरकाप उडाला होता. आभ्या कधी भेटलाच तर त्याचा मुस्काट फोडेन, इथवर राग मनात भरला होता.

-2-

आता आभ्या काडीपैलवान झालाय. पुरता काटकुंड्या. शाळेत होता तेव्हा असा नव्हता. शाळेत असताना तो टवटवीत चेहऱ्याचा होता आणि तो लय जबाबदारी-बिबादारीचा बोलायचा. आता ऐन पंचवीशीत तो चाळीशीचा वाटू लागलाय. चेहऱ्यावर रेषा उमटेस्तोव टेन्शन्सचे एक्स्प्रेशन्स. आभ्या पाचवीत होता, तेव्हाचा त्याचा बाप मेला. चिमुरडी बहीण...आणि आई, इतकंच आभ्याचं कुटुंब. आभ्याची आई प्रचंड  मेहनत करायची. त्यातूनच आभ्याचं दहावीपर्यंत शिकला. आभ्या दहावीनंतर मुंबईला येऊन डायरेक्ट कामालाच लागला. शिकायाला पैसा नव्हता त्याकडं. आणि तसंही आभ्याला काय शिकायची आवड वगैरे नव्हती.

-3-

गेल्या महिन्यात भातकापणीला गावी गेलो होतो. तेव्हा आभ्याची आई भेटली होती. एसटी स्टँडवरच आकाची नी माझी भेट झाली. आभ्याची आई आमच्याच गावची माहेरवाशीण. त्यामुळे मी आका बोलत असे. तर आका रडवेल चेहरा करुनच माझ्याशी बोलली, “माझा आभ्या दिसतो काय कुठं वुंबईस?” गावाकडं सारे मुंबईला वुंबईच बोलत असत. आकाच्या प्रश्नाने मी पुरता चक्रावून गेलो. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला.
मी क्षणात प्रश्न केला, “आका, असं काय बोलतेय? आभ्या बराय ना?”
आकाचा रडवेला चेहरा आता फुटलाच. तिने रडारड सुरु केली. आम्ही दोघेही एसटी स्टँडवर उभे होते. त
िला रडण्याचं थांबवून मी झालेल्या परिस्थतीची माहिती घेण्याच्या विचारात होतो. पण तीचं रडणं थांबत नव्हतं. अखेर तिने रडण्यातूनच आभ्याचे कारनामे सांगण्यास सुरुवात केली. या मायेकडे दुर्लक्ष करुन आभ्या असं वागेल वाटलंच नव्हतं.

-4-

त्याचं झालं असं की, दहावी झाल्यानंतर आभ्या कामासाठी मुंबईत आला. घरची जबाबदारी, आई आणि आता कुठे चालायला लागलेली बहीण. फार काही नात्यांची गुंतागुंत नव्हती. मात्र, संसाराचा गाडा आता त्याला हाकायचा होता. कारण त्याच्याशिवाय घरात कर्ता-कमविता कुणीच नव्हता. आई आता थकली होती. तीचा अर्धमेला जीव आणखी किती काम करणार होतं. अर्थात आभ्याला याची संपूर्ण जाणीव होतीच. नाही असे नाही.
मात्र मुंबईत आल्यावर त्याला काय झालं की त्याचं टाळकंच फिरलं. साला पूर्ण बदललाच. होत्याचं नव्हतं करुन घेण्याच्या मार्गावर गेला. कुठल्याशा मेडिकलमध्ये आभ्या कामालाल लागला होता आणि तिथल्याच एका मुलीशी याचं जुळलं. बरं प्रेम-बिमाला विरोध नाही. मात्र याचं ज्या मुलीवर प्रेम जडलं तिनं याचं पार तुणतुणंच केलं. प्रेमात कोर्ट मॅरेज करुन गडी राहू लागला. या साऱ्या गोष्टींचा त्याने आईला थांगपत्ताही लागू दिला नाही. जीने जिवाची पर्वा न करता रखरखत्या उन्हाची, गोठवणाऱ्या थंडीची आणि मुसळधार पावसाची पर्वा न करता दगड-धोंड्यातून फिरुन याच्यासाठी पै पै गोळा केला, याला शिकवला, त्याला लग्न करताना साधं आईला सांगावसं वाटलं नाही? बरं ज्या मुलीशी लग्न केलं तीही काही चांगली निघाली नाही. ती पोरगी याला गावाला जाऊच देईना. कारण काय होतं माहित नाही… आभ्यानं त्याबाबत कधी कुणाला काही सांगितलंही नाही. पण आभ्या तिच्यामुळे गावी येत नसे, एवढं मात्र बाहेरुन कळलं होतं.

-5-

आता आभ्या कित्येक दिवसांनी भेटला. जे काही आतापर्यंत कळलं त्याबद्दल विचारण्याची मलाही घाई झाली होती. चहाचा कप तोंडला लावण्याच्या आधीच मी त्याला प्रश्न केला, “काय रे आभ्या...लग्न केलंस असं ऐकलं. खरंय का ते? आणि गावी का जात नाहीस?”
चहाचा कप तोंडाला टेकणार तोच माझा प्रश्न त्याच्या कानावर धडकला. त्याने कप खाली घेतला. मी म्हटलं, “अरे चहा पी.. पिता पिता बोल.
त्याचा घाबरलेला चेहरा झाला होता. मात्र, मला त्याच्याबद्दल अजिबात सहानुभूती नव्हती. उलट प्रचंड राग होता.
अखेर त्याने सांगायला सुरुवात केली. म्हणे, जिच्याशी लग्न केलं, ती चांगली आहे रे. लोकांनी काहीही पसरवलंय गावाकडं- पोरगी सोडत नाय, आभ्याला पोरीचा नाद लागलाय वगैरे वगैरे. बायको चांगलीय रे. पण तिचा बाप आता सोडत नाय. गावाकडं जायाला देत नाय. म्हणे तू गावालाच राहशील. घरजावय झालोय. आईला पैसे द्यायला पैसेच राहत नाय. सासऱ्याला द्यावे लागतात.

आभ्या कारणं देतोय असं मला वाटू लागलं. मी त्याला बोलता बोलता थांबवलं. म्हटलं, मला कळलं. तुझं सुरु राहू दे, जसं सुरुय तसंच. तो काही बोलला नाही. त्याला खूप काही बोलायचं होतं. पण त्याची कारणं ऐकून मला राग आला होता.

त्याक्षणी आभ्यावर रागवण्याऐवजी मला आकाचा पोराच्या येण्यासाठी वाटेकडं डोळं लावून बसलेला चेहरा आठवला. तिचा तडफडणारा जीव माझ्या काळजाचा ठोका चुकवू पाहत होता. ज्याला अंगा-खांद्यावर खेळवलं, त्याने बायकोसाठी आईची तडजोड करावी, याशिवाय भयंकर काय असू शकतं, असा विचार करत मी तिथून निघालो. जाताना फक्त आभ्याला म्हटलं, आकाला कधीतरी भेटायला जा. तुझ्यासाठी तिचा जीव तडफडतोय.

-6-

या सर्व घटनेला आता दोन-एक वर्षे लोटली असतील. आता काही दिवसांपूर्वीच कळलं की, आभ्या गावी येतो-जातो. मात्र पाहुण्यासारखा. आभ्याची बहीण मुंबईत कुठेतरी घरकाम करते. तिचंही लग्न ठरलंय. होणारा नवरा चांगला आहे, असं कळलं. थोडं बरं वाटलं. किमान त्या बिचाऱ्या बहिणीचं तरी आयुष्य नीट जाईल.
बाकी मरणाचं वय नसतानाही आका आता मरायला टेकलीय. आभ्याच्या टेन्शनने तिला अगदी खंगाल केलंय. आभ्याची बहीण पैसे पाठवून देते, त्यावर तिचं एकटीची चूल पेटतो. दोन वेळेचं पुरेसं जेवायला मिळतं. बहिणीचं लग्न झाल्यावर आकाला आधार कोण असेल, माहित नाही. नाही असे नाही... गावातील शेजारीही बऱ्यापैकी मदत करतात. बाकी तिकडे आभ्या, त्याची बायको आणि सासू-सासरे मस्त जगत असावेत.

माहित नाही- आकाची आभ्याला आठवण येत असेल का, आकाने त्याच्यासाठी खास्ता खाल्ल्या, त्या आभ्याला आठवत असतील का, बहिणीला एकदातरी भेटावसं वाटत असेल का, गावाकडं काय चाललंय हे पाहून यावं, असं त्याला  वाटत असेल का....

-7-

05 February, 2016

सचिन परब: लिहिण्याचं निमित्त, इन्स्पिरेशन वगैरे



त्याचं असंय की तुमच्या लिहिण्यालाही निमित्त असतं. म्हणजे विषय सुचायला वगैरे नाही. तर अॅक्च्युअल लेखन करण्यास. म्हणजे उदाहर्णार्थ तुम्ही वाचता..मग वाचनातील आवडत्या किंवा नावडत्या मुद्द्यावर लेखन करता. मत मांडता. एकंदरीत प्रतिक्रिया देता. म्हणजे त्याच्यासाठी 'वाचन' हे निमित्त ठरतं. काहीजण तर ठरवून लिहितात. पण ठरवून लिहिणारे लिखाणात सातत्य ठेवत नाहीत, असा माझा (कुणी विचारात घेत नसला तरी) आरोप आहे. कारण लेखन हे आतून आलं पाहिजे. आता आतून म्हणजे कुठून हे विचारु नका. ती बोलण्याची एक स्टाईलय. तरीही सांगायचं झाल्यास, लेखन हे 'सूचलं' पाहिजे. उगाच चार शब्दांना खेचायचं, ताणायचं आणि त्यांच्या चार ओळी करायच्या, याला काडीचाही अर्थ नसतो. दोन पानी लेखन एका पानात संपत असेल तर तिथंच संपवावं. उगाच वाढवलं की ते बोरिंग होतं, असं माझं स्ट्रिक्टली पर्सनल मत आहे. असो. आपण मुद्द्यावर येऊया. तर लेखनाला कुणी-ना-कुणीतरी निमित्त असतंच. माझ्या लेखनाला निमित्त ठरले- मी ज्यांना कधीच पर्सनली भेटलो नाही, कधीही वन-टू-वन बोललो नाही, असे सचिन परब सर.



सचिन परब हा इसम किती फूट उंच किंवा दिसायला गोरा की काळा.. किंवा आणखी कोण.. याची काहीही माहिती नव्हती तेव्हाचे हे तीन प्रसंग. तिन्ही प्रसंग एकमेकांशी कनेक्टेड आहेत. या तिन्ही प्रसंगांनी मला सचिन परब यांच्याशी, त्यांच्या लेखनाशी आणि त्यांच्या लेखनशैलीची आवड निर्माण केली आणि पर्यायाने मला लिहिण्यास भाग पाडले. ते तीन प्रसंग असे-


प्रसंग १.

साठ्ये कॉलेजमध्ये बीएमएमच्या पहिल्या वर्षात असतानाची गोष्ट. डिजिटल मीडिया असा काहीतरी विषय होता. आता नीट आठवत नाही. या डिजिटल मीडियात ब्लॉग क्रिएट करणं हा विषय होता. हा विषय शिकवण्यासाठी तेव्हा रुईया कॉलेजमध्ये लेक्चरर असणारी गीतांजली ताई आली होती. आम्हाला शिकवायला आली म्हणून कॉलेजपुरतं मॅम बोलायचो.. बाकी 'अमर हिंद'च्या वक्तृत्व स्पर्धेची आयोजक म्हणून गीतांजली ताईला आधीपासूनच ओळखत होतो. सो तीला ताई बोलणंच आवडायचं. असो. तर गीतांजली ताई आम्हाला ब्लॉग क्रिएट करणं शिकवणार होती.. तेव्हा तिने ब्लॉग कसा बनवायचा, तो कसा असला पाहिजे, लेखन कसं असावं, लेखनशैली कशी असावी वगैरे सांगताना एक ब्लॉग उदाहरणार्थ म्हणून आमच्यासमोर ठेवला होता. त्या ब्लॉगचं नाव- माझं आभाळ. पावसाळ्यात (बहुधा) कुठल्याशा लायटीच्या (बहुधा) खांबाला टेकून, फिकट गुलाबी कलरची कॉलरलेस फूल स्लिव्हचं टीशर्ट घालून असणाऱ्या इसमाचा ब्लॉगच्या शीर्षस्थानी फोटो होता. ते दुसरे-तिसरे कुणी नसून 'माझं आभाळ' या आमच्यासमोर 'उदाहरणार्थ' म्हणून ठेवला गेलेल्या ब्लॉगचे लेखक होते- सचिन परब. तर सचिन परब या नावाशी आणि त्यांच्या अस्तित्वाशी ती पहिली ओळख. गीतांजली ताई शिकवून गेल्यानंतर कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरील कम्प्युटर लॅबकडे धाव घेतली. 'माझं आभाळ' ब्लॉगवरील काही पोस्ट वाचल्या. लेखनशैली आवडली.



प्रसंग २.

तर त्यावेळी कॉलेजमधून पार्ट टाईम जॉबला जात असे. पण त्यादिवशी आधीच कामाला जायचा कंटाळा आला होता आणि त्यात हा ब्लॉग वाचून काढायचा होता. मग थेट कामावर फोन केला. मालाडच्या लिबर्टी गार्डनजवळील एक तिवारी नावाच्या सीएकडे फिस बॉयचं काम करत असे. फोन केला आणि सांगितलं - "आज एक्स्ट्रा लेक्चर आहे. त्यामुळे येणार नाही."
तर कामावर न जाता ब्लॉग वाचायला घेतला... 'एक होती वाडी', 'फ्रॉड मार्गशीर्षातील गुरुावारांचा', 'प्रवीण भुवड अमर रहे' इत्यादी इत्यादी लेख वाचले... लेखनशैली खूपच आवडली. त्यातला 'शी!' लेख तर भारीच. हा लेख मी दोनदा की तीनदा वाचलाय. त्याचा इन्ट्रो मला पाठही झालाय.. इतका हा लेख आवडलेला. सुरुवात अशीय- "कार्ल मार्क्सने जगातल्या माणसांची दोन प्रकारांमध्ये वाटणी केलीय, हॅव्ज आणि हॅव नॉटस्. आहे रे आणि नाही रे.
मला विचाराल तर जगात दोन प्रकारची माणसं आहेत. घरात संडास असणारी आणि घरात संडास नसणारी."
कसलं भारी लिहिलंय म्हणून सांगू ही पोस्ट. एकदा वाचाच. लिहिण्याची जी काही शैली आहे ना तिला सलामच. पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत वाचकाला थांबवून ठेवते, अशी शैली. अनिल अवचटांसारखी. तुमच्या-आमच्या रोजच्या बोलण्यातील शब्द....  पुढील काही दिवस 'मांझं आभाळ' वाचण्याची मोहीमच उघडली होती. अखेर या ब्लॉगवरचा एकूण एक ब्लॉग वाचून काढला.



प्रसंग ३.


तर त्या दिवसापासून सचिन परब यांना भेटायचं ठरवलं होतं. या माणसाला भेटून, आपण कसं लिहियला पाहिजे, काय वाचायला पाहिजे वगैरे प्रश्न विचारायचे, असे ठरवलेले. भेटण्याची संधीच मिळत नव्हती. याच वेळी 'मटा'च्या तिसऱ्या पानावर लेफ्ट हँड साईडला जे 'थोडक्यात' येतं ना... त्यात जाहिरातीटाईप एक बातमी आली होती. परेलच्या दामोदर हॉल शेजारील सर्व्हिस लीग शाळेत 'अंनिस'चं चर्चासत्र आहे आणि त्यात प्रमुख वक्ते सचिन परब असणार आहेत. सचिन परब सर (बहुधा) तेव्हा नवशक्तीचे संपादक होते. मग काय... हा कार्यक्रम अटेन्ड करण्याचं ठरवलं. तारिख आठवत नाहीय.. पण शनिवारचा दिवस होता (बहुधा).. संध्याकाळी ६:३० चा कार्यक्रम होता. मी ६ वाजताच जाऊन बसलो होतो. त्या दिवशी सचिन परब या इसमाला सजीवरुपात पाहिलं. आपल्याला ज्याचा ब्लॉ आवडला, तो हाच इसम. त्यादिवशी सचिन सरांनी प्रबोधनकारांवर व्याख्यान दिलं.. शिवसेना आणि प्रबोधनकार, प्रबोधनकारांचं अंधश्रद्धेविषयीचे सडेतोड मत वगैरे खूप विषयांना हात घातला. यावेळी व्याख्यान झाल्यानंतर त्यांनी सर्वांशी अनौपचारिक गप्पा मारल्या.. त्यातून मला हे व्यक्तिमत्त्व थोडं उलगडलं. बोलण्यात जितका साधेपणा आणि सुलभता, तितकंच लेखनात, असा हा माणूस.


शेवट:

सचिन परब सरांमुळे मी लिहियला लागलो. तोडकं मोडकं लिहित जायचो, जे येईल तसं, जमेल तसं... पण लिहायचो. विशेष म्हणजे ज्यांच्यामुळे मी 'लिहिणं' सिरियसली घेतलं, त्या सचिन परब सरांना अजून पर्सनली कधीच भेटलो नाहीय. परेलला सर्व्हीस लीगच्या शाळेत व्याख्यान अटेन्ड केलं, तेही तिथल्या गर्दीतला प्रेक्षक म्हणूनच...


तर सरतेशेवटी सांगण्याचा मुद्दा असा की, आपल्या 'लिहिण्या'लाही निमित्त असतं. किंवा कुणीतरी निमित्त होतं. किंवा कुणाच्यातरी लिखाणावरुन इन्स्पायर्ड होऊन तुम्ही लिहिता.. जसं माझं निमित्त, इन्स्पिरेशन ठरलं- माझं आभाळ आणि सचिन परब.

30 January, 2016

राजन आजोबा: माणसं जोडणारा अवलिया


काही माणसांच्या रक्तात प्रेमाचं केमिकल मिक्स झालेलं असावं बहुतेक. प्रचंड म्हणजे प्रचंड प्रेमळ असतात ही माणसं. अशी माणसं आपल्या वाटेत कायमच भेटत असतात. यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल, इतकीच असते. पण अशी माणसं या जगात आहेत हे नक्की. 'माणसं जोडणं' या पलिकडे यांच्या आयुष्यात महत्त्वाचं असं काही नसतं. पावलो-पावली निर्दयी माणसांचा ढीग पाहिल्यावर अशा माणसांकडे पाहून मला प्रचंड अप्रूप वाटतं.

'राजन आजोबा' असं टायटल देऊन हे काय भलतंच सांगत सुटलाय, असा प्रश्न मला तुमच्याच चेहऱ्यावर दिसतोय. सांगतो... त्यांच्याबद्दलच सांगतो. ही सुरुवात त्यांच्यासाठीच होती. कारण मी आज ज्या राजन आजोबांबद्दल सांगणार आहे, ते वर उल्लेख केल्याप्रमाणे 'हाताच्या बोटांवर मोजता येतील', अशांपैकी एक आहेत. जगावेगळा माणूस.

राजन आजोबा. वय वर्षे सत्तरी पार. आजोबा वगैरे बोलून त्यांचा अपमान केल्यासारखंच होईल. कारण हे चिरतरुण व्यक्तिमत्व आहे. पण पहिल्यापासून आजोबा बोलण्याची सवय असल्याने आजोबाच म्हणतो.

तेव्हा मी नुकताच पार्ल्यातील हनुमान रोडवरील इमारतींमध्ये पेपरलाईन टाकायला सुरुवात केली होती. माझ्या लाईनमध्ये हनुमान रोडवरील काही इमारती आणि मग माजी महापौर रमेश प्रभूंच्या बंगल्याच्या गल्लीतील काही इमारती होत्या. इथेच आतमध्ये हनुमान रामानंद नावाची पार्ल्यातील प्रसिद्ध सोसायटी आहे. या सोसायटीच्या बाजूला स्मृती नावाची चार मजली इमारत आहे. इथे पहिल्या माळ्यावर राजन आजोबा राहतात.

खरंतर आम्हा पेपर टाकणाऱ्या मुलांचा आणि एखाद्या कस्टमरचा फार फार तर अर्धा मिनिटाचा संबंध. तोही दार उघडा असला तर... अन्यथा पेपर दारात अडकवून किंवा दारातच टाकून पुढचा पेपर टाकण्याच्या घाईत असणारे आम्ही कशाला कुणाशी बोलायला जातोय. पण या राजन आजोबांनी माझ्या घाईत पेपर टाकण्याच्या सवयीला मोडित काढलं आणि त्यांच्या घरात थांबा घेण्यास भाग पाडलं.

ज्या कुणासाठी हा माणूस दार उघडतो, मग तो पेपरवाला असो वा कचरेवाला किंवा दुधवाला... हा प्रत्येकाला काहीना काहीतरी खायला दिल्याशिवाय परत पाठवत नाही. अगदीच काही नसेल, तर चमचभर साखर हातावर ठेवतो आणि पाठवतो. असा हा अवलिया राजन आजोबा.

राजन आजोबांच्या घरात पेपर टाकून एव्हाना एक महिना झाला होता.. पण त्यांची आणि माझी गाठभेट कधी झाली नाही. होणार तरी कशी... मला लवकर कॉलेजला जायचं असायचं आणि त्यामुळे पटापट साडेसहाच्या आत पेपर टाकण्याची धडपड असायची. त्यामुळे मी ज्या वेळेला जायचो, तेव्हा त्यांचं दार बंद असायचं. पण एक दिवशी त्यांनी पकडलंच.

त्याचं झालं असं की, ते रोज लोकसत्ता पेपर घेत. आणि शनिवार-रविवार लोकसत्तासोबत मटा-इंडियन एक्स्प्रेस. मी आठवडाभर त्यांना बरोबर उलट पेपर टाकत होतो. रोज मटा आणि शनिवार-रविवार लोकसत्ता-इंडियन एक्स्प्रेस. अखेर एकेदिवशी राजन आजोबा सकाळी सहा वाजल्यापासूनच दार उघडून बसले. कस्टमर दारात उभा असला की आम्ही समजून जायचो, काल पेपर चुकवलाय आणि आता ओरडा मिळणार. तर राजन आजोबा दारात उभेच होते. या माणसाला त्या दिवशी मी पहिल्यांदा पाहिलं. मला थांबवून चांगलाच ओरडा दिला. 'कळत नाही का रे.. आठवडाभर पेपर चुकीचा टाकतोयेस. आज येईल बरोबर-उद्या येईल बरोबर.. असं विचार करत मीही आलो नाही तुझ्या मालकाकडं.' असं वगैरे खूप बोलले. त्यांच्या पुढची इमारत असलेल्या अरिहंत बिल्डिंगमध्ये माझी लाईन संपत असे. मला बोलले, "हा एक पेपर कुणाचाय?"
"बाजूच्या इमारतीतला." मी उत्तर दिलं.
"जा टाकून ये. पण पळू नकोस. परत इथेच ये."

मी अरिंहत इमारतीत पेपर टाकायलो गेलो. माझ्या मनात एकच प्रश्न हा माणूस मनसोक्त ओरडला आणि परत का बोलावलं आहे. झालं की ओरडून. उद्यापासून टाकेन बरोबर. मग आता परत का बोलवलंय? विचार केला, जाऊन तर बघू. मारत तर नाही ना. काय बोलेल ते या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं.

मी परत त्यांच्या घरी आलो. राजन आजोबा दारातच उभे होते. खडसावल्यागतच बोलले, "आत ये."
आत गेलो. प्रशस्त घर. पांढरी शुभ्र लादी. मी आपला पेपर टाकून घामाघूम झालेलो.. पाय घामाने चिघळलेले... दारातच पायपुसणीवर उभा राहिलो. आत पाऊल टाकलं तर त्या लादीवर पायाचे ठसे उमटतील. म्हणून गप्पपणे तिथे उभा होतो. पण राजन आजोबांनी माझ्या खांद्याला पकडत आत नेऊन डायनिंग टेबलची एक खुर्ची मागे खेचली आणि त्यावर बसण्याचा इशारा केला. मी बसलो. ते समोर बसले.

काय करतो, कुठे काम करतो वगैरे चौकशा केल्या. साठ्ये कॉलेजमध्ये आहे म्हटल्यावर त्यांनी त्यांचे आणि प्राचार्या रेगे मॅडमचे घरचे संबंध असल्याचे वगैरे सांगितलं. बोलण्यातून राजन आजोबा उलगडत गेले. त्यांच्याबद्दलची गेल्या पाच-सात मिनिटांत तयार झालेली प्रतिमा गळून पडली. हा माणूस रागीट नाहीय. मला पेपर चुकीचा टाकण्यावरुन खडसावलं, तीही मस्करीच होती, हे मला नंतर कळलं. असंच काहीही निमित्त काढून ते माणसं जोडत असत, हे काही दिवसांनी कळलं.

तर तेव्हा चहा घेऊन मी तिथून निघालो.. मात्र, कायमचं नातं जोडूनच.

त्यानंतर नेहमी राजन आजोबांकडे जाणं सुरु राहिलं. तोंड गोड केल्याशिवाय त्यांच्या घरातून कधी माघारी आलोय, असं आठवत नाही. एकदा तर आजी घरी नव्हत्या.. आणि मी त्यांच्याकडे गेलो होतो.. आजोबांना काही बनवता येत नाही. तर म्हणे, "आज काय मिळणार नाही आपल्याला.. माऊली घरात नाहीय." माऊली म्हणजे आजी. राजन आजोबा पत्नीला माऊली म्हणतात. तरी ते किचनमध्ये गेले आणि पाण्याचे दोन ग्लास आणि पारले जी बिस्किटचा एक पुडा घेऊन आले. म्हणे, "पाण्यात बुडवून खाऊया. आज हीच पार्टी आपली."

प्रेम वाटत जाणं आणि माणसं जोडत जाणं, हेच या माणसाच्या आयुष्याचं ध्येयं आहे.

मी काही एकटाच असा नाही.. असे अनेकजणांशी त्यांनी नातं जोडलंय. राजन आजोबा खरा श्रीमंत माणूस आहे. आपल्या प्रत्येकालाच आपल्या वाटेत असे 'राजन आजोबा' भेटतात. थोड्या वेगळ्या रुपात, वेगळ्या पद्धतीने आपलं प्रेम वाटणारे वगैरे. पण असतात हे नक्की.

आज संध्याकाळी ऑफिसखाली चहा प्यायला गेलो होतो, तिथे पाण्यात बिस्किट बुडवून खात असलेला एकजण पाहिला.. त्यावरुन राजन आजोबा आठवले. मग म्हटलं, आज लिहितोच. तेवढाच आठवणींना उजाळा!


सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...