भारतात पंतप्रधानपदावर विराजमान झालेली व्यक्ती साधारणत: आधी कुठल्या ना कुठल्या मंत्रिपदावर विराजमान होऊन आलेली असते. आजही आणि आधीही, अप्रत्यक्षपणे हा प्रघात राहिलाच आहे. किंवा वरच्या पदाच्या त्या पायऱ्याच म्हणूया. (राजीव गांधी अपवाद. पण ते पंतप्रधान होण्याला वेगळी कारणं होती)
पण चंद्रशेखर हे असे नेते होऊन गेले, जे खासदार राहिले आणि थेट देशाचे पंतप्रधान... अधेमधे ना कुठलं मुख्यमंत्रिपद, ना कुठलं केंद्रीय मंत्रिपद. त्या पदावरून उतरल्यावरही पुढे ते कधीच कुठल्या मंत्रिपदावर गेले नाहीत. जणूकाही सरकारमधील 'पंतप्रधानपद' या एकाच पदासाठी ते बनले होते.
'द मॅन फ्रॉम बलिया' म्हणून देश ज्यांना ओळखतो त्या चंद्रशेखर यांची 'जीवन जैसा जिया' आत्मकथा वाचली. त्याआधी चंद्रशेखर यांच्याबद्दल फारच जुजबी माहिती होती. मात्र, राजकमलनं प्रकाशित केलेली ही त्यांची आत्मकथा त्यांच्या अनेक चढ-उतारांची विस्तृत माहिती देणारी आहे. तीही स्वत: चंद्रशेखर यांच्या शब्दात.
राजनितीने देश के एक साहित्यिक को छिन लिया... असं चंद्रशेखर यांच्याबद्दल हिंदी साहित्य वर्तुळात म्हटलं जाई. हिंदी भाषेवर त्यांचं कमालीचं प्रभुत्व होतं. त्यांच्या आत्मकथेतील भाषा शैलीतून ते लक्षातही येतं.
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील इब्राहिमपट्टीचा राहणारा हा समाजवादी आंदोलनातील धडाडीचा कार्यकर्ता पुढे काँग्रेसमध्ये गेला आणि तिथूनही पुढे बाहेर पडला. या माणसाचं संपूर्ण आयुष्य विस्मयचकित करणारं राहिलंय.
कर नाही त्याला डर कसली, या उक्तीनं जगलेला हा माणूस. एक प्रसंग यात आहे. राम मनोहर लोहियांसारख्या पहाडी व्यक्तीला आपल्या गावात बोलावून, 'आप खाना खा के निकल जाइए' असं बेधडकपणे बोलणारा हा माणूस काय निडरवृत्तीचा असेल, याची कल्पना केलेली बरी.
त्याचं झालं असं की, गावाजवळील वार्षिक कार्यक्रमात आचार्य नरेंद्र देव यांना बोलावण्याचं ठरलं होतं. पण त्यांना ते शक्य नव्हतं म्हणजे आचार्यंनी राम मनोहर लोहियांना जाण्यास सांगितलं. लोहियांना कोलकत्त्यात काही काम होतं, म्हणून ते जाण्यास उत्सुक नव्हते. पण आचार्यंची विनंती टाळणं शक्य नव्हतं. पण कोलकात्याला जाण्यासाठी बलियातून सर्व नियोजन करावं, अशी अट घालून ते बलियात आले. पण येईपर्यंत ते कुरकूर करत राहिले. परत जाण्याचं कुठलंच नियोजन केली नसल्याची तक्रार-कम-आरोप लोहियांनी चंद्रशेखर यांच्यावर केला आणि चंद्रशेखर भडकले.
लोहिया त्यावेळी प्रचंड लोकप्रिय होते. मात्र, आपल्या प्रामाणिक हेतूंवर संशय घेणाऱ्या लोहियांना चंद्रशेखर म्हणाले, 'हमारे कार्यक्रम में आपकी जरूरत नहीं, आप खाना खा के निकल सकते हो' पुढे लोहियांना आपली चूक कळली आणि त्यांनी कार्यक्रम करून जाण्याचा निर्णय घेतला.
चंद्रशेखर यांच्याबद्दलचा हा एकच प्रसंग नाही. देशात ज्यावेळी इंदिरा गांधी यांची प्रतिमा 'आयर्न लेडी' म्हणून प्रस्थापित झाली होती, ज्यावेळी अनेक बडे नेते इंदिरा गांधींसमोर बोलायला बिथरत असत, त्यावेळी चंद्रशेखर हे इंदिरा गांधी यांच्यासमोर परखडपणे बोलण्याचं धाडस बाळगून होते. असाच प्रसंग ते मोरारजी देसाईंबाबत घडलेला सांगतात.
मोरारजी देसाईंशी काहीशा कारणावरून भांडण झालं. लोकसभेतच दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. चंद्रशेखर त्यावेळी काँग्रेसमध्येच होते. इंदिरा गांधींनी चंद्रशेखर यांना वैयक्तिकरित्या गाठत सांगितलं, "मोरारजी भाई बडे है. मैं नहीं चाहती आप पार्टी से बाहर हो. आप माफी माँग लिजिए." क्षणाचा विलंब न करता, चंद्रशेखर इंदिरा गांधी यांना म्हणाले, "मैं कोई हिंदू रमणी नहीं हूँ, जो मरते वक्त तक पती का साथ निभाए. स्वाभिमान के साथ जिता हूँ" हे सांग त्यांनी पक्षालाही राम राम ठोकण्याचा गर्भित इशारा दिला. असे होते चंद्रशेखर.
चंद्रशेखर यांच्या समाजवादी ते काँग्रेस या प्रवासावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यावेळीही आणि आताही घेतला जातो. पण समाजवादी असो किंवा कुठे, जिथे चंद्रशेखर गेले, तिथे त्यांनी समाजवाद रुजवण्याचा प्रयत्न केला. राजकारणाचे डावपेच खेळले, पण समाजावादाच्या मुलभूत विचारांशी ते ठाम राहिले.
एकदा स्वत: इंदिरा गांधींनी विचारलं, आप काँग्रेस को समाजवादी मानते हैं क्या? त्यावर चंद्रशेखर म्हणाले, "थोडा मानता हूँ, थोडा मनवाना चाहता हूँ" इंदिरा गांधींना हे काही कळलं नाही. इंदिरा गांधींनी आणखी विचारल्यावर चंद्रशेखर म्हणाले, "अगर काँग्रेस को समाजवाद के तरफ नहीं ले सका, तो काँग्रेस को ही तोड दुँगा" --- इतके स्पष्ट होते चंद्रशेखर.
आणीबाणीनंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांना पंतप्रधानपद मिळेल अशी आशा होती. पण त्यावेळी मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. ते न मिळाल्याने चंद्रशेखर नाराज असल्याच्या बातम्या सुद्धा त्यावेळी आल्या. मोराराजींच्या मंत्रिमंडळात त्यांच्या कुठलेच मंत्रिपद न घेण्याच्या निर्णयानं त्या बातम्यांना आणखीच खतपाणी घातलं.
पुढे नोव्हेंबर 1990 ते जून 1991 दरम्यान भारताचे पंतप्रधान झाले. सातच महिने त्यांना कार्यकाळ मिळाला. राजीव गांधींच्या पाठिंब्यावर हे सरकार होतं. खूप टीका झाली या सरकारवर. अर्थसंकल्पही मांडता आला नाही, इतकं अस्थिर सरकार होतं हे. पण ज्यावेळी राजीव गांधी पाठिंबा काढतायेत, अशी कुणकुण लागली, पाठिंबा काढण्याआधीच चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला.
पुढेही ते संसदेत खासदार म्हणून जात राहिले. पण कुठल्याच मंत्रिपदाला पुन्हा स्पर्श केला नाही. आपला जन्म केवळ पंतप्रधानपदासाठीच झालाय, हेच कदाचित ते सांगू पाहत होते की काय, असं वाटून जातं.
जवळपास चार-पाच दशकं राजकारणात राहूनही ते आर्थिकदृष्ट्या कफल्लकच राहिले. एक दिवस त्यांच्या पत्नीनं विचारलं, "आप ने बच्चों के लिए कुछ भी किया नहीं." चंद्रशेखर सांगतात, पत्नीचं ते वाक्य ऐकून मन भरून आलं, काहीच उत्तर देऊ शकलो नाही.
नवी दिल्ली ते कन्याकुमारी असा चार हजारहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून भारत समजून घेणारा, पक्षाचा कार्यकर्ता ते अध्यक्ष होऊनही कुठल्याच मंत्रिपदावर न गेलेला, थेट पंतप्रधानपदावर पोहोचलेला आणि कुणीही पाठिंबा काढण्याआधी देशाच्या सर्वोच्च पदाचा राजीनामा दिलेला, उत्तरप्रदेशातील छोट्याशा गावातून आलेला शेतकऱ्याचा पोरगा, राजकारणातल्या भल्याभल्यांना तोंडावर सुनावणारा....हा नेता समजून घेण्यासाठी 'जीवन जैसा जिया' वाचायलाच हवं. वाचताना तुमचा ताबा घेतो हा माणूस - इतकं सुंदर लेखन आहे.