18 July, 2018

वारी : काही आठवणी आणि काही प्रश्न

फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी
मूळ नाव ज्ञानेश्वर, शाळेत दाखल करताना आजोबांनी ज्ञानदेव सांगितलं, लिहिणाऱ्याने नामदेव लिहिलं...असा माझ्या नावाचा प्रवास. पण ज्ञानेश्वर असो, ज्ञानदेव असो, वा नामदेव. तिन्ही नावं वारकरी संप्रदायाशी संबंधित आहेत. नाव ठेवण्यामागे अर्थात आजोबांचं वारकरी संप्रदायातील असणं कारणीभूत आहे. लहानपणापासून घरात - गावात - पंचक्रोशीत वारकरी संप्रदायाबद्दल प्रमाणिक श्रद्धा आहे.
आधी केवळ देव-धर्म म्हणून वारकरी संप्रदायाबद्दल आदर होता, मात्र पुढे तुकोबा वाचल्यानंतर विचारानेही या परंपरेशी जोडला गेलो. तमाम संतांच्या जीवनातून बंधुभावाचीच शिकवण दिली गेलीय. आपण किती अंगीकारली हा पुढचा वादाचा मुद्दा. पण संतपरंपरा ही एकता आणि बंधुभावावर आधारलेली आहे, एवढे निश्चित.
चौथीत असताना माझ्या हट्टामुळे आणि सहावीत असताना आजोबांनी स्वत:हून - अशा दोनवेळा आजोबांनी पंढरीची वारी घडवली. वारीशी संबंधित एक रंजक आठवण आहे. आजोबांचं बोट धरुन पंढरीच्या डेपोत एसटीतून उतरल्यावर घोषणा ऐकायला आली - "यात्रेचा काळ आहे. चोरांचा सुळसुळाट आहे. आपापल्या बॅगांवर लक्ष ठेवा." घोषणा ऐकून आजोबा कुजबुजले, "आम्हीही चोरीच करायला आलोय - बा पांडुरंगाच्या आशीर्वादाची चोरी करायला."
आमच्या गावाकडं वारकरी संप्रदाय चांगला रुजला आहे. मुळात शेतकरी समाज असल्याने वारकरी संप्रदायासारखं तळातल्या माणसांचं जगणं सांगणारा संप्रदाय रुजण्यास सुपिक वातावरण होतं. आणि तसेच झाले. आजही सगळ्या एकादशा नित्यनेमाने साजऱ्या केल्या जातात. दिवंगत सोनब अण्णा कदम यांनी बंधुभावाचा संदेश देणारे किर्तन गावा--गावात केले. लोकांना वारकरी संप्रदायाशी जोडले. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रवीण दादा हा वारसा सक्षमपणे पुढे नेत आहे. एकंदरीत मनाने-तनाने वारकरी परंपरेशी जोडला गेलेला आमचा परिसर आहे.
पुढे मुंबईत आल्यानंतर वाचनाकडे वळलो. एका दिवशी तात्यांचं म्हणजे आदरणीय डॉ. आ. ह. साळुंखे यांचं 'विद्रोही तुकाराम' हाती आलं. वैचारिकतेनेही संतपरंपरेशी अधिक घट्टपणे जोडला गेलो. वारकरी संप्रदायाशी जोडला गेलो असलो तरी, काही गोष्टी कायम प्रश्नांकित करत आल्यात. त्यावर आता बोलावं वाटतंय. किंवा वरील सारा लेखनप्रपंच त्या प्रश्नांसाठीच केलाय.
चंद्रभागेच्या वाळवंटी नाना जाती-धर्माची माणसं एकरुप होतात. जाती-धर्माची लेबलं पंढरीच्या बाहेर सोडतात आणि पंढरीच्या विठ्ठलाच्या नामात दंग होतात. कुणीही स्पृश्य-अस्पृश्य राहत नाही. वारीतला प्रत्येकजण केवळ 'वारकरी' असतो. मात्र हेच वारकरी जेव्हा पंढरीची वारी करुन आपापल्या गावात पोहोचतात, तेव्हा पुन्हा आपल्या जाती-धर्मात का शिरतात? (अर्थात अपवाद आहेत. नाही असे नाही.) संतपरंपरेनी विश्वबंधुभावाचा संदेश दिला, तो पंढरीत आपण अंमलात आणतो, मग परतल्यावर का विसरतो? आजूबाजूला जाती-धर्मात विघातक तेढ निर्माण होत असताना, आपल्याला याचे उत्तर नक्कीच शोधायला हवे.
फ्रेंच राज्यक्रांतीने स्वतंत्र्य, एकता बंधुता ही मूल्य दिली असे म्हणतात. मात्र आपल्या वारकरी संप्रदायाने फ्रेंच राज्यक्रांतीच्या साडेसातशे वर्षांपूर्वीच एकता आणि बंधुभावाची शिकवण दिली. ते आपण किती लवकर विसरलो.
ज्या संतपरंपरेने आपल्या वारकरी संप्रदायाच्या चळवळीचं नेतृत्त्व संत सोयराबाई, संत जनाबाई यांसारख्यांच्या खांद्यावर सोपवलं. त्याच परंपरेतील आपण स्त्रियांना का दुय्यम वागणूक देत असून, स्त्रियांकडे कमकुवत म्हणून का पाहतो?
असे अनेक प्रश्न आज मनात घिरट्या घालतात. वारकरी संप्रदायाबद्दल आस्था असल्याने या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आपण घेतला पाहिजे आणि आपली परंपरा अधिक सक्षम बनवली पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय हा या भूमीतल्या आधुनिकतेचा अविष्कार आहे. आपण परंपरा जपली पाहिजे. कारण अशी परंपरा जगातल्या खूप कमी समूहांच्या वाट्याला आली आहे. आपण त्यात नशीबवान आहोत.

नामदेव अंजना

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...